Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

अनेक गाडय़ांना विलंब; दोन रद्द
चक्रीवादळ व पंजाबमधील हिंसाचारामुळे सेवा विस्कळीत

नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी आलेल्या चक्रीवादळामुळे आणि पंजाबमधील हिंसाचारामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. जम्मूहून नागपूर मार्गे धावणाऱ्या दोन गाडय़ा रद्द करण्यात आल्या तर, हावडय़ाहून निघणाऱ्या अनेक गाडय़ा तीन ते पाच तास विलंबाने धावत आहेत.

सीबीएसई दहावीत भवन्सची वेदवती अलबाळ विदर्भातून अव्वल
मॉडर्नची नेहा कोंडेकर दुसरी तर तन्मय धोटे तिसरा

निकाल १०० टक्के
नागपूर, २६ मे/ प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाने (सीबीएसई) आज घोषित केलेल्या दहावीच्या निकालात भारती विद्या भवन्सची वेदवती हेमंत अलबाळ विदर्भातून ९८.६ टक्के गुण मिळवून प्रथम आली असून दुसरा व तिसरा क्रमांक कोराडी मार्गावरील मॉडर्न स्कूलच्या नेहा कोंडेकर आणि तन्मय धोटे यांनी पटकावला आहे. नेहाला ९८.२ टक्के तर तन्मयला ९८ टक्के गुण मिळाले.

मान्सून लांबण्याची शक्यता
नागपूर, २६ मे/ प्रतिनिधी

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी आलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात वेळेपूर्वी येणारा मान्सून किंचित लांबण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मे महिना संपल्यानंतरच राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे.अंदमानमध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर आठ दिवसात तो विदर्भात थडकतो.यावेळी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ातच अंदमानमध्ये पावसाळ्याला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने यंदा विदर्भात मान्सून वेळेवर येणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. तसे संकेतही मिळाले होते.

गुणवंतांचे मनोगत
वेदवतीचा विज्ञान शाखेकडे कल
‘मैत्रिणीचा फोन आला तेव्हा प्रवासात होते, माझा क्षणभर विश्वासच बसला नाही. अनेकांकडून शाहनिशा केली तेंव्हा विश्वास बसला’ वेदवती अलबाळने ‘लोकसत्ता’शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली तेव्हासुद्धा ती प्रवासातच होती. केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेत भारतीय विद्या भवन्सची वेदवती हेमंत अलबाळ ९८.६ टक्के गुण संपादन करून उत्तीर्ण झाली. ५०० पैकी ४९३ गुण मिळवणाऱ्या वेदवतीला तीन विषयात पैकीच्या पैकी गुण आहेत.

कुहीजवळ मोटारसायकलींची टक्कर ; तिघे गंभीर जखमी
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी
वेगात असलेल्या दोन मोटारसायकलींची टक्कर होऊन त्यात तिघे गंभीर जखमी झाले. कुहीपासून २२ किलोमीटर अंतरावरील माळवी गावाजवळ मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

विदर्भातील १ हजार ६०३ गावांना पुराचा धोका
नागरिकांच्या रक्षणासाठी प्रशासन सुसज्ज
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी
रणरणत्या उन्हाचे चटके सोसणाऱ्या वैदर्भीयांना आता मान्सूनला सामोरे जावे लागणार आहे. विदर्भात तब्बल १ हजार ६०३ गावांना पुराचा धोका संभवू शकतो. नागपूर विभागात १ हजार १४ तर अमरावती विभागात ५८९ गावे असून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.

डोनेशनविरुद्ध पालकांचा आवाज बुलंद
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

प्रवेश अर्ज, शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रम, प्रश्नपेढी, पालकसभा अशा विविध सबबी पुढे करून अनुदानित व खाजगी शाळाही आता विद्यार्थ्यांकडून पाचशे ते दहा हजार रुपयांपर्यंत बेकायदेशीर शुल्क वसुली करताना दिसत आहेत. ही रक्कम भरली नाही तर प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त करून डोनेशन घेणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

अकरावीचे प्रवेश अर्ज महागले
नागपूर, २६ मे/ प्रतिनिधी

दहावीचा निकाल जाहीर व्हायचा असला तरी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मात्र ११ साठी लागणाऱ्या प्रवेश अर्जाची किंमत ३५ रुपयांवरून ५० रुपये केली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय सध्या ११वीच्या प्रवेश कामात व्यस्त असून यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अकरावीच्या प्रवेश अर्जाची किंमत ३५ रुपयांवरून ५० रुपयांवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या माध्यमातून पन्नास हजारावर अर्जाची विक्री होते, अर्जाची किंमत वाढल्याने यंदा शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या महसूलात वाढ होणार आहे. मुंबई वगळता राज्यात सर्वच विभागात अर्जाची किंमत ५० रुपये असल्याने सगळीकडे एकसुत्रता राहावी म्हणून अर्जाची किंमत ५० रुपये करण्यात आल्याचा दावा शिक्षण उपसंचालकांनी केला आहे.

हास्य दरबारात अनेकांचा सत्कार
नागपूर, २६ मे/प्रतिनिधी

येथील हास्य दरबार व लाफ्टर क्लब, मंगळवारीच्यावतीने दीपक लालवानी यांच्या अध्यक्षतेखाली २४ मे रोजी हास्य दरबार आयोजित करण्यात आला होता. हास्य दरबारमध्ये निर्मला कनोजिया, चित्रा पैक, सविता गजवे यांना हास्य श्रीमतीचा पुरस्कार देण्यात आला. सविता गजवे, प्रमिला मुल्का, वीना नगरारे यांना ‘रॉक अ‍ॅन्ड रोल’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हास्ययोगच्या प्रोत्साहनाकरता किशोर थूथेजा, चेलाराम बहिलानी, डॉ. लक्ष्मी, सुरेंद्र गुप्ता, महेंद्र जैन, वेदप्रकाश मदान, ए.पी. सिंग, सुरेश माहेश्वरी, ओ.एन. राहाटे, डी.आर. पट्टीवार, बी.एम. लांजेवार, यशवंत हिरेखान, अशोक सेलारका, जी.एन. नंदेश्वर, पी.सी. अग्रवाल, डॉ. पतंगे, के.डी. दाबोलकर, पुष्पा बलारिया, देविका बोदेले, अंजन वाचनेकर यांना सन्मानित करण्यात आले.

परिचारकावर कारवाईसाठी पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा ‘लेखणी बंद’चा इशारा
हिंगणा, २६ मे / वार्ताहर

पंचायत समिती सभापतीच्या गाळ्यामध्ये राहणाऱ्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या परिचारकावर कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी खंडविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. परिचारकाने शिवीगाळ केल्याची तक्रार खंडविकास अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस चौकशी करीत आहेत. परिचारकावर कारवाई न झाल्यास उद्या, २७ मेपासून ‘लेखणी बंद’चा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

खैरे कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहोळा
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

जुनी शुक्रवारीतील समाज भवन सभागृहात खैरे कुणबी समाज सुधारक संस्थेने आयोजित केलेला सामूहिक विवाह सोहोळा पार पडला. या सोहोळ्याला माजी आमदार मोहन मते, नगरसेवक रमेश चोपडे, अ‍ॅड. रमेश कोठाळे, गोविंदराव मोंढे, नेमराज वांजेकर उपस्थित होते. खैरे कुणबी समाज सुधारक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत नवघरे व सचिव विजय तेलंग यांनी वर-वधूंना भटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. सोहोळ्याचे मुख्य संयोजक बबनराव जामुनकर व अशोक उताणे यांची यावेळी भाषणे झाली. हा सोहोळा यशस्वी करण्यासाठी जनार्दन कोल्हे, रमेश कुलकुले, कविश्वर खडसे, राजेश ठाकरे, चंद्रशेखर थुटे, महेश चौधरी, अ‍ॅड. दिनेश धोबे, रामराव भोयर यांनी परिश्रम घेतले.

रेणुका दुधे यांचे निधन
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी
नाईक रोड, महालातील रेणुका प्रवीण दुधे यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्या ४३ वर्षांच्या होत्या. गंगाबाई स्मशानभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली व बराच आप्तपरिवार आहे.

बुद्ध-आंबेडकर जयंती उत्साहात
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

लष्करीबागेतील भीमशक्ती युवा संघटनेतर्फे नुकतीच गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय धम्मसेनेचे अध्यक्ष रवी शेंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेनेचे उपाध्यक्ष दिनेश अंडरसहारे, नाना शेंडे, पंढरीनाथ बागडे, नागेश वानखेडे, डॉ. मनोज मेश्राम, धनंजय कांबळे उपस्थित होते. जयंती निमित्त लावणीसमाज्ञी कीर्ती आवळे व त्यांच्या संचाचा लावण्यांचा आणि सिद्धार्थ सरदार यांचा भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. रांगोळी स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद मेश्राम, संस्थेचे सचिव धनंजय कांबळे, सिध्दार्थ साखरे, विलास साखरे, नितीन बिहाडे, बापु कावलकर, धनराज सहारे, रोहित वाघमारे, विजय खोब्रागडे यांनी सहकार्य केले.

छायाचित्रांकन शिबिराचा समारोप
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

गुजराथी समाज व ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबद्वारे आठ ते पंधरा वयोगटातील मुलांसाठी गुजराथ भवन छायाचित्रांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अरुण कुळकर्णी, सुनील मांडवकर, चेतन जोशी, कमलेश वसानी, राजन गुप्ता, पंकज गुप्ता, दिनेश मेहर, सुनील पिंपळापुरे, प्रदीप निकम, सुरेश पारळकर, अभिषेक श्रीवास्तव यांनी शिबिरार्थीना छायाचित्रांशी संबंधित विषयांची माहिती दिली. उद्घाटनाच्यावेळी गुजराथी समाज नागपूरचे अध्यक्ष रजनीकांत गरिबा, महेंद्र मोदी, जगदीश ठकराल, किशोर गोरसिया, शब्बीरभाई किशोर बाना उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ता विचार परिषदेचा आंदोलनाचा इशारा
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

एसटी महामंडळातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाचव्या वेतनासंबंधीच्या त्रुटी दूर कराव्या व त्यानंतरच सहाव्या वेतन आयोगाबाबत चर्चा करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ता विचार परिषदेचे अध्यक्ष कामगार नेते रमेश साळुंके यांनी दिला.

फेमस बुकच्या नव्या दुकानाचा उद्या शुभारंभ
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

ग्रंथ रसिकांच्या सेवेसाठी फेमस बुक सेंटरच्या नवीन मराठी पुस्तकाच्या दुकानाचा शुभारंभ २८ मे रोजी होणार आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील मूक विद्यालयासमोर असलेल्या विजय आर्केडमध्ये सायंकाळी ७ वाजता ‘द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स, नवी दिल्लीचे कार्यकारी सदस्य अनिल मेहता, पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनचे प्रमुख व साहित्यिक राजीव बर्वे व साहित्यिक रवींद्र शोभणे उपस्थित राहणार आहेत. या दुकानाच्या शुभारंभप्रसंगी सर्व साहित्यप्रेमीनी उपस्थित राहावे, असे आवाहन फेमस बुक सेंटरचे प्रमोद मुळे यांनी केले आहे.