Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजू चौधरी यांचा निर्घृण खून
पुणे, २६ मे / प्रतिनिधी

 

लोणावळा नगरपालिकेतील काँग्रेसचे नगराध्यक्ष व कुख्यात गुंड राजू ऊर्फ भूपेंद्र हिरालाल चौधरी यांचा आज भरदुपारी गळा चिरून खून करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या भावाने पूर्ववैमनस्यातून चौधरी यांचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. लोणावळा शिक्षणमंडळाचे सभापतीही या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले. शिवाजी चौकातील नगरपालिका भवनामध्ये दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर खंडाळा-लोणावळा शहर तणावपूर्ण शांततेखाली बंद ठेवण्यात आले.
लोणावळा येथे नुकत्याच झालेल्या अतिक्रमण कारवाई तसेच येत्या जून महिन्यात होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या पाश्र्वभूमीवर चौधरी (वय ५०, रा. इंदिरानगर, गवळीवाडा, लोणावळा) यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. चौधरी यांचे सहकारी व लोणवळा शिक्षण मंडळाचे सभापती उमेश नागराजन हुदलीयार (वय ३१) हे देखील या हल्ल्यात जखमी झाले. चौधरी यांच्या मागे पत्नी नगरसेविका साधना चौधरी व दोन मुली असा परिवार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास चौधरी हे नगराध्यक्ष कार्यालयात हुदलीयार यांच्यासमवेत राजकीय चर्चा करीत होते. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमित गवळी यांचे सख्खे भाऊ सुमित प्रकाश गवळी (वय २३) व त्याच्या एका साथीदाराने चौधरी यांच्या कार्यालयात सशस्त्र प्रवेश केला. सुमित गवळी याने चौधरी यांना खुर्चीवरून खाली पाडले. चौधरी यांनी प्रतिकार केला असता गवळी याने त्यांच्या डाव्या हाताची बोटे तोडली. चौधरी यांचा प्रतिकार थंडावला असता गवळी याने त्यांच्या छाताडावर उभे राहून गळा कापून खून केला. दरम्यान चौधरी यांच्या समोर बसलेले हुदलीयार यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यामुळे गवळी याच्या साथीदाराने त्यांच्या डोक्यावर व खांद्यावर वार केले. लोणावळा येथे नुकत्याच झालेल्या अतिक्रमण कारवाईत गवळी यांची चार हॉटेल पाडण्यात आली होती. याचा राग मनात ठेवून चौधरी यांचा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलीस अधीक्षक कदम यांनी व्यक्त केली.