Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

नांदोस हत्याकांड
चौघांना फाशी
सावंतवाडी, २६ मे/वार्ताहर

 

पैशांचा पाऊस पाडण्याचा बनाव करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदोस येथे मुंबई, पुण्याच्या १० जणांचा निर्घृण खून करणाऱ्या चार जणांना जिल्हा न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा ठोठावली, तर अन्य दोघाजणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मुख्य आरोपी संतोष मनोहर चव्हाण, अमित अशोक शिंदे, योगेश मधुकर चव्हाण या चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली, तर प्रमुख आरोपीचा मामा सूर्यकांत अनंत कोरगांवकर व तानाजी सीताराम गावडे यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोषमुक्त केले. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजित भणगे यांनी ही माहिती दिली.
२५ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर २००३ या कालावधीत हे खून झाले होते. बडोद्याच्या रामजी बाबासाठी काम करणारा रिक्षाचालक संतोष चव्हाण याने बक्कळ पैसा मिळत असल्याने रामजी बाबासाठी काम करण्याचे सोडून स्वत: संतोषबाबा बनला. मालाड येथे एक रिक्षाचालक म्हणून व्यवसाय करणाऱ्या संतोष याने पैशाचा पाऊस पाडण्याचे अनेकांना आमिष दाखविले. तीन लाख दिल्यास तीन कोटी रुपये मिळतील असा दावा केला. पैशाच्या लोभापायी अनेकजण अंधश्रद्धेचे बळी ठरले. त्यांनी संतोष व त्याच्या साथीदारांना पैसे दिले. हे पैसे परत देण्यासाठी त्यांनी तगादा लावला. शेवटी मालाड सोडून संतोष चव्हाण व त्याच्या साथीदारांनी मालवण-नांदोस गाठले. तेथे प्रत्येकाला बोलावून त्यांचा निर्घृण खून केला. मुंबईहून हेमनाथ ठाकरे आणि पुण्याहून शंकर सारंगे २५ सप्टेंबर २००३ रोजी सिंधुदुर्गात दाखल झाले. त्या दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी नेले. प्रथम शंकर सारंगे याच्या मानेवर लोखंडी रॉड मारून खून केला, नंतर हेमनाथ ठाकरे याला पाण्यात बुडवून ठार मारले.
पुण्याचे दादासाहेब दिनकर चव्हाण आणि विजयसिंह दुधे यांना ३० ऑक्टोबर २००३ रोजी ठार केले. त्यानंतर बदलापूरचे संजय गवारे व मुंबईचा बाळा मिशाळ यांचाही निर्घृण खून केला. पुणे येथील केरूभाऊ माळी, त्याची पत्नी अनिता व अल्पवयीन मुले राजेश व संजय यांचाही निर्दयी खून केला. पैशाचा पाऊस पाडणाऱ्या, अंधश्रद्धेचा बनाव करणाऱ्या आणि त्याला सहकार्य करणाऱ्यांनी १० जणांचा खून केला.