Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

नवनीत

जी व न द र्श न
असतो मा सद्गमय

 

अनेक वर्षे तपाभ्यास करून ऋषींना जे आत्मज्ञान झाले ते त्यांनी बृहदारण्यक उपनिषदाच्या तृतीय ब्राह्मणाच्या एकोणचाळिसाव्या मंत्रात व्यक्त केले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. मृत्यू असत् आहे. अमरत्व सत् आहे. मृत्यूतून अमरत्वाकडे जाणे हे माणसाचे सार्थ ध्येय आहे. ज्याला याचे यथार्थ ज्ञान झाले तो चिरंजीव आहे. आत्मज्ञानी ऋषींनी वस्तूंमध्ये सचेतन व अचेतन असा फरक केला. वास्तविक विश्व संपूर्ण सचेतन आहे ही आर्याची भावना आहे. त्यांच्या मते दगड किंवा लाकूड हेही सचेतन आहे. कारण त्यात काहीतरी स्थित्यंतर घडण्याची चेतना आहे. दगडात मूर्ती आहे. दगडातला नको असलेला भाग काढला की, मूर्ती प्रकटते. लाकडातूनच काष्ठशिल्प जन्मते. हे केव्हा घडते? वस्तूला चैतन्याचा स्पर्श झाला की, काहींच्या मते, एकच आत्मतत्त्व या विश्वात निरनिराळय़ा पातळय़ांवर प्रकटते. म्हणजे अचेतनात ते गुणरूपाने व्यक्त होते. सचेतनात प्रथम प्राणरूपाने व्यक्त होते. त्यातून मन आणि बुद्धी ही त्याची सूक्ष्म रूपे प्रकट होतात. दृश्य विश्वात सूक्ष्माला जडाचे अधिष्ठान लागते. तरीही सूक्ष्माच्या चेतनेशिवाय वडाची टवटवी टिकत नाही. अचेतन सृष्टीचा विषय विज्ञानाचा आहे, तर सचेतन सृष्टीचा विषय आत्मज्ञानाचा आहे. प्राणामुळे नुसता माणूस जिवंत ठरत नाही, माणसाचे मन आणि बुद्धी यांना टवटवीत ठेवणारी शक्ती म्हणजे प्राण होय. म्हणून प्राणावर ताबा मिळविला की, मन आपोआप ताब्यात असते. प्राणाशी वाणीचा अत्यंत निकटचा संबंध असतो. विचाराकडून वाणीच्या पायरीपायरीने प्राणापर्यंत यावे लागते. यात विवेक आणि चिंतन हे भेटतात. वाणीचा आधार धरून प्राणाला विचारापर्यंत पोहोचवायचे असते. यात संतसंगती आणि आत्मानात्मविवेक येतात. जमेल ती सेवा नि करता येईल ते चांगले. असे एक सद्मन घडते. प्रत्येक कर्म निष्काम होते. चित्त शुद्ध बनते. योग्य काली मनात आत्मज्ञानाचा उदय होतो. प्रपंच आणि परमार्थ तुळशीवृंदावन होतो. यातून मिळणारा ब्रह्मानंद पुन:पुन्हा आपल्याला म्हणायला लावतो- ‘असतो मा सद्गमय’.
यशवंत पाठक

कु तू ह ल
अंतराळवीरांची निवड
अंतराळवीरांची निवड कशी केली जाते? त्यांच्या या शिक्षणात कोणत्या गोष्टींचा समावेश असतो?

अवकाशमोहिमेमध्ये तुम्ही नेमके काय करणार यावर तुमची निवड अवलंबून असते. नासाच्या नियमांनुसार यानचालकाला एक हजार तास जेट विमान उडवण्याचा अनुभव, चष्म्याशिवाय निरोगी दृष्टी व उंची ६४ ते ७६ इंच इतकी असणे आवश्यक आहे. मोहीमतज्ज्ञ म्हणून जायचे असल्यास मात्र विज्ञान, अभियांत्रिकी किंवा गणित यापैकी कुठल्याही शाखेचा पदवीधर असणे व त्यामध्ये विशेष आवड असणे महत्त्वाचे असते. नासाने ‘अवकाशातून शिक्षण’ या प्रकल्पात निवडक शिक्षकांना अवकाशात पाठविले होते. अवकाशप्रवासातील वजनरहित अवस्था व वर जाताना सहन करावे लागणारे तीव्र बल लक्षात घेता, तुमचा रक्तदाब व हृदय अगदी व्यवस्थित असणे अत्यावश्यक आहे. सुरुवातीच्या काळात फक्त सैन्यातील वैमानिकांनाच अंतराळवीर म्हणून निवडत असत. (अमेरिकन नाविक दलात वैमानिक असणाऱ्या जॉन ग्लेनकडे कुठल्याच शाखेची पदवी नसूनही त्याने दोनदा अवकाशवारी केली आणि त्यातील दुसरी तर वयाच्या तब्बल ७७ व्या वर्षी!)
खासगी कंपन्यासुद्धा आता अंतराळयात्रा आयोजित करू लागल्या आहेत. श्रीमंत माणसेही एक आगळावेगळा अनुभव म्हणून अंतराळात जाऊलागली आहेत. त्यांच्यासाठी अटी थोडय़ा शिथिल झाल्या तरीही पूर्ण वैद्यकीय तपासणीशिवाय कुणालाच अंतराळवीर होता येत नाही. एकदा निवड झाल्यावर विशेष प्रशिक्षण केंद्रात या अंतराळवीरांना प्रशिक्षण दिले जाते. नासासारख्या संस्थेत हे प्रशिक्षण २० महिन्यांचे असते. प्रशिक्षणार्थीना तीव्र बल, तसेच वजनविरहित अवस्था यासारखे अनुभव जमिनीवरील प्रयोगशाळेत किंवा विमानांमध्ये दिले जातात. या प्रशिक्षणार्थीना यानाच्या आत असलेल्या सर्व उपकरणांबद्दल सविस्तर माहिती दिली जाते आणि अंतराळात तोंड द्यावे लागेल अशा प्रत्येक प्रसंगाची रंगीत तालीम त्यांच्याकडून पुन:पुन्हा करून घेतली जाते.
गौरी दाभोळकर
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
हेन्री किसिंजर

अमेरिकेचे एक वादग्रस्त परराष्ट्रमंत्री, एकूण चार अध्यक्षांसाठी राजकीय सल्लागार म्हणून काम केलेले, नोबेल पारितोषिक विजेते हेन्री किसिंजर यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात २७ मे १९२३ रोजी जर्मनीत झाला. पण हिटलरच्या छळाला कंटाळून त्यांचे कुटुंबीय अमेरिकेत स्थायिक झाले. न्यूयॉर्कमध्ये त्यांचे शिक्षण झाले. राज्यशास्त्रातून त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली होती. हार्वर्ड विद्यापीठात ते राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. अण्वस्त्र संशोधन व परराष्ट्रनीती हे त्यांचे जिव्हाळय़ाचे विषय. अमेरिकेला अण्वस्त्र स्पर्धेत टिकायचे असेल तर लवचिक परराष्ट्रीय धोरण आखले पाहिजे, हे आपल्या ग्रंथातून पोटतिडिकीने मांडल्याने राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी त्यांना आपले सल्लागार नेमले. तो काळ शीतयुद्धाच्या टांगत्या तलवारीचा. अमेरिकाच रशियाच्या तुलनेने क्षेपणास्त्रांत कशी वरचढ आहे हे मुत्सद्देगिरीने त्यांनी पटवून दिल्याने क्यूबाची नाकेबंदी करून अमेरिकेने रशियावर दडपण आणले. परिणामी तिसरे महायुद्ध टळले. राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या काळातही त्यांचा प्रभाव होता. क्षेपणास्त्रांना आवर घालण्यासाठी बडय़ा राष्ट्रांची शिखर परिषद त्यांनी आयोजित केली. व्हिएतनाममधून अमेरिकेचे सैन्य माघारी बोलावून अमेरिकेचा हा अनेक वर्षांचा संघर्ष मिटविला. इस्त्राईल-सीरिया हे युद्धही त्यांनी मिटविले. या कार्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. पण त्यावर टीका झाली. तरीही त्यांनी ते स्वीकारले. १९७३-७७ या काळात ते अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री होते. भारताबाबत त्यांचे मत पूर्वग्रहदूषित होते. भारतद्वेष्टा किसिंजर असाच त्यांचा उल्लेख केला जातो. १९७१ च्या सुमारास अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इंदिरा गांधींनी बांगलादेशाची निर्मिती केली. तेव्हा इंदिराजींबद्दल त्यांनी अनुद्गार काढले. १९८० च्या सुमारास ते राजकारणातून निवृत्त झाले. ‘अमेरिकन फॉरेन पॉलिसी,’ ‘द अमेरिकन रेकॉर्ड,’ ‘ट्रबल पार्टनरशिप’ हे त्यांनी लिहिलेले महत्त्वाचे ग्रंथ. त्यांचे आत्मचरित्र ‘वर्ल्ड हिस्टोअर्स’ या नावाने प्रसिद्ध आहे. नुकत्याच भारतभेटीवर आलेल्या हेन्री किसिंजर यांनी इंदिरा गांधींबाबत काढलेल्या अनुद्गाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
हीरो

प्राजक्ताच्या झाडाखाली बसलेले ते गोजिरवाणे पांढऱ्या-भुऱ्या रंगाचे कुत्र्याचे छोटेसे पिलू कुठून आले होते कुणास ठाऊक? पण रेखा आणि पक्याला सकाळी खेळत असताना नेमके दिसले. डोळय़ांभोवती दोन्ही बाजूंना तपकिरी ठिपके असलेले ते पिलू दोघांना फार आवडले. गुबगुबीत मऊ अंगाचे पिलू गॉगल घातलेल्या हीरोसारखे ऐटबाज दिसत होते. दोघांनी त्याचे नाव ‘हीरो’ ठेवले.
बाबा घरातून बागेत कधी आले त्यांना कळलेच नाही. मोगऱ्याच्या वाफ्यात माती उकरून पिलाने स्वत:साठी बसायला केलेला खड्डा पाहून ते वैतागून म्हणाले, ‘नतद्रष्ट कुत्रा आहे. रोपांची वाट लावून टाकली यानं. हाकलून द्या बरं त्याला. हॅट्.. हाड्.. हुडूत्..’ करून त्यांनी पिलाला हुसकावून लावले. पक्या आणि रेखा फार हिरमुसले. त्या दिवशी दुपारी पतंग उडवायला रस्त्याच्या कडेने बागडत ते शेताच्या मध्यावर पोहोचले. पक्याने मांजा धरला. रेखा वाऱ्याच्या दिशेने ढिल देऊ लागली. हवेच्या झोतात पतंगाचा मांजा एका बाभळीच्या झुडपात अडकला. मांजापासून वेगळा झालेला पतंग वाऱ्याबरोबर गोते खाऊ लागला. पतंग खाली येत होता. तो जमिनीवर पडून फाटू नये म्हणून दोघे पतंगामागून धावत होते. पतंग एका कचऱ्याच्या ढिगात पडला. कागद, कपटे, खुडलेल्या भाज्या, सालपटे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाला-पाचोळा यात पतंग पडला होता. कचऱ्याच्या ढिगात सांभाळून पाय टाकत दोघे पतंगाकडे जाऊ लागले. नशीब, जरासुद्धा फाटला नाही, पक्या आनंदाने म्हणाला. त्याच्या दंडाला घट्ट धरून रेखा कुजबुजली,‘कचरा हलतोय रे!’ रद्दी कागद, जुनी डबडी, पुठ्ठे यांच्या गर्दीतून एक छोटंसं डोकं हळूहळू वर आले. गॉगलसारखे डोळय़ांभोवती असलेले ते गोजिरवाणे डोके पाहून रेखा आनंदाने ओरडली, ‘हा तर आपला हीरो.’ हीरो दु:खी होता. अंग मळून गेले होते. त्याने रडवेले कुं.. कुं.. कुं.. केले. रेखाने त्याला उचलून छातीशी धरले आणि निश्चयी सुरात ती म्हणाली, ‘मी याला घरी घेऊन जाणार. घरी नेलं नाही तर बघ काय दशा झाली बिचाऱ्याची!’ पक्या म्हणाला, ‘खरं आहे. बाबांनाही आपल म्हणणं पटेल.’
एकटेपणा आणि आपण कुणाला नकोसे आहोत ही भावना एखाद्यामध्ये निर्माण होणे याला सभोवतालचा समाज कारणीभूत असतो. आपण प्रत्येकजण शक्य होईल त्या प्रकारे दुसऱ्यांचे एकटेपण आणि नकोसे असल्याची भावना दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.
आजचा संकल्प : ज्याला माझी गरज आहे त्याच्याशी मी मैत्री करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com