Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

अनेक गाडय़ांना विलंब; दोन रद्द
चक्रीवादळ व पंजाबमधील हिंसाचारामुळे सेवा विस्कळीत
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी आलेल्या चक्रीवादळामुळे आणि पंजाबमधील हिंसाचारामुळे

 

रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. जम्मूहून नागपूर मार्गे धावणाऱ्या दोन गाडय़ा रद्द करण्यात आल्या तर, हावडय़ाहून निघणाऱ्या अनेक गाडय़ा तीन ते पाच तास विलंबाने धावत आहेत.
व्हिएन्नामध्ये शीखांच्या दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षांचे तीव्र पडसाद काल पंजाबमध्ये उमटले. येथे झालेल्या हिंसाचारात दोन ठार तर, अनेक जखमी झाले. त्यामुळे जम्मूतवी ते कन्याकुमारी हिमसागर एक्स्प्रेस आणि जम्मूतवी ते चेन्नई अंदमान एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आल्या. दुसरीकडे पंश्चिम बंगालमध्ये ‘एला’ चक्रीवादळाने थैमान घातल्याने हावाडय़ाहून निघणाऱ्या सर्व गाडय़ा नियोजित वेळेपेक्षा उशिरा सोडण्यात आल्या. त्यामुळे हावडय़ाहून नागपूरमार्गे मुंबई, अहमदाबाद, पुणे या शहरांकडे जाणाऱ्या गाडय़ा आज तब्बल तीन ते पाच तास विलंबाने धावत होत्या. यात २१०२ हावडा-लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, २८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, २१३० हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस पाच तास विलंबाने धावत होत्या. तर, २८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, २८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, २८१० हावडा-मुंबई मेल, ८०३० शालिमार-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस तीन तास बिलंबाने नागपुरात आल्या. तसेच कन्याकुमारी आणि चेन्नईहून जम्मूतवीला जाणाऱ्या गाडय़ा आज दिल्ली येथे रोखण्यात आल्या. त्यामुळे जम्मूला जाणाऱ्या प्रवाशांना दिल्लीत थांबावे लागले आहे. दिल्लीहून चेन्नई आणि कन्याकुमारीसाठी गाडय़ा सोडण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक मनोजकुमार गांगेय यांनी दिली.