Leading International Marathi News Daily
बुधवार, २७ मे २००९

लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजू चौधरी यांचा निर्घृण खून
पुणे, २६ मे / प्रतिनिधी
लोणावळा नगरपालिकेतील काँग्रेसचे नगराध्यक्ष व कुख्यात गुंड राजू ऊर्फ भूपेंद्र हिरालाल चौधरी यांचा आज भरदुपारी गळा चिरून खून करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या भावाने पूर्ववैमनस्यातून चौधरी यांचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. लोणावळा शिक्षणमंडळाचे सभापतीही या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले. शिवाजी चौकातील नगरपालिका भवनामध्ये दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर खंडाळा-लोणावळा शहर तणावपूर्ण शांततेखाली बंद ठेवण्यात आले.

चौघांना फाशी
सावंतवाडी, २६ मे/वार्ताहर

पैशांचा पाऊस पाडण्याचा बनाव करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदोस येथे मुंबई, पुण्याच्या १० जणांचा निर्घृण खून करणाऱ्या चार जणांना जिल्हा न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा ठोठावली, तर अन्य दोघाजणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मुख्य आरोपी संतोष मनोहर चव्हाण, अमित अशोक शिंदे, योगेश मधुकर चव्हाण या चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली, तर प्रमुख आरोपीचा मामा सूर्यकांत अनंत कोरगांवकर व तानाजी सीताराम गावडे यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोषमुक्त केले. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजित भणगे यांनी ही माहिती दिली.

पाचशेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना
रेल्वेचा मासिक पास २० रुपयांत
नवी दिल्ली, २६ मे/खास प्रतिनिधी
परंपरेला छेद देत नवा पायंडा पाडत आज राजधानी दिल्लीऐवजी कोलकात्यातील पूर्व रेल्वेच्या मुख्यालयात रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी महिन्याला पाचशे रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कष्टकऱ्यांना रेल्वे प्रवास करणे शक्य व्हावे म्हणून २० रुपयांचा मासिक पास देण्याची घोषणा केली.

रस्सीखेच कायम!
मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता उद्याचा मुहूर्त
नवी दिल्ली, २६ मे/खास प्रतिनिधी
काँग्रेसमधील दावेदारांची संख्या वाढल्यामुळे मंत्रीपदे आणि खातेवाटपाच्या मुद्यावरून उडालेला गोंधळ तसेच पंजाब आणि हरयाणात उफाळलेल्या िहसाचारामुळे आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला. काँग्रेस तसेच घटक पक्षांच्या सदस्यांना आता मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी किमान गुरुवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अर्थसंकल्प जुलैच्या पहिल्या आठवडय़ात
नवी दिल्ली, २६ मे/खास प्रतिनिधी

केंद्रातील मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या इनिंगची खरी सुरुवात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे. नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प जुलैच्या पहिल्या आठवडय़ात मांडण्यात येईल, असे आज अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अर्थसंकल्प जुलैच्या पहिल्या आठवडय़ात सादर करून जुलैअखेरपर्यंत पारित करण्यात येईल. ३१ जुलैपर्यंत लेखानुदान प्रस्तावाद्वारे केलेली आर्थिक तरतूद संपणार आहे. लेखानुदान प्रस्ताव दुसऱ्यांदा मांडण्याची वेळ येऊ नये, असे आपल्या अधिकाऱ्यांना बजावले असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले. वित्तीय शिस्तीशी तडजोड न करता आर्थिक विकासाला चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. २००८-०९ सालात आर्थिक विकासाचा दर ७ टक्क्यांच्या आसपास असेल, असा अंदाज त्यांनी वर्तविला.

राज्यकर्त्यांचे औदार्य अन् आरोग्य विद्यापीठाचे साजरे डोंगर!
अभिजीत कुलकर्णी
नाशिक, २६ मे

संशोधन प्रकल्प, महाविद्यालय, रुग्णालय वा तत्सम उपक्रमांसाठी भविष्यात जागेची आवश्यकता भासणार असल्याने ‘या समोरच्या टेकडय़ा तुम्हाला घ्या’, असे औदार्य दस्तुरखुद्द शरद पवारांनी दाखविल्याला पाच वर्षे उलटून सुद्धा या टेकडय़ा म्हणजे ‘दुरून डोंगर साजरे’ असल्याची अनुभूती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला घ्यावी लागत असल्याच्या पाश्र्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी, विद्यापीठातर्फे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव आल्यास त्याला विनाविलंब मान्यता देण्याचे नव्याने केलेले सूतोवाच ही देखील बोलाचीच कढी ठरणार की काय, अशी शंका वैद्यकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

१५ रुपयांची पाण्याची बाटली २५ रुपयांना!
कामत हॉटेल व धारीवाल इंडस्ट्रीजला ग्राहक मंचचा दणका
जयंत धुळप
अलिबाग,२६ मे

सर्वत्र १५ रुपये किमतीला विकत मिळणारी धारीवाल इंडस्ट्रीज निर्मित ‘ऑक्सिरीच’ पिण्याच्या पाण्याची बाटली ‘विठ्ठल कामत हॉटेल’ मध्ये तब्बल दहा रुपये ग्राहकांकडून अधिक उकळून २५ रुपये अशा अवास्तव व गैरवाजवी किमतीस विक्री करून ग्राहकांची पिळवणूक केल्या प्रकरणी हॉटेलचे संचालक विठ्ठल गोविंद कामत आणि म़े धारीवाल इंडस्ट्रीज लि़ चे संचालक रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दोषी ठरविले आह़े

अशांत पंजाब
रेल्वेसेवा विस्कळीतच
नवी दिल्ली, २६ मे / पी.टी.आय.

पंजाब आणि हरियाणातील हिसांचारामुळे सलग दुसऱ्या दिवशीही रेल्वेसेवा विस्कळीत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान पंजाबमधील हिंसाचार मंगळवारी काही प्रमाणात कमी झाला असला तरी हरियाणात तो कायम होता. मुक्तसर जिल्ह्यातील संचारबंदी अद्यापही चालू ठेवण्यात आली असून काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्या अथवा त्या अन्यत्र वळविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी या मार्गावरील निजामुद्दीन-अमृतसर शान -ए एक्स्प्रेस, नवी दिल्ली-अमृतसर शताब्दी एक्स्प्रेस, दिल्ली-पठाणकोट एक्स्प्रेस आणि भटिंडा-जम्मुतावी एक्स्प्रेस या चार गाडय़ा रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली. या व्यतिरिक्त काही गाडय़ा अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने हिंसाचार मोठय़ा प्रमाणात झालेल्या जालंधर, लुधियाना तसेच फगवारा आणि अन्य काही स्थानकांवर हजारो प्रवासी अडकून पडले असून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. व्हिएन्नामध्ये दोन शीख गटांमध्ये झालेल्या संघर्षांचे पडसाद सोमवारी या भागात उमटून मोठय़ा प्रमाणात हिंसाचार उसळलेला होता. यामध्ये जम्मू-कन्याकुमारी हिमसागरी एक्स्प्रेसचे चार डबे आंदोलकांनी पेटवले होते तसेच सोनपूर-जम्मू एक्स्प्रेसचे इंजिन पेटविण्यात आले होते.

‘एला’मुळे बंगालमध्ये दरडी कोसळून १५ ठार
सिलिगुडी / गंगटोक, २६ मे / पी. टी. आय.

‘एला’ चक्रीवादळ आज बंगालच्या उत्तर भागात सरकल्याने दार्जिलिंग आणि आसपासच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने किमान १५ जण ठार आणि २१ जण जखमी झाले. दार्जिलिंग पर्वतीय क्षेत्रात कोसळलेल्या दरडींखाली नऊ प्रेते सापडली तर कुरसेओंग येथे सहा मृतदेह सापडल्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी पी. झिम्बा यांनी सांगितले. या वादळाचा सर्वात जास्त तडाखा २४ दक्षिण परगाणा जिल्ह्याला बसला असून येथील सुमारे चार लाख लोकांवर त्याचा परिणाम झाल्याचे मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांनी सांगितले. दक्षिण परगाणा जिल्ह्याच्या १३ विभागामध्ये या चक्रीवादळाने सर्वाधिक नुकसान झाले असून येथील जनजीवन मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्री भट्टाचार्य यांनी आज या भागाला भेट देऊन पाहणी केली. चक्रीवादळामुळे या जिल्ह्यातील सुमारे ४०० कि.मी. किनारपट्टीचे प्रचंड नुकसान झाले असून त्याच्या दुरूस्तीसाठी मोठा कालावधी लागेल असे मुख्यमंत्री भट्टाचार्य यांनी सांगितले. लष्कराने या भागात मदत आणि पुनवर्सन काम सुरू केले बेघर झालेल्या सुमारे ५० हजार लोकांची निवासाची व्यवस्था अन्यत्र करण्यात आल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले.

म. फुले यांचे नाव काढून जोशींचे नाव देण्याएवढे आम्ही खुळे नाही
बाबुराव माने यांचे स्पष्टीकरण
मुंबई, २६ मे/प्रतिनिधी

महात्मा ज्योतिबा फुले व मनोहर जोशी यांच्यातला फरक दलित चळवळीत काम केल्याने आम्हाला नक्की कळतो. महात्मा फुले यांचे नाव काढून मनोहर जोशी यांचे नाव धारावीतील महाविद्यालयाला देण्याएवढे आम्ही खुळे नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी दिले. दैनिक ‘लोकसत्ता’च्या आजच्या अंकात ‘महात्मा फुले यांचे नाव पुसून मनोहर जोशीेंचे देण्याचा वादग्रस्त प्रस्ताव!’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबद्दल माने म्हणतात की, धारावी येथील महाविद्यालयाला सध्या कोणाचेही नाव दिलेले नाही. हे महाविद्यालय म. फुले ट्रस्टमार्फत चालविले जाते. त्यामुळे म. फुले यांचे नाव काढून मनोहर जोशी यांचे नाव दिलेले नाही. महात्मा फुले यांचे नाव काढून स्वतचे नाव चढविणे मनोहर जोशी यांना सुद्धा आवडणार नाही. जोशी यांनी सामाजिक बांधिलकी व आत्मभान बाळगून आतापर्यंत काम केल्यानेच त्यांची देशपातळीवर प्रतिमा निर्माण झाली आहे. म. फुले शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयास मनोहर जोशी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव घेऊन जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी त्याला नकार दिला होता. परंतु सातत्याने पाठपुरावा केल्यावर ते नाव देण्यास तयार झाले. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे विचार आमचाही श्वास आहे. शंभर टक्के मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता राज्यातील एकमेव शाळा संस्थेच्या वतीने चालविली जाते व त्यामधील ८० टक्के कर्मचारीवर्ग मागासवर्गीय आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी