Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

चक दे! रग्बी..
निवेदिता सावंत/मनाली धुमाळ

‘नाजूक’ हे सर्वसाधारण विशेषण धुडकावून मेकअपऐवजी मैदानातील धूळ अंगावर घेत रांगडय़ा आणि मर्दानी समजल्या जाणाऱ्या रग्बी खेळात मुली आता आपला ठसा उमटविण्याची उमेद बाळगून आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या वय वर्षे १५ ते २२ वयोगटातील २० मुलींमधून भारताची पहिली रग्बी टीम निवडण्यात येणार असून या क्रीडापटू आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी इथूनच थेट थायलंडला रवाना होणार आहेत. सध्या या खेळाडूंचा मुंबईत जोरदार सराव सुरू असून बॉम्बे जिमखान्यावर चक्क ‘चक दे रग्बी’ असे वातावरण आहे.

खासगी वाहनांना शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे परवाने
*विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होणार
*३० जूनपर्यंत वाहनांची नोंदणी
कैलास कोरडे
मुंबई महानगर क्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांची सुमो, मारुती व्हॅन, क्वॉलिस यासारख्या वाहनांतून आजवर होणारी अवैध वाहतूक लवकरच अधिकृत होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी ठराविक छोटय़ा खासगी वाहनांना परवाने देण्याचा निर्णय ‘मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणा’ने (एमएमआरटीए) नुकताच घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील हजारो पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘एमएमआरटीए’च्या १८ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, येत्या ३० जूनपर्यंत छोटय़ा वाहनांना ‘खासगी शालेय वाहन’ म्हणून परवाने दिले जाणार आहेत.

मराठी पडद्यावर अमिताभ, धर्मेद्र आणि जितेंद्र
प्रतिनिधी

अमिताभ, धर्मेद्र, जितेंद्र यांच्या अभिनयाच्या शैलीप्रमाणे त्यांचा पेहरावही विशिष्ट पद्धतीचा असे. अमिताभची बेलबॉटम पँट, जितेंद्रची घट्ट बसणारी पांढऱ्या रंगाची पँट या स्टाईल्स त्या काळातील तरुणाईमध्ये लोकप्रिय होत्या. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘लाडीगोडी’ चित्रपटात जुन्या काळातील अमिताभ, धर्मेद्र, जितेंद्र तसेच रेखा, हेमा आणि श्रीदेवी पडद्यावर अवतरणार आहेत. यातील अमिताभ, धर्मेद्र आणि जितेंद्र यांच्या भूमिका अनुक्रमे तुषार दळवी, संजय नार्वेकर आणि सुबोध भावे साकारणार आहेत. रेखाच्या व्यक्तिरेखेत वर्षां उसगावकर हेमा म्हणून क्रांती रेडकर तर रेशम टिपणीस श्रीदेवीच्या रुपात दिसणार आहेत.

खाडी मुखातील गाळामुळे चारकोप-गोराई होणार जलमय?
प्रतिनिधी

चारकोप व गोराई परिसरातील नालेसफाई समाधानकारक झाली नसल्याने पावसाळ्यात हा परिसर जलमय होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा परिसर गोराई खाडीच्या जवळ असल्याने तेथे अधिक धोका असल्याचे बोलले जात आहे. गोराई खाडीच्या मुखातील गाळ अजूनही काढण्यात आलेला नाही. या खाडीला येऊन मिळणाऱ्या नाल्यांची सफाईही अजून झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात या परिसरात पाणी साचणार, अशी भीती स्थानिक रहिवासी व्यक्त करीत आहेत. हा परिसर समुद्र सपाटीपासून जवळ असल्याने मुसळधार पाऊस पडला तर गोराई, चारकोप पाण्याखाली जाईल, असे पालिका अधिकाऱ्याने खासगीत मान्य केले.

मतदान न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी

लोकशाही प्रक्रियेतील निवडणुका हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असताना मतदानात लोकांनी दाखविलेली उदासीनता चिंताजनक असून विशेषत: सर्व उद्योगधंदे आणि सरकारी कार्यालये बंद ठेवूनही ज्या कर्मचाऱ्यऋंनी मतदान केले नाही, अशा कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांचा दोन दिवसांचा पगार कमी करण्यात यावा, अशी मागणी ठाणे लघुउद्योजक संघटनेने केली आहे. लोकसभेसाठी देशात नुकत्याच निवडणुका झाल्या.

छोटी संकल्पना मोठय़ा संधीमध्ये परिवर्तित करून दाखविण्यातच जिद्द आणि दूरद्रष्टेपणा असतो - डॉ. माशेलकर
प्रतिनिधी
‘इनोव्हेशन’ म्हणजे एखाद्या गोष्टीत निराळ्या पद्धतीने बदल घडवून आणणे आणि अशक्य गोष्ट शक्य करून दाखविणे. ‘इनोव्हेशन लीडर’च्या विचारसरणीत वेगळेपणा असतो. छोटी संकल्पना मोठय़ा संधीमध्ये परिवर्तत करून दाखविण्यीच जिद्द आणि दूरद्रष्टेपणा असतो, असे मत ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी अलीकडेच येथे व्यक्त केले.

जयंतीदिनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीच्या चार पुस्तकांचे प्रकाशन
प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त गुरूवार २८ मे रोजी संध्याकाळी ६.३० वाजता ब्राह्मण सभा (पंडितवाडी), गांधीचौक, कल्याण (प) येथे एपिक स्वीप ऑफ व्ही. डी. सावरकर, माय लाइफ टर्म, स्वातंत्र्यवीर सावरकरांची गरूडझेप आमि एक झंझावात-शत्रूच्या शिबिरात या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील दोन इंग्रजी आणि दोन मराठी पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. पुण्यातील कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टने ही पुस्तके संपादित केली असून त्याची प्रकाशनपूर्व किंमत २५० रूपये आहे. विवेक साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक आबासाहेब पटवारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात चार पुस्तकांच्या या संचाचे वितरणही केले जाईल. संपर्क-दत्तात्रय कुलकर्णी-९९६९२७०५०५.

साठय़े महाविद्यालयात प्राचार्य परिषद
प्रतिनिधी

विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयातर्फे १ व २ जून रोजी प्राचार्याची परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत नॅक समोर सादर करावयाच्या स्वयंपरीक्षण अहवालाच्या तयारीबाबत तसेच पीअर टीम याबाबत ओळख करून देण्यात येणार आहे. अजूनपर्यंत ज्या महाविद्यालयांनी ‘नॅक’कडून मूल्यांकन करून घेतलेले नाही, अशा महाविद्यालयांच्या प्राचार्याना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्याची नॅक मूल्यांकनासाठी र्सवकष मानसिकता तयार करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. या परिषदेमध्ये मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. जे. एस. सहारिया, उच्च शिक्षण संचालक किर्दक आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले यांच्या हस्ते होणार आहे. प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत हे बीजभाषण करतील, असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता रेगे यांनी पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अधिक माहितीसाठी उपप्राचार्या सुरेखा सारंगधर (९८७०४९९९४३) व उपप्राचार्य डॉ. माधव राजवाडे (९८६९७२८०६४) यांच्याशी संपर्क साधावा.