Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पाचशेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना
रेल्वेचा मासिक पास २० रुपयांत
नवी दिल्ली, २६ मे/खास प्रतिनिधी

 

परंपरेला छेद देत नवा पायंडा पाडत आज राजधानी दिल्लीऐवजी कोलकात्यातील पूर्व रेल्वेच्या मुख्यालयात रेल्वे मंत्रीपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी महिन्याला पाचशे रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कष्टकऱ्यांना रेल्वे प्रवास करणे शक्य व्हावे म्हणून २० रुपयांचा मासिक पास देण्याची घोषणा केली.
रोजगारासाठी गावातून शहरात येणाऱ्या असंघटित क्षेत्रातील गरीब कामगारांना रेल्वेप्रवासाचे स्वातंत्र्य मिळावे म्हणून ही सुविधा देण्यात येत आहे, अशी घोषणा ममता बॅनर्जी यांनी पदाची सूत्रे स्वीकारताना केली. या मासिक पासच्या माध्यमाने गरीब कामगारांना दिवसाला १०० किमी अंतरापर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे.
बॅनर्जींनी सूत्रे स्वीकारली तेव्हा त्यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष एस. एस. खुराणा तसेच दक्षिण पूर्व, पूर्व आणि कोलकाता मेट्रो रेल्वेचे अधिकारी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आपण बंगालच्या असलो तरी भारताच्या अन्य भागांतील रेल्वेच्या विकासात आपल्याला स्वारस्य नाही, असा समज व्हायला नको, असे ममता बॅनर्जींनी स्पष्ट केले. कोलकाता-लुधियाना मालवाहतूक कॉरिडॉरची निर्मिती पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. रेल्वेचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासू नये म्हणून आपण गेल्या काही दिवसात अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी अनेकदा चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढचे काही दिवस कोलकात्यात राहणे शक्य व्हावे म्हणून ममता बॅनर्जी कोलकात्यातील कार्यालयातूनच रेल्वे मंत्रालयाचे कामकाज हाताळणार आहेत.