Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

रस्सीखेच कायम!
मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता उद्याचा मुहूर्त
नवी दिल्ली, २६ मे/खास प्रतिनिधी

 

काँग्रेसमधील दावेदारांची संख्या वाढल्यामुळे मंत्रीपदे आणि खातेवाटपाच्या मुद्यावरून उडालेला गोंधळ तसेच पंजाब आणि हरयाणात उफाळलेल्या िहसाचारामुळे आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला. काँग्रेस तसेच घटक पक्षांच्या सदस्यांना आता मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी किमान गुरुवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
व्हिएन्नातील दोन शीख गटांमध्ये झालेल्या संघर्षांचे पडसाद उमटून पंजाब आणि हरयाणात िहसाचार भडकल्यामुळे मंगळवारी सायंकाळी होऊ घातलेला मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता सोमवारीच वर्तविण्यात येत होती. पंजाब आणि हरयाणामधील िहसक उद्रेक पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यादृष्टीने संवेदनशील मुद्दा ठरला आहे. पण त्याचा बहाणा करून काँग्रेसला मंत्रिमंडळ विस्तारावरून उद्भवलेल्या अंतर्गत कुरबुरी शमविण्यासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ मिळाला. आनंद शर्मा, मुरली देवरा, वीरप्पा मोईली, एस. एम. कृष्णा, सी. पी. जोशी यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आणि आक्षेपांचे सूर उमटू लागले आहेत. त्यातच दुसऱ्या टप्प्यातील विस्तारात पक्षांतर्गत संभाव्य प्रतिस्पध्र्यांचे पाय खेचण्यासाठी काँग्रेसचे संसद सदस्य सरसावले असून त्यामुळे मंत्रिमंडळाचा उर्वरित विस्तार अधिकच गुंतागुंतीचा ठरला आहे. फारुक अब्दुल्ला यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असेल तर त्यांचे जावई सचिन पायलट यांनाही का संधी देणार, असा सवाल पायलट यांच्या गुज्जर समाजाचे खासदार अवतारसिंह भडाना काँग्रेसश्रेष्ठींकडे उपस्थित करीत आहेत.
विधी व न्याय मंत्री हंसराज भारद्वाज, मनुष्यबळ विकास मंत्री अर्जुन सिंह, नमो नारायण मीणा यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता नसल्यामुळे काँग्रेसमधील एका गटाची नाराजी वाढली आहे. परिणामी गांधी घराण्याचे निष्ठावान भारद्वाज विधी व न्याय मंत्री किंवा कंपनी व्यवहार मंत्री म्हणून मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता आहे. मोईली, कृष्णा यांना कोणत्या निकषावर मंत्रिमंडळात घेण्यात आले आणि आनंद शर्मा, हांडिक यांना का बढती देण्यात आली, असाही प्रश्न विचारला जात आहे. मुरली देवरा यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाल्यामुळे त्यांच्या विरोधात सक्रिय असलेला एक गट नाराज आहे. त्यातच मंत्रिमंडळातील उरलेल्या जागा भरताना विविध राज्यांसह महिला, दलित, मुस्लीम, आदिवासींना संतुलित प्रतिनिधित्व देऊन प्रत्येकाचे समाधान होईल, असे खातेवाटप करण्याच्या प्रयत्नात सोमवारी मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी चार तास चर्चा करूनही फारसे यश आले नाही. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही आणखी एक मंत्रीपद वाढवून मागितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेत ९ खासदार असूनही तीन मंत्रालये पटकाविणाऱ्या शरद पवार यांच्यापाठोपाठ प्रफुल्ल पटेल आणि अगाथा संगमा यांच्यासाठी आग्रह धरला आहे. मंत्रिमंडळात कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि राज्यमंत्री मिळून आणखी ६० जागा भरावयाच्या असून इच्छुकांची संख्या मोठी आहे. यंदा उत्तर प्रदेश,राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली झाल्यामुळे या राज्यांचे मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व वाढणार आहे. त्यामुळे सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांची डोकेदुखी आणखीच वाढली आहे. मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असलेल्या काँग्रेसच्या सदस्याची वाढलेली अपेक्षा कशी पूर्ण करायची हा पेच काँग्रेसश्रेष्ठींपुढे पडला आहे. आज सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. त्यात हा गुंता सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. उद्या, पं. जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकणार नाही. त्यामुळे गुरुवारीच उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी होऊन खातेवाटप केले जाण्याची शक्यता आहे.