Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

समाजवाद
काही दिवसांपूर्वी शासनाच्या एका ज्येष्ठ सचिवाशी विकास कार्यक्रमा-संबंधात चर्चा करण्याचा योग आला. चर्चेदरम्यान मंत्रालयातील इतर काही ज्येष्ठ अधिकारीसुद्धा उपस्थित होते. कळत-नकळत एका अधिकाऱ्याकडून ‘समाजवाद’ या शब्दाचा उल्लेख झाला आणि सचिवमहोदय एकदम भडकले. समाजवाद किती वाईट आहे, हे स्पष्ट करण्याकरिता सचिवमहाशयांनी १५ ते २० मिनिटे खर्च केली आणि त्या दरम्यान त्यांनी इतर कोणासही बोलण्याची संधी दिली नाही. शासकीय सेवेतील प्रदीर्घ अनुभवावरून माझी अशी धारणा झाली आहे की, मंत्रालयातील बहुतांश ज्येष्ठ अधिकारी ‘समाजवाद’ या शब्दाचा तिरस्कार करणारे आहेत.

आणखी तीन मुलांना डेंग्यूसदृश ताप
औरंगाबाद, २६ मे/प्रतिनिधी

डेंग्यूसदृश तापाने रुग्णालयात दाखल झालेले चार रुग्ण घरी परतण्यापूर्वीच आणखी तीन मुलांना या तापाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सात दिवसांत डेंग्यूसदृश तापाचे सात रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. मोठय़ा प्रमाणावर औषधफवारणी, तसेच सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ताप आलेल्यांमध्ये ९ महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. त्याचा ६ वर्षांचा भाऊही अशाच तापाने फणफणला आहे. दहा वर्षांच्या एका मुलालाही असाच ताप आल्याचे निदर्शनास आले आहे.

‘भारत निर्माण’मुळे भांडणतंटय़ांचा कळस!
आसाराम लोमटे
परभणी, २६ मे

भारत निर्माण योजनेमध्ये जिल्ह्य़ात होणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या यशस्वीतेविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सध्या गावोगावी भांडणतंटय़ांनी कळस गाठला आहे. जिल्ह्य़ात निम्म्याहून अधिक गावांमध्ये ही योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.प्रत्येक वेळी नाव बदलून ग्रामीण भागाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना अस्तित्वात येतात. काम तेच असते, कामाचे स्वरूपही तेच असते; फक्त प्रत्येक वेळी अंगरखा बदलतो.

कळंबमध्येही १६ लाखांचा ‘अग्रीम घोटाळा’!
उस्मानाबाद, २६ मे/वार्ताहर

उस्मानाबाद तहसील कार्यालयाप्रमाणेच कळंब येथील लिपिक सी. व्ही. शिंदे यांनीही निवडणूक प्रक्रियेच्या १६ लाख १५ हजार रुपये अग्रीम रकमेचा हिशेब गेल्या पाच वर्षांपासून दिला नसल्याचा आक्षेप अंतर्गत लेखापरीक्षणात घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या कामासाठी एकाच लिपिकाला २४ वेळा अग्रीम देण्याचा प्रताप त्या वेळच्या तहसीलदार शोभा जाधव यांनी केल्यामुळे लेखापरीक्षणात ही रक्कम अमान्य करण्यात आली आहे.

‘मांजरा’-‘माजलगाव’मध्ये केवळ दहा टक्के पाणीसाठा
पाणीटंचाई गंभीर
बीड, २६ मे/वार्ताहर

मांजरा व माजलगाव या मोठय़ा प्रकल्पांमध्ये केवळ दहा टक्के पाणीसाठा शिल्लक असून इतर लघु व मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला आहे. परिणामी मेअखेरीस जिल्ह्य़ात पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून जवळपास दोनशे टँकरमार्फत वाडी-वस्तींवर पाणीपुरवठा केला जात आहे. प्रशासनाने पाणीटंचाई लक्षात घेऊन विहिरी, कूपनलिका अधिग्रहीत केल्या; पण हे प्रयत्न तोकडे पडले.

आता पाणीपट्टी आणि मालमत्ता कर एकत्र
महसूल वाढविण्याची ‘पुणेरी’ पद्धत
औरंगाबाद, २६ मे/प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या वतीने आतापर्यंत मालमत्ता आणि पाणीपट्टीसाठी वेगवेगळ्या नोटिसा देण्यात येत असत. मालमत्ता कर भरणारे पाणीपट्टी भरतीलच असे नव्हते. त्यामुळे मालमत्ता मोठय़ा प्रमाणावर असल्या तरी तेवढय़ा नळ जोडण्याही समोर येत नव्हत्या. याचा परिणाम महसुलावर झाला होता.

बहुचर्चित ‘स्पेक’ अध्याय अखेर संपला
नोटिसा नाही; जुन्याच दराने कर
औरंगाबाद, २६ मे/प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षांपासून सतत चर्चेत असलेला स्पेक या संस्थेचा अध्याय आयुक्त वसंत वैद्य यांनी अखेर संपविला. स्पेक या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार यापुढे कोणालाही नोटिसा येणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी जुन्याच दराने मालमत्ता कर भरायचा असल्याचे श्री. वैद्य यांनी स्पष्ट केले. आयुक्तांच्या या निर्णयामुळे शहरातील किमान निम्म्या मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला आहे.

कर्जदार आरोपीविरुद्ध कारवाई न करण्याचे न्यायालयाचे निर्देश
हीना शाहीन बँक घोटाळा

औरंगाबाद, २६ मे/खास प्रतिनिधी

बीडमधील हीना शाहीन अर्बन बँकेच्या सहा कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील एक कर्जधारक आरोपी शबाना बेगम अब्दुल अजीज यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २९ मे पर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील सुटीतील न्यायमूर्ती ए. व्ही. पोतदार यांनी दिले आहेत.

औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू
विविध कारणांमुळे शहरातील परिस्थिती तणावपूर्ण
औरंगाबाद, २६ मे/प्रतिनिधी

पोलीस आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारातून औरंगाबाद शहरात २६ मे ते ९ जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणे तसेच निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

जादा दराने खत विकल्याने वसमतमध्ये गोंधळ
हिंगोली, २६ मे/वार्ताहर

जादा दराने खत विकले जात असल्याच्या तक्रारीवरून वसमत येथे खत विक्रेते व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. यावरून शिवसेनेचे व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते यांचा वाद सुरू झाला. पोलिसांनी गोंधळ घालू पाहणाऱ्यांना चोप दिल्याने शहरात काही वेळ तणाव होता. वसमतच्या ‘साई फर्टिलायझर’ दुकानात जादा दराने खतविक्री होत असल्याच्या कारणावरून शेतकरी व दुकानदारात वाद सुरू झाला. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तेथे पोहोचले. त्यांनी दुकानाच्या काचा फोडल्या. कृषी अधिकारी दहीवडे यांना धक्काबुक्की झाली. त्याच वेळी शिवसैनिक आले. त्यांची संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची वादावादी सुरू झाली. पोलीस निरीक्षक माणिक पेरके सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ‘प्रसाद’ दिला.

पहिल्या दिवशीच पुस्तके मिळणार
नांदेड, २६ मे/वार्ताहर

राज्य सरकारतर्फे देण्यात येणारी मोफत पाठय़पुस्तके यंदा शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभी म्हणजेच १५ जूनला विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या विशिष्ट प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके देण्याचा निर्णय सरकारने काही वर्षांपूर्वी घेतला होता. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना, तसेच सर्व मुलींना ही पुस्तके मोफत देण्यात येत आहेत. यंदा नववीच्या व दहावीच्या विद्यार्थ्यांची माहिती सरकारने मागितली असली तरी त्यांना मोफत पाठय़पुस्तके देण्यासंदर्भात अद्यापि निर्णय झालेला नाही. सर्वाना शिक्षण मोहिमेत ही पाठय़पुस्तके देण्यात येतात. चुकीच्या नियोजनामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी ही पुस्तके मिळतात, असा दर वर्षीचा अनुभव आहे. उशिरा पुस्तके मिळाल्याने होणारी ओरड लक्षात घेऊन यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले व त्यात प्रशासनाला यश आले आहे. काही जिल्ह्य़ात शाळांना सुट्टय़ा लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना काही पुस्तके देण्यात आली होती. जिल्ह्य़ातील १६ तालुक्यांसाठी दोन दिवसांपूर्वी पुस्तके दाखल झाली. जिल्हापातळीवरून तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयांना ही पुस्तके देण्यात येतील व तेथून ही पुस्तके शाळांना वितरित करण्यात येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

विमान कोसळल्याची पुन्हा अफवा
परभणी, २६ मे/वार्ताहर

शहर व परिसरात आज पुन्हा विमान पडल्याची अफवा पसरली. या अफवेने मात्र प्रशासनातील अधिकारी बेजार झाले. विमान पडल्याची ही या महिन्यातील दुसरी अफवा आहे. शहरातील वांगी रस्ता, त्यानंतर एमआयडीसी परिसरात विमान पडल्याच्या अफवेने शहरात खळबळ उडाली. दुपारी तीन वाजल्यानंतर शहरात हीच चर्चा होती. या पूर्वीही १३ मे रोजी अशीच अफवा पसरली होती. त्या वेळी नांदेडहून निघालेले विमान नियोजित स्थळी भोपाळला पोहोचले नाही, परभणी जिल्ह्य़ातच भरकटले अशा बातम्या सुरू होत्या. परंतु प्रत्यक्षात ते विमान नसून हेलिकॉप्टर होते आणि ते नियोजित स्थळी बंगळूरला पोहोचले होते. त्या वेळीही प्रशासनातील अधिकाऱ्यांना मोठा मनस्ताप झाला. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक विमान वांगी रस्ता परिसरातून एकदम खालून जात होते. त्याचा घंोगावणारा आवाज आणि हेलकावण्याचे दृश्य पाहून गावकरी विमान पडल्याची चर्चा करू लागले. विमान खरेच पडले आहे काय, याची खातरजमा करण्यात अधिकाऱ्यांचा वेळ गेला. सायंकाळपर्यंत काहीच माहिती न मिळाल्याने ही अफवाच असल्याचे स्पष्ट झाले.

पाचही विद्यार्थ्यांची हकालपट्टी करणार
लातूरमधील रॅगिंग
लातूर, २६ मे/वार्ताहर

पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनाच्या वसतिगृहात रँगिंग केल्याचा आरोप असलेल्या पाच विद्यार्थ्यांना संस्थेतून काढून टाकण्यात येईल. तशा नोटिसा विद्यार्थ्यांना बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्राचार्य बी. के. कुंभार यांनी आज दिली. रँगिंगचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी तंत्रनिकेतनाच्या प्रशासनाने समितीही नेमली होती. या समितीने संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी न करताच प्राथमिक अहवाल सादर केला होता. त्यानंतर समितीने चौकशी करून अंतिम अहवाल सादर केला. वसतिगृहात घडलेला प्रकार रँगिंगचा नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. केवळ क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाली. यात बाहेरच्या काही विद्यार्थ्यांचा सहभाग आहे, असेही त्यात म्हटले आहे. हा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी घटनेनंतर प्रशासनाला याची माहिती देणे महत्त्वाचे होते. एका विद्यार्थ्यांला पाच जणांनी मारहाण करणे चुकीचे आहे. त्यामुळे दोषी विद्यार्थ्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांना तंत्रनिकेतनामधून काढण्यासंदर्भात कारवाई होईल, असेही श्री. कुंभार म्हणाले.

नवीन कलावंतांनी सादर केलेल्या एकांकिकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद
गंगाखेड, २६ मे/वार्ताहर
नादबिंदू कला अकादमीने शहर व तालुक्याच्या सांस्कृतिक चळवळीस योग्य व निर्णायक दिशा देण्यासाठी कलावंत प्रशिक्षण शिबिरातून घडविलेल्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी रविवारी गोपी मुंडे दिग्दर्शित ‘आभास की भास’, ‘ऑल दी घोस्ट’ व ‘द फर्स्ट शो’ या तीन एकांकिका सादर केल्या. या कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.नादबिंदूच्या वतीने उदयोन्मुख कलावंतांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. रविवारी येथील प्रेक्षकांसाठी मोफत तीन एकांकिका आयोजित केल्या होत्या. यामध्ये केदार शिंदे लिखित व गोपी मुंडे दिग्दर्शित ‘अभास की भास’ ही एकांकिका संतोष वाघमारे व अरविंद खंदारे यांनी सादर केली. ‘ऑल दी घोस्ट’ या फॅन्टसी काल्पनिक भूतजगतातील समाज व्यवस्था व मानवी समाज व्यवस्था यांचे सादरीकरण प्रा. असीफ अन्सारी, माऊली मुंडे, प्रज्ञा गाडे, अक्षय भंडारी, व्यंकटेश मुंडे यांनी केले. ‘द फस्ट शो’मध्ये संतोष भास्कर, प्राजक्ता कुलकर्णी, गंगेश्वर पालिमकर, आबा साळवे आदींनी भूमिका सादर केल्या.

जळकोटमध्ये एकाच दिवसात अकरा तंटे मिटविले
जळकोट, २६ मे/वार्ताहर
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पहिलीच बैठक घेण्यात येऊन न्यायप्रविष्ट असलेली ११ प्रकरणे (तंटे) एकाच दिवसांत वादी-प्रतिवादींमध्ये तडजोड घडवून मिटविण्यात आली.गावात दवंडी देऊन सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तंटामुक्तीबाबत ग्रामपंचायत कार्यालयात ‘खास’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्ही परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मन्मथ किडे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जळकोटचे सरपंच श्रावण गायकवाड, पोलीस पाटील व्यंकटराव कारभारी, या वेळी उपस्थित होते. गेल्या बऱ्याच वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेली प्रकरणे या बैठकीत दोन्ही पक्षाकडील व्यक्तींना समोरासमोर बसवून सामोपचाराने मिटविण्यात आली. ही मोहीम सुरू झाल्यापासून याव् ोळी पहिल्यांदाच पुढाकार घेऊन तंटामुक्त गाव समितीने एकाच दिवसांत महत्त्वपूर्ण असे तब्बल ११ खटले मिटविले आहेत.

मालमोटारीवरून पडून सहा वऱ्हाडी जखमी
नांदेड, २६ मे/वार्ताहर
मुखेड तालुक्यातील कोळगाव येथून सुगाव (कॅम्प) येथे जाणाऱ्या लग्नाची वऱ्हाडी मालमोटार सुगावजवळ बिघडली. मालमोटारीच्या टपावर बसलेले वऱ्हाडी खाली पडले. यात सहा जण जखमी झाले.त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास घडली.मालमोटारीच्या टपावर बसलेले प्रवासी जनार्दन श्रीरामे, संभाजी कळसे खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा उपरुग्णालयात प्राथमिक उपचार करून नांदेडला हलविण्यात आले. तानाजी साखरे (वय ३०), किशन गायकवाड, यादव गायकवाड, गजानन सावरगावे (सर्व राहणार कोळगाव) यांच्यावर जिल्हा उपरुग्णालयात उपचार चालू आहेत.मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदली करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या हिवताप अधिकाऱ्याला अटक
उस्मानाबाद, २६ मे/वार्ताहर
तालुक्यातील जागजी येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञाची इच्छित स्थळी बदली करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा हिवताप अधिकारी चंद्रकांत पांडे याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पकडले. उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत पांडेच्या घराची झडती सुरू होती.हिवताप कार्यालयाने २५ मेपर्यंत दहा आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या समायोजनाचे प्रस्ताव मागविले होते. इच्छित स्थळी बदली मिळावी म्हणून जागजी येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञाने समुद्रवाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्या नावाची शिफारस व्हावी अशी विनंती केली होती. या बदलीसाठी पांडे याने १५ हजार रुपयांची लाच मागितली. या कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी युनूस शेख यांच्याशी संपर्क साधला. आज दुपारी मध्यवर्ती शासकीय इमारतीतील हिवताप निर्मूलन कार्यालयात पांडेला पकडण्यात आले.

मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम
बीड, २६ मे/वार्ताहर

पावसाळ्यामध्ये नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्या पाश्र्वभूमीवर नगरपालिकेने मान्सूनपूर्व विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये ३४० स्वच्छता कर्मचारी, १३ ट्रॅक्टर्स व २ जेसीबी मशीनचा उपयोग करण्यात येणार आहे. पावसाळ्यमध्ये नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होतात. त्या दूर करण्यासाठी नगरपालिकेने विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात वॉर्डावॉर्डातील नाले साफ करण्यात येणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे.

जळकोटमध्ये टँकरची संख्या वाढविण्याची मागणी
जळकोट, २६ मे/वार्ताहर
गावाला पाणीपुरवठा करणारे सर्व उद्भव आता कोरडे पडले असून पाण्यासाठी होणारी जळकोटकरांची भटकंती वाढली आहे. सध्या एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखी एक टँकर वाढवावा, अशी मागणी लातूर जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती मन्मथ किडे यांनी केली आहे. जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत आहे. पाणीपुरवठय़ाचे सर्व उद्भव कोरडे पडत चालल्याने पाण्यासाठी हाल होत आहेत. पाणीटंचाईचा आढावा बैठक पंचायत समिती कार्यालयात घेण्यात आली. त्यात श्री. किडे यांनी ही मागणी केली. पंचायत समिती सभापती कांताबाई नागरगोजे, जळकोटचे सरपंच श्रावण गायकवाड, गटविकास अधिकारी शिवानंद खंदारे बैठकीस उपस्थित होते. श्री. किडे यांनी उपविभागीय अधिकारी संभाजी आडकुणे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली व टँकरचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना सूचनाही दिली.

घरफोडीत ९७ हजाराचा ऐवज लांबविला
अंबड, २६ मे/वार्ताहर
तालुक्यातील गहनीनाथनगर वस्तीवरील संजय अंबादास वनवे यांच्या घरी काल मध्यरात्री चोरी होऊन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ९७ हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला. वनवे यांच्या तक्रारीवरून गोंदी पोलिसांनी काल गुन्हा नोंदविला. मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान चोरांनी घराचा दरवाजा तोडून ६० हजार रुपये, तीन तोळे सोने व एक मोबाईल असा ऐवज चोरून नेला. तपासासाठी लगेच श्वानपथक बोलाविण्यात आले होते. मात्र पावसामुळे श्वानपथकास मार्ग काढता आला नाही. पोलीस उपनिरीक्षक शिरीष हुंबे तपास करीत आहेत.

दोन मुलांकडून पित्याची हत्या
नांदेड, २६ मे/वार्ताहर

वडिलांकडून होणाऱ्या सततच्या छळाला त्रासून दोन मुलांनी त्यांचा खून केल्याचे उघडकीस आले. शहरालगत असलेल्या पावडेवाडी येथील भगवान पावडे यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. परंतु उत्तरीय तपासणीत त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी त्यांची मुले तुकाराम पावडे व किरण पावडे यांच्याविरुद्ध हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला.

एक लाखाचे रॉकेल जप्त
बीड, २६ मे/वार्ताहर

हीनानगर भागात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून एक लाख रुपयांचे रॉकेल जप्त केले. या साठय़ाबाबतची माहिती गुप्त खबऱ्याने पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांना दिली होती. पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकाच्या सहाय्याने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा छापा घातला. जागा मालक शेख यासही अटक केली. दोघे फरारी आहेत.

नवजात अर्भकाला मारण्याचा आईचा प्रयत्न
जिंतूर, २६ मे/वार्ताहर

अनैतिक संबंधातून लग्नानंतर अवघ्या सहाव्या दिवशी जन्मलेल्या मुलाचा गळा दाबण्याचा प्रयत्न एका तरुणीने आज येथील ग्रामीण रुग्णालयात केला. पोलिसांनी विजय राठोड याला ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील देवंडा येथील एका तरुणीचे लग्न पनोलीतांडा येथील तरुणाशी २१ मे रोजी झाले. तिची आज पहाटे प्रसूती झाली. या अर्भकाचा गळा दाबण्याचा प्रयत्न तरुणीने केल्याचे पत्र डॉ. बोराळकर यांनी दिले. तरुणीने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी नोकर विजय राठोड याला ताब्यात घेतले आहे. त्याने या संबंधाची कबुली दिली.

किरकोळ कारणावरून विवाहितेची आत्महत्या
औरंगाबाद, २६ मे / प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून ३१ वर्षांच्या विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा (खूर्द) येथे घडली. पुष्पाबाई पांडुरंग साळवे असे तिचे नाव आहे. पुष्पाबाई यांनी शनिवारी (दि. २३) राहते घरी विष प्राशन केले होते. त्यांच्यावर प्रथम सिल्लोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. उपचारादरम्यान पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासूची आत्महत्या
औरंगाबाद, २६ मे/प्रतिनिधी
सुनेच्या त्रासाला कंटाळून ६५ वर्षांच्या सासूने जाळून आत्महत्या केली. ही घटना करमाड (ता. औरंगाबाद) पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंभेफळ येथे घडली. केसरबाई भिकाजी डेरे असे त्यांचे नाव आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास केसरबाई यांनी राहत्या घरी अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले होते. यात त्या १०० टक्के भाजल्या होत्या. त्यांचा मुलगा बाळू याने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. ‘सुनेच्या त्रासाला कंटाळून मी जाळून घेतले आहे’ असे केसरबाई यांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबानीत म्हटले होते. उपचारादरम्यान रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

शेतकऱ्याची आत्महत्या
औरंगाबाद, २६ मे/प्रतिनिधी
भोकरदन तालुक्यातील देड येथील शेतकरी आनंदा विठ्ठल निकाळजे यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. सरकारी रुग्णालयात आज पहाटे पाच वाजता त्यांचे निधन झाले. त्यांनी काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या शेतात विष घेतले होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजले नाही.

‘दयानंद’च्या दीपाली दाडची आयआयटीसाठी निवड
लातूर, २६ मे/वार्ताहर

दयानंद विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी दीपाली गोपाल दाड हिची आय. आय. टी.साठी निवड झाली आहे. तिचा दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शहा, डॉ. सारडा, संजय बोरा, प्राचार्य डॉ. जीवन तुलबा, उपप्राचार्य दासराव सूर्यवंशी आदींसह प्राध्यापक उपस्थित होते. दयानंद महाविद्यालयाने पुण्याच्या संस्थेच्या सहकार्याने आय. आय. टी.- ए.आय.ई.ई.ई. परीक्षेच्या तयारीसाठी सुरू केलेल्या विशेष वर्गाला पहिल्याच वर्षी मिळालेल्या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकारी सिंघल रजेवर; माज्रीकरांकडे पदभार
हिंगोली, २६ मे/वार्ताहर
जिल्हाधिकारी विनिता सिंघल रजेवर गेल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश माज्रीकर यांनी प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी मान्सून पूर्वतयारीची बैठक घेतली. श्री. माज्रीकर यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत पूरनियंत्रण प्रतिबंधक उपाययोजना याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करून संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करून जून ते ऑक्टोबर या कालावधीत २४ तास कार्यरत ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांचे मोबाईलचे क्रमांक तत्काळ संपर्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

टेम्पो उलटल्याने एकाचा मृत्यू
हिंगोली, २६ मे/वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्य़ातील कांचनवाडी येथील लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो (क्रमांक एमएच२० ई ५८११) उलटून एक जण ठार व काही जण जखमी झाले. वसमत तालुक्यातील कवठापाटीजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. नांदेड जिल्ह्य़ातील उमरी येथे हे वऱ्हाड चालले होते. देवराव बापुराव बाम्हणे (वय ४५) जागीच ठार झाले, तर काही वऱ्हाडी जखमी झाले आहेत. लक्ष्मण बाम्हणे यांच्या फिर्यादीवरून वसमत पोलीस ठाण्यात टेम्पोचालक रमेश (पूर्ण नाव समजले नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त चित्तथरारक कसरती
लातूर, २६ मे/वार्ताहर

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील टाऊन हॉल येथील मैदानावर आज सकाळी १० वाजता तायक्वांदो प्रशिक्षक चंद्रकांत गोणे यांनी चित्तथरारक कसरती सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. श्री. गोणे २१ वर्षांपासून तायक्वांदोचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांचे विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसच्या इतर मागासवर्गीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ गोणे यांनी केले होते. छत्रपती पुरस्कार विजेते उपनगराध्यक्ष मोईज शेख यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून एस. आर. देशमुख, नरेश पंडय़ा, आदी उपस्थित होते.

अरुण माने यांना सवरेत्कृष्ट कार्यकारी अभियंता पुरस्कार
लातूर, २६ मे/वार्ताहर

जलसंपदा विभागातील लातूर येथे कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता अरुण देवीदासराव माने यांना यंदाचा सवरेत्कृष्ट कार्यकारी अभियंता पुरस्कार मिळाला.औरंगाबाद येथील तापडिया नाटय़मंदिरात पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक प्रफुल्लचंद्र झपके यांनी माने यांचा पुरस्कार देऊन सत्कार केला. मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.कार्यकारी अभियंता माने यांनी मांजरा नदीवर निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीत पाच बंधाऱ्यांची कामे पूर्ण केली. तसेच लातूर जिल्ह्य़ात २८ साठवण तलावांची कामे केली. त्यातील दहा साठवण तलावाची कंदरभरणी पूर्ण केली. उध्र्व मनार उपसा सिंचन योजना पूर्ण करून त्यावर तीन हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.