Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

.. तर ‘निळवंडे’चे काम कायमचे बंद - पिचड
कृती समितीचे उपोषण
अकोले, २६ मे/वार्ताहर

पुनर्वसनाच्या आदर्श ‘निळवंडे पॅटर्न’ला काळीमा फासण्याचे काम काही अधिकारी करीत असल्याचा आरोप आमदार मधुकरराव पिचड यांनी केला. निळवंडे धरणाचे काम बंद पडू द्यायचे नसेल, तर आठवडाभरात विस्थापितांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा; अन्यथा धरणाचे काम कायमचे बंद पाडले जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

कांदाउत्पादकांना २६ लाखांचा गंडा; दोन व्यापाऱ्यांना पोलीस कोठडी
पारनेर, २६ मे/वार्ताहर
थेट शेतात जाऊन चढय़ा दराने कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी तालुक्यातील ७० कांदाउत्पादकांना तब्बल २६ लाख रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुभाष कोंडिबा मुळुक व विठ्ठल खंदक (दोघेही राहणार चासकमान, ता. खेड, जि. पुणे) या दोन भामटय़ांना अटक केली. या दोन्ही आरोपींना दि. २९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

निवृत्त आदर्श शिक्षिका पुष्पाताई कळमकर यांचे निधन
नगर, २६ मे/प्रतिनिधी
निवृत्त आदर्श शिक्षिका पुष्पाताई दादाभाऊ कळमकर यांचे आज सायंकाळी पुणे येथील रुग्णालयात निधन झाले. त्या ६३ वर्षांच्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांच्या त्या पत्नी होत. पुष्पाताई यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

नगरच्या एका इतिहास संशोधकाचं स्मरण
भूषण देशमुख, नगर, २६ मे

मध्ययुगीन भारताच्या, विशेषत नगरच्या निजामशाहीच्या इतिहासात मोलाची भर घालणारे इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद गद्रे यांची अमेरिकेत दहशतवाद्यांकडून झालेल्या हत्येच्या दुर्दैवी घटनेला २५ वर्षे झाली. त्यांच्या स्मरणार्थ नगर शहराच्या स्थापनादिनी (२८ मे) ‘किल्ला प्रदक्षिणा’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

प्रशासन कायदेशीर सल्ला घेणार स्वीकृत सदस्य मोहन कदम यांची निवड वादग्रस्त
नगर, २६ मे/प्रतिनिधी

स्वीकृत सदस्य व दोन समित्यांच्या निवडीवरून महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या विरोधात विरोधी सेना-भाजप युती न्यायालयात जावो किंवा न जावो, प्रशासन मात्र एका स्वीकृत सदस्याच्या निवडीबाबत कायदेशीर सल्ला मागण्याच्या तयारीत आहे.

पोलिसांच्या बदल्यांसाठी आज समितीसमोर मुलाखती
नगर, २६ मे/प्रतिनिधी
निवडणूक आचारसंहिता संपताच जिल्ह्य़ातील पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुमारे १५० बदल्यांसाठी उद्या (बुधवारी) पोलीस मुख्यालयात मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

नगरमध्ये उद्या ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळावा
नगर, २६ मे/प्रतिनिधी
येथील क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूलमध्ये गुरुवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेविका शैला कदम यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, माजी नगरसेवक रूपसिंग कदम, आधार संस्थेचे अध्यक्ष लुकस पाटोळे, विजया जाधव, जॉर्ज क्षेत्रे यावेळी उपस्थित राहणार आहेत. साप्ताहिक उपदेशक व दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान (संगमनेर) यांच्या वतीने हा मेळावा होणार असल्याचे संयोजक श्रीधर भोसले यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर मुरकुटे, पठारे कर्मचारी प्रतिनिधी
नगर, २६ मे/प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर कर्मचारी प्रतिनिधी म्हणून बाजीराव मुरकुटे व मधुकर पठारे यांची नियुक्ती करण्यात आली. संचालक मंडळाच्या काल (सोमवारी) झालेल्या सभेत कर्मचारी संघटनेच्या शिफारशीनुसार मुरकुटे व पठारे यांच्या निवडीला मान्यता देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले होते. कार्यकारी संचालक के. टी. पावसे यांनी या दोघांचे स्वागत केले. संचालक बाजीराव खेमनर यांच्यासह कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस मधुकर खेडकर, कार्याध्यक्ष धनंजय भंडारे, बाळासाहेब भोसले, श्रीकृष्ण येणारे आदी यावेळी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा प्राधान्याने प्रयत्न करू, असे मुरकुटे यांनी निवडीनंतर सांगितले.

राहुरीत ३५ हजार कांदा गोण्यांची आवक
राहुरी, २६ मे/वार्ताहर

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे ३५ हजार ३१७ कांदा गोण्यांची आवक झाली. पावसाळ्याच्या तोंडावर भुसारात साठवून ठेवलेला कांदा विक्री करण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली. मागील आठवडय़ापेक्षा आवक मंदावली. बाजारभाव असे - क्रमांक एक ४५० ते ६५० रुपये, क्रमांक दोनसाठी २७१ ते ४५० रुपये, क्रमांक तीनसाठी १०० ते २७५ रुपये, गोल्टी कांदा १५० ते ५०० रुपये. संगमनेर, कोपरगावसह नाशिक, औरंगाबाद, वैजापूर भागातील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. नवीन कांदा लागवडीची तयारी राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पूर्वमशागती करून ठेवल्या आहेत. या वर्षीही कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. कांद्याच्या रोपांनाही मागणी वाढली आहे.

जातेगाव-राळेगण रस्त्याचे काम अर्धवट
वाडेगव्हाण, २६ मे/वार्ताहर
जातेगाव-राळेगणसिद्धी रस्त्याचे डांबरीकरण अर्धवट स्थितीत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर वाहने घसरतात. त्यामुळे अनेकांना दुखापत झाली आहे. संबंधित विभागाने रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालविणे अवघड झाले आहे. जातेगावपासून डांबरीकरणास प्रारंभ झाला, तो घाटापर्यंत झाला. त्याचे काम अर्धवट असल्याने वाहनचालकास कसरत करावी लागते. रस्त्यावर खडी पडल्याने वाहने घसरतात. त्यामुळे दुचाकीस्वार जखमी होत आहेत. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी युवा नेते रमेश औटी, नानाभाऊ मापारी, मच्छिंद्र लटांबळे, श्रीरंग गाजरे यांनी केली.

शेतक ऱ्यांना माफक दरात खते देणार
श्रीगोंदे, २६ मे/वार्ताहर

कुकडी साखर कारखान्यामार्फत सर्व रासायनिक खते शेतकऱ्यांना माफक दरात देण्यात येणार असल्याची माहिती ‘कुकडी’चे संस्थापक अध्यक्ष कुंडलिकराव जगताप यांनी दिली.
जगताप म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांना काळ्याबाजारात चढय़ा भावाने रासायनिक खते विकत घ्यावी लागत आहेत. त्यामुळे कारखान्यामार्फत सर्व रासायनिक खते कंपनीस संपर्क साधून शेतकऱ्यांना योग्य किमतीत रोखीने देण्याचा प्रयत्न आहे. सध्या बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याने ‘कुकडी’ने हा निर्णय घेतला आहे.

गफूर तांबोळी यांचे निधन
कोपरगाव, २६ मे/वार्ताहर
तालुक्यातील संवत्सर येथील गफूर बाबूलाल तांबोळी ऊर्फ पानवाले यांचे नुकतेच निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, मुली असा परिवार आहे. संजीवनी कारखान्याच्या बॉयलर विभागातील कर्मचारी मन्सून तांबोळी यांचे ते बंधू होत.

बाराशे क्युसेक वेगाने पाणी सोडण्याची मागणी
वाडेगव्हाण, २६ मे/वार्ताहर

डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती पूर्ण झाल्याने येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात पाणी सोडण्यात आले. परंतु ५००ऐवजी १२०० क्युसेक पाणी सोडले तरच ते शेतकऱ्यांना मिळेल. सरकारने १२०० क्युसेकने पाणी सोडण्याची मागणी कोहकडी येथील रत्नेश्वर पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष सुदाम पवार यांनी केली आहे. तालुक्याच्या हद्दीतून कुकडी कालवा जात असल्याने त्याचा लाभ १४ गावांना होतो. सध्या वाडेगव्हाण परिसरातून पिण्याच्या पाण्याचे टँकर भरले जातात. सरकारने १२०० क्युसेकने पाणी सोडले, तर त्याचा लाभ नागरिकांना मिळेल.

स्क्रिन लेसर शस्त्रक्रिया शिबिरास प्रतिसाद
संगमनेर, २६ मे/वार्ताहर

नाशिक येथील आदित्य लेसर सेंटर आणि येथील लायन्स क्लब सफायरच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्क्रिन लेसर शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ३५२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३२ रुग्णांना लेसर शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आल्याची माहिती प्रकल्पप्रमुख डॉ. प्रवीणकुमार दायमा यांनी दिली. त्वचेवरील विविध उपचारांसाठी घेण्यात आलेले राज्यातील अशा स्वरूपाचे हे पहिलेच शिबिर ठरले. येथील मंगलकृपा क्लिनिकमध्ये नाशिक येथील डॉ. मिलिंद देशमुख, डॉ. सदानंद नायक, डॉ. महाजन, तसेच डॉ. दायमा यांनी रुग्णांची तपासणी केली. लायन्स क्लबच्या वतीने अध्यक्ष सुभाष मणियार यांनी सर्व रुग्णांचे स्वागत केले. शिबिरात नगरसह, पुणे नाशिक व औरंगाबाद जिल्ह्य़ांतील रुग्ण तपासणीसाठी आले होते. रुग्णांची गरज लक्षात घेता अशा प्रकारचे शिबिर पुन्हा घेण्याचा मनोदय डॉ. दायमा यांनी व्यक्त केला.

दोन्ही बस नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना त्रास
पाथर्डी, २६ मे/वार्ताहर

नादुरुस्त झालेली एसटी बस बदलून दिल्यानंतर दुसरी एसटी बसही नादुरुस्त झाल्याने पश्चाताप करण्याची वेळ प्रवाशांवर आली. येथील आगाराचा विस्कळीत झालेला कारभार सुधारावा यासाठी मागील आठवडय़ात मनसेने आंदोलन केले होते. गेल्या वर्षांपासून आगाराला प्रमुख नसल्याने हा विस्कळीतपणा आला आहे. आष्टी आगाराची बस आज सकाळी सात वाजता औरंगाबादहून आली. पाथर्डीमार्गे ही बस जात असून नादुरुस्त झाल्याने या गाडीचे चालक श्रीनिवास जगताप यांनी ती आगारामध्ये दुरुस्तीसाठी नेली. या गाडीची दुरुस्ती होऊ शकत नाही असे कळल्यावर यासंदर्भात लेखी पत्र द्या, अशी मागणी जगताप यांनी केली. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी दुसरी बस घेऊन जा, असे सांगितले. यात प्रवाशांचा एक तास वाया गेला. दुसऱ्या बसमध्ये प्रवासी बसल्यानंतर गाडी माणिकदौंडी रस्त्यावरील चौकात बंद पडली. रेडिएटरमधून पाणी गळत होते, तर स्टेअरिंगसुद्धा फिरत नव्हते. चौकातच गाडी बंद पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. यामुळे मात्र प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

करोडीत आज ‘रास्ता रोको’
पाथर्डी, २६ मे/वार्ताहर

तालुक्यातील चिंचपूर सबस्टेशनमधून बारा तास वीज मिळावी, तिसगाव ते जांभळी रस्त्याच्या कामाची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी उद्या (बुधवारी) करोडी येथे ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा भाजपच अशोक गर्जे, माजी जि. प. सदस्य सोमनाथ खेडकर व पं. स. सदस्य भगवान आव्हाड यांनी दिला आहे. तालुक्यात सध्या मोठय़ा घरफोडय़ा होत आहेत. पागोरी पिंपळगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला असून, या प्रकाराची चौकशी गुप्तचर विभागामार्फत करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

न्या. शिंदे यांचा सत्कार
श्रीगोंदे, २६ मे/वार्ताहर

येथील वरिष्ठस्तर न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर शिंदे यांची मुंबई (माजगाव) येथे मेट्रोपोलिटन न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. साडेतीन वर्षे येथे न्यायाधीश असणाऱ्या शिंदे यांना सहकाऱ्यांनी भावपूर्ण निरोप दिला. निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठस्तर न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. पोंदकुले होते. दिवाणी न्यायाधीश विवेक गव्हाणे हेही या वेळी उपस्थित होते.

कर्जतला २९ मे पासून क्षमता बांधणी प्रशिक्षण
मिरजगाव, २६ मे/वार्ताहर

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए) व यशदा संस्थेच्या वतीने तालुक्यात दि. २९पासून मागास क्षेत्र अनुदान निधी क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित केले आहे. नगर येथील लाईफ लाईन हेल्थ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या सहकार्याने हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती डॉ. प्रशांत शिंदे यांनी दिली. लोकसहभागातून ग्रामीण मागासपण दूर करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश यामागे आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा व अंमलबजावणी, माहितीचा अधिकार अधिनियम-२००५, ग्रामपंचायत अंदाजपत्रक, वित्तव्यवस्थापन, ग्रामविकास आराखडा, मानवविकास निर्देशांक, शेतीपूरक व्यवसायांसाठी सेवासाहाय्य आदी विषयांवर यावेळी मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. दि. २९ कुळधरण व राशीन गट, दि. १ जून कर्जत गट व ५ जूनला मिरजगाव व चापडगाव गट अशा एकूण ९१ गावांमधील ८११ सरपंच, ग्रां. प. सदस्य व स्वयंसेवकांना हे तीन दिवशीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

खासदार गांधी यांचा आज नागरी सत्कार
श्रीगोंदे, २६ मे/वार्ताहर

नवनिर्वाचित खासदार दिलीप गांधी उद्या (बुधवारी) तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, प्रमुख गावांत त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शहरात संध्याकाळी मिरवणूक व नागरी सत्कार आयोजित केल्याची माहिती तालुकाध्यक्ष संतोष लगड यांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात गांधी यांनी जोरदार मुसंडी मारीत सुमारे २३ हजारांचे मताधिक्य मिळविले. त्यामुळे गांधींच्या या दौऱ्याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. सकाळी चिखलीपासून सुरू होणारा दौरा कोळगाव, घारगाव, बेलवंडी, लोणी, मढेवडगाव, चिंभळे, हंगेवाडी, लिंपणगावमार्गे दुपारी शहरात येईल. सायंकाळी ४ वाजता मिरवणूक व नंतर नागरिकांच्या वतीने गांधींचा सत्कार होईल, असे लगड म्हणाले. कार्यक्रमाला जिल्ह्य़ातील युतीचे पदाधिकारी, तसेच कुकडी कारखान्याचे अध्यक्ष कुंडलिकराव जगताप, राजेंद्र म्हस्के, दत्तात्रेय हिरनवाळे, बाळासाहेब महाडिक उपस्थित राहतील.

मुख्यमंत्र्यांना रांजणगाव मशीदला येण्याचे आमंत्रण
वाडेगव्हाण, २६ मे/वार्ताहर

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथे त्यांच्या मूळ गावी येण्याचे आमंत्रण जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
यासंदर्भात त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हेमंत ओगले, राहुल झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सचिन गायकवाड, जिल्हा समन्वयक संग्राम म्हस्के, सचिन काकाटे यांनी श्री. चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. लोकसभेतील काँग्रेसने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्य़ातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याचे निवेदन श्री. चव्हाण यांना देण्यात आले.

कोल्हारजवळ अपघातात चेन्नईचा साईभक्त ठार
कोल्हार, २६ मे/वार्ताहर
शिर्डीस साईदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मोटारीस मालमोटारीची धडक बसून चेन्नई (तमिळनाडू) येथील एक भाविक ठार, तर एका महिलेसह तीनजण गंभीर जखमी झाले. काल रात्री साडेअकरा वाजता नगर-मनमाड रस्त्यावर कोल्हारजवळ हा अपघात झाला. काल रात्री नगरहून शिर्डीकडे जाणारी व्ॉगन आर मोटारीला (आरजे १९ सीए ७४६३)शिर्डीहून येणाऱ्या मालमोटारीची (एमपी १४ एचबी ०९७५) जोरदार धडक बसली. अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. त्यात मोटारीतील प्रेमचंद भोजराज बोथरा (वय ५६) ठार झाले, तर राहुल शेखरचंद गोलेचा (वय २५), सखी प्रेमचंद बोथरा (वय ५२) व सिद्धार्थ प्रेमचंद बोथरा (वय २०, सर्व राहणार चेन्नई) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शिर्डी येथील साई संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर मोटारचालक फरारी झाला. जितेंद्र हिराचंद गोलेचा याने दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी मालमोटारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. सहायक पोलीस निरीक्षक पी. ए. घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रमेश धुमाळ, पोलीस नाईक बाळकृष्ण ठोंबरे, संदीप आघाडे व घोडेचोर तपास करीत आहेत.

संशयित मंगळसूत्रचोरांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी
नगर, २६ मे/प्रतिनिधी
तोफखाना पोलिसांनी सोमवारी रात्री भुतकरवाडी येथे पकडलेल्या दोघांना दि. २८पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. हे दोघे संशयित मंगळसूत्रचोर असावेत, असा अंदाज आहे. त्यातील एकजण अल्पवयीन आहे. न्यायाधीश घाटपांडे यांच्यासमोर फत्तेअली सैनू सय्यद (इराणी) व दुसरा अल्पवयीन मुलगा (रा. दोघेही वॉर्ड-१, इराणी गल्ली, श्रीरामपूर) यांना उभे करण्यात आले. पोलिसांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने या दोघांना दि. २८पर्यंत कोठडी दिली.