Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

१५ रुपयांची पाण्याची बाटली २५ रुपयांना!
कामत हॉटेल व धारीवाल इंडस्ट्रीजला ग्राहक मंचचा दणका
जयंत धुळप
अलिबाग,२६ मे

 

सर्वत्र १५ रुपये किमतीला विकत मिळणारी धारीवाल इंडस्ट्रीज निर्मित ‘ऑक्सिरीच’ पिण्याच्या पाण्याची बाटली ‘विठ्ठल कामत हॉटेल’ मध्ये तब्बल दहा रुपये ग्राहकांकडून अधिक उकळून २५ रुपये अशा अवास्तव व गैरवाजवी किमतीस विक्री करून ग्राहकांची पिळवणूक केल्या प्रकरणी हॉटेलचे संचालक विठ्ठल गोविंद कामत आणि म़े धारीवाल इंडस्ट्रीज लि़ चे संचालक रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दोषी ठरविले आह़े
अभियांत्रिकी सल्लागार प्रल्हाद पाडळीकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या सुनावणीअंती शारीरिक, मानसिक त्रासापोटी व न्यायिक खर्चापोटी पाच हजार रुपये या उभयतांनी ४५ दिवसांच्या आत, तक्रारदारास द्यावेत व स्वत:चा खर्च स्वत: सोसावा़ या आदेशाचे पालन या उभयतांनी न केल्यास ही रक्कम द.सा.द. शे. ८ टक्के व्याज दराने वसूल करण्याचा अधिकार पाडळीकर यांना राहील, असा अंतिम निकाल मंचचे अध्यक्ष आऱ डी़ म्हेत्रस व सदस्य बी़ एम़् कानिटकर यांनी दिला आह़े बाजारात उपलब्ध किमतीपेक्षा जादा किंमत लावून ती बाटली विकू नये, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आह़े
२३ जानेवारी २००९ रोजी पाडळीकर आपल्या दोघा सहकाऱ्यांसह या हॉटेलमध्ये न्याहरीसाठी थांबले होत़े न्याहरीतील पदार्थाचे व ऑक्सिरिच पाण्याच्या बाटलीचे मिळून १४५ रुपये काऊंटरवर आगाऊ भरून प्राप्त कुपन्स द्वारे ‘सेल्फ सव्‍‌र्हिस’ पद्धतीने सर्व खाद्यपदार्थ व पाण्याची बाटली त्यांनी घेतली़ न्याहरी करत असताना पाण्याच्या बाटलीकडे त्यांचे लक्ष गेले असता त्यावर ‘दि़ २३-१०-०८ बी १७९ रु.२५/- स्पेशली पॅक्ड फॉर कामत हॉटेल’ असे छापलेले दिसल़े प्रत्यक्षात ही पाण्याची बाटली अन्यत्र १५ रुपयास असताना येथे २५ रुपये का? असे हॉटेल व्यवस्थापकास पाडळीकर यांनी विचारले असता, धारीवाल इंडस्ट्रीजने आमच्या हॉटेलचे नाव छापून बाटली आम्हास २५ रुपयांस विकण्यास संमती दिली असल्याचे त्याने सांगितल़े या उत्तराने समाधान न झाल्याने पाडळीकर यांनी धारीवाल इंडस्ट्रीजच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधल्यावर, त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली़ परिणामी हे दोघेही संगनमत करून सर्वसामान्य ग्राहकांना वेठीला धरीत आहेत व बेकायदेशीररीत्या बेहिशेबी आर्थिक फायदा करून घेतला आहे व घेत आहेत असे पाडळीकर यांचे म्हणणे होत़े
दरम्यान, पाण्याच्या बाटलीची किंमत २५ रुपये ही बरोबर आहे. पाण्याच्या बाटलीची किंमत ग्राहक कायद्याखाली येत नाही. हॉटेलमधील मालाच्या किमती ठरविण्याचा अधिकार ग्राहक न्यायालयास नाही. तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक होत नाही, असा युक्तिवाद हॉटेल व धारीवाल यांच्या वकिलांनी सुनावणीच्या वेळी केला़
यावेळी सर्वोच्च न्यायालयातील एका निकालाचाही संदर्भ विचारात घेण्यात आला़ पाडळीकर यांच्या वतीने अ‍ॅड़ संजीव जोशी व अ‍ॅड़ सचिन जोशी यांनी काम पाहिल़े प्रल्हाद पाडळीकर या जागरूक ग्राहकामुळे नामांकित उद्योगांकडून ग्राहकांची होणारी पिळवणूक या निमित्ताने उघड झाली आह़े राष्ट्रीय महामार्गावरील सर्वच हॉटेल्समध्ये सर्रास चढ्या दराने मालाची विक्री होत असते. परंतु वेळेअभावी ग्राहक तक्रारीच्या फंदात पडत नाही, त्याचाच फायदा अनेकदा विक्रेते उठवितात़ हे योग्य नाही. म्हणूनच मी तक्रार दाखल केली होती. त्यास न्याय मिळाला याचे मोठे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया पाडळीकर यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केली आह़े