Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

प्रादेशिक

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर;
मुंबईतून कंदर्प खांडवाला प्रथम
मुंबई, २६ मे / प्रतिनिधी
‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ने (सीबीएसई) वतीने चेन्नई (महाराष्ट्रासहीत), अजमेर व पंचकुला या विभागांतील दहावीचे निकाल जाहीर केले आहेत. सांताक्रुझ येथील आर. एन. पोदार स्कूलच्या कंदर्प खांडवाला याने ९८.०६ टक्के गुण मिळवून मुंबईतून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर याच शाळेतील प्रियांका पाटील या मुकबधीर विद्यार्थिनीने ९२ टक्के गुण मिळविले आहेत.

डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे स्थलांतर केल्यास नगरसेविकेचा बेमुदत उपोषणाचा इशारा
डोंबिवली, २६ मे/प्रतिनिधी
‘पालिकेचे फडके रोडवरील ग्रंथसंग्रहालय हे फडके रोड परिसरातच राहिल. ते कोठेही स्थलांतरित करू दिले जाणार नाही आणि तसा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केलाच तर मी त्यास कडाडून विरोध करीन. वाचक, सदस्य, नागरिकांनी ग्रंथसंग्रहालय स्थलांतर होणार नाही यावर विश्वास ठेवावा,’ असे आवाहन शिवमार्केट प्रभागाच्या स्थानिक नगरसेविका प्राची शुक्ल यांनी केले आहे. तर, टिळकनगर प्रभागाच्या नगरसेविका मंगला सुळे यांनी नागरिकांची गैरसोय करून ग्रंथालय हलविण्याचा प्रयत्न केला तर चार हजार सदस्य नागरिकांना बरोबर घेऊन बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पालिकेला दिला आहे.

राजकारणात येण्याचा तूर्तास तरी विचार नाही - अश्विन नाईक
मुंबई, २६ मे / प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कुख्यात गुंड अश्विन नाईक राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. मात्र राजकारणात येण्याचा सध्यातरी आपला विचार नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करून नाईकने या चर्चेला तूर्तास तरी पूर्णविराम दिला आहे. ‘डॉन’ म्हणून असलेली ओळख पुसायची असून युवा, खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी भरीव कामगिरी करून नवीन ओळख निर्माण करण्याची इच्छाही नाईक याने व्यक्त केली.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानादरम्यान
दुसऱ्या टप्प्यात १०३५ गावांमध्ये होणार लोकाधारित देखरेख !
मुंबई, २६ मे/प्रतिनिधी
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या लोकाधारित देखरेख प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकुण १३ जिल्ह्य़ांमधील १०३५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्य़ांमधील २२५ गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात त्याची व्याप्ती वाढवून या पाच जिल्ह्य़ांमधील ४५० तसेच नव्याने निवडलेल्या ८ जिल्ह्य़ांमधील ३६० गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय निबंधस्पर्धा
ठाणे, २६ मे / प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय खगोल वर्षांनिमित्ताने मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय निबंध लेखन व विज्ञान कथा लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग, इनरव्हील क्लब-ठाणे, रोटरी क्लब -ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिण्यात आल्या आहेत. मराठी व इंग्रजी भाषेतील निबंध स्पर्धेसाठी पाठवता येणार आहेत.

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाची उकल; दोघांना अटक, पाच जण फरारी
३० लाखांची सुपारी
मुंबई, २६ / प्रतिनिधी
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे नातेवाईक पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणाची उकल करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले असून विभागाच्या युनिट पाचच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. निंबाळकर यांच्या हत्येसाठी ३० लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात पुढे आल्याची माहिती सहआयुक्त (गुन्हे) राकेश मारिया यांनी आज दिली.

पोलिसांना कमांडो प्रशिक्षण सक्तीचे
मुंबई, २६ मे / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि गडचिरोली भागातील नक्षलवाद्यांच्या उच्छादाच्या पाश्र्वभूमीवर यापुढे पोलिसांना कमांडो प्रशिक्षण सक्तीचे करण्यात येणार असल्याची माहिती आज अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) पी. पी. श्रीवास्तव यांनी दिली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज सहा महिने पूर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्रीवास्तव बोलत होते.

विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना ५० हजारांची लाच घेताना अटक
मुंबई, २६ मे / प्रतिनिधी

शहापूर येथील एका बीएड महाविद्यालयाला झुकते माप देण्याचे आश्वासन देऊन त्या बदल्यात संबंधित संस्थाचालकाकडून लाच घेताना मुंबई विद्यापीठाच्या संलग्नता विभागाचे उपकुलसचिव प्रकाश गोसावी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली. अत्यंत महत्त्वाच्या अधिकारपदावरील व्यक्तीलाच अटक केल्याने विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अमराठी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा
मुंबई, २६ मे / प्रतिनिधी

राज्यात इंग्रजी, ऊर्दू व इतर अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. यंदा इयत्ता पहिलीसाठी हा विषय लागू करण्यात येणार आहे. पहिलीच्या वर्गातील हे विद्यार्थी जसेजसे उत्तीर्ण होत जातील तसतसे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या इयत्तांसाठी हा निर्णय टप्प्याटप्प्यांत लागू करण्यात येईल. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे’ने (एससीईआरटी) अभ्यासक्रम तयार केला आहे. अमराठी माध्यमाच्या शाळांतील मुलांना आपल्या भोवतालच्या परिसराशी भाषिक, सामाजिक आणि भावनिक समायोजन करण्यासाठी मराठी भाषा शिकण्यास मदत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘मेहता यांनी ‘ती’ मालमत्ता भेट दिली होती’
मुंबई, २६ मे/प्रतिनिधी

कामगार नेते आर. जे. मेहता यांनी कारमायकेल रोडवरील गिरीराज सोसायटीमधील विवादित फ्लॅट व गॅरेज २६ एप्रिल २००१ रोजी मला भेट म्हणून दिला होता. त्याबाबतची कागदपत्रे उपलब्ध आहेत. परंतु मेहता यांचे पुत्र किरण हे मला मानसिक व शारीरिक त्रास देण्याकरिता वारंवार सर्वत्र तक्रारी करीत असल्याचे स्पष्टीकरण इंजिनियरिंग मजदूर सभेच्या अध्यक्षा चाँदबीबी झैदी यांनी केले आहे. दैनिक ‘लोकसत्ता’च्या २१ मे २००९ च्या अंकात ‘आर. जे. मेहता यांच्या पश्चात युनियनची मालमत्ता चाँदबीबीने लाटली ?’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबद्दल चाँदबीबी म्हणतात की, मेहता यांनी गिरीराज सोसायटीमधील फ्लॅट व गॅरेज आवश्यक कागदपत्र (गिफ्ट डीड) बनवून व ते रजिस्टर्ड करून मला भेट दिला आहे. ही बाब किरण मेहता यांनी लपवून ठेवली. मेहता यांनी ९ ऑगस्ट २००८ रोजी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे येथे व २० ऑगस्ट २००८ रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे याच विषयात तक्रार नोंदविली होती. त्या तक्रारींचा तपास सुरू असून तेथे मी माझी बाजू मांडण्याकरिता सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. परंतु तेथील तपास संपण्याची वाट न पाहता किरण मेहता यांनी १० सप्टेंबर २००८ रोजी अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी यांच्या ३८ वे न्यायालय येथे तक्रार दाखल केली. ही तक्रार सहा वर्षांनंतर का केली याचा खुलासाही त्यांनी केलेला नाही.

विलेपार्ले येथे ७२ लाखांची चोरी
मुंबई, २६ मे / प्रतिनिधी

विलेपार्ले येथे रविवारी मध्यरात्री दागिन्यांचे दुकान तोडून दीड लाख रुपयांच्या रोख रकमेसह ७० लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर दुकानाचे दोन पहारेकरी फरारी असून पोलिसांना त्यांच्यावर संशय आहे विलेपार्ले पूर्वेच्या अग्रवाल बाजारामधील श्यामकमल इमारतीत असलेल्या वर्धमान ज्वेलर हे दागिन्यांचे दुकान रविवारी रात्री काही अज्ञात चोरटय़ांनी तोडून त्यातील सुमारे ७० लाख रुपयांच्या दागिन्यांसह दीड लाख रुपये लुटून पोबारा केला. घटनेनंतर अशोक सिंग व कृपाशंकर सिंग हे दोन पहारेकरी फरारी आहेत.

विमानतळ चोरीप्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही
महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडल्याचा पोलिसांचा दावा
मुंबई, २६ मे / प्रतिनिधी

मुंबई विमानतळावर सोमवारी भरदिवसा झालेल्या १४५ किलोंच्या सोन्या-चांदीच्या चोरीप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र याप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे सापडले असून चोरटय़ांना लवकरच अटक करण्यात आल्याचा दावा सहआयुक्त (गुन्हे) राकेश मारिया यांनी आज केला. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुंबई विमानतळावरील एअर इंडियाच्या कार्गो रूममधून सशस्त्र बुरखाधारी चोरटय़ांनी १४५ किलोंचे सोने लुटून नेले होते. या वेळी चोरटय़ांना प्रतिकार करणाऱ्या एअर इंडियाच्या पहारेकऱ्याचा मृत्यू झाला होता.विमानतळावरील कडेकोट सुरक्षाव्यवस्था भेदून चोरटय़ांनी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात सोन्या-चांदीचा साठा चोरून नेल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याप्रकरणी पोलीसही चोरटय़ांचा युद्धपातळीवर शोध घेत असून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा मारिया यांनी आज केला. मात्र त्याबाबत खुलासा करण्यास त्यांनी नकार देत लवकरच चोरटय़ांना अटक करण्याचे मारिया यांनी सांगितले.