Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

राज्यकर्त्यांचे औदार्य अन् आरोग्य विद्यापीठाचे साजरे डोंगर!
अभिजीत कुलकर्णी
नाशिक, २६ मे

 

संशोधन प्रकल्प, महाविद्यालय, रुग्णालय वा तत्सम उपक्रमांसाठी भविष्यात जागेची आवश्यकता भासणार असल्याने ‘या समोरच्या टेकडय़ा तुम्हाला घ्या’, असे औदार्य दस्तुरखुद्द शरद पवारांनी दाखविल्याला पाच वर्षे उलटून सुद्धा या टेकडय़ा म्हणजे ‘दुरून डोंगर साजरे’ असल्याची अनुभूती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला घ्यावी लागत असल्याच्या पाश्र्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी, विद्यापीठातर्फे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव आल्यास त्याला विनाविलंब मान्यता देण्याचे नव्याने केलेले सूतोवाच ही देखील बोलाचीच कढी ठरणार की काय, अशी शंका वैद्यकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
विद्यापीठाचा आठवा पदवीदान सोहळा सोमवारी येथील महाकवी कालीदास कलामंदिरात पार पडला. या निमित्त येथे आलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री व विद्यापीठाचे प्र-कुलपती राजेश टोपे यांनी विद्यापीठाकडून स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव आल्यास त्याला लगेच मान्यता दिली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, वास्तवात विद्यापीठाने राज्य नियोजन मंडळाच्या ११ व्या आराखडय़ासाठी दोन वर्षांपूर्वीच नाशिक येथे आपल्या एम.बी.बी.एस. तसेच आयुर्वेद महाविद्यालयांसाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले असून त्याची माहिती मंत्रीमहोदयांना कशी नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच टोपे यांच्या या सूचनेमुळे सुमारे पाच वर्षांपूर्वीच्या अशाच औदार्याच्या आठवणींनाही उजाळा मिळत आहे.
विद्यापीठाला भविष्यातील विविध विधायक प्रकल्पांसाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता भासेल, हे हेरून विद्यापीठाच्या वास्तुप्रवेश सोहळ्यास जातीने हजर असलेल्या शरद पवारांनी, ‘समोरच्या टेकडय़ा तुम्हाला घ्या’ असे सांगितले होते. त्यामुळे उत्साहाच्या भरात विद्यापीठातर्फे लगोलग तसा प्रस्तावही शासनाकडे पाठविला गेला. मात्र, अद्याप जिल्हा प्रशासन व विभागीय आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरच तो रेंगाळत पडल्याचे सांगण्यात येते. राज्यकर्त्यांच्या दिलदारपणाचा असा ‘चांगला’ अनुभव घ्यावा लागल्यानेच की काय, आता टोपे यांनी दाखविलेल्या औदार्याकडेही त्याच दृष्टीने बघितले जात आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या यंत्रणेकडून मात्र टोपे यांच्या या सूचनेचे स्वागत करण्यात येत आहे. विद्यापीठाकडे सध्या ५५ एकर जागा असून महाविद्यालय उभारणीसाठी २५ एकर जागेची आवश्यकता असते, त्यामुळे जागेचा प्रश्न तूर्त भेडसावणार नाही, असे प्रभारी कुलसचिव सुनील फुगारे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. टोपे यांची सूचना सर्वाच्याच हिताची असल्याचे सांगताना विद्यापीठ त्यासाठी पाठपुरावा करेल असेही ते म्हणाले. राज्य नियोजन मंडळाच्या ११ व्या आराखडय़ासाठी दोन वर्षांपूर्वीच विद्यापीठाने महाविद्यालय उभारणीसाठी सुमारे १०० कोटीचा प्रस्ताव सादर केला आहे. एम.बी.बी.एस. आणि आयुर्वेद अशा दोन्ही विद्याशाखांची महाविद्यालये सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.