Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

सीबीएसई दहावीत भवन्सची वेदवती अलबाळ विदर्भातून अव्वल
मॉडर्नची नेहा कोंडेकर दुसरी तर तन्मय धोटे तिसरा
निकाल १०० टक्के
नागपूर, २६ मे/ प्रतिनिधी

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाने (सीबीएसई) आज घोषित केलेल्या दहावीच्या निकालात

 

भारती विद्या भवन्सची वेदवती हेमंत अलबाळ विदर्भातून ९८.६ टक्के गुण मिळवून प्रथम आली असून दुसरा व तिसरा क्रमांक कोराडी मार्गावरील मॉडर्न स्कूलच्या नेहा कोंडेकर आणि तन्मय धोटे यांनी पटकावला आहे. नेहाला ९८.२ टक्के तर तन्मयला ९८ टक्के गुण मिळाले. याच शाळेची श्रिया तिवारी आणि श्रेया चिंचोरिया ९७.८ टक्के गुण घेऊन चवथ्या क्रमांकावर आले. वानाडोंगरीच्या स्कूल ऑफ स्कॉलर्सचा पलाश धांडे आणि भारती विद्या भवनचा चेतन स्वाईन हे विद्यार्थी पाचव्या क्रमांकावर स्थानापन्न आहेत. पलाश व चेतनने ९७.४ टक्के गुण मिळवले आहेत.
आज घोषित झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात भारती विद्या भवन्सच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून शाळेची वेदवती हेमंत अलबाल ९८.६ टक्के गुण मिळवून विदर्भातून प्रथम आली. शाळेतून दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे चेतन ब्रम्हानंद स्वाईन आणि नमिता शैलश निसाळ यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. चेतन आणि नमिताला अनुक्रमे ९७.४ आणि ९७ टक्के गुण मिळाले आहेत. भवन्समधील २०८ विद्यार्थ्यांपैकी १०६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत. वेदवतीला संस्कृत, गणित आणि एसएसटीमध्ये पैकीच्या पैकी म्हणजे प्रत्येकी १०० गुण आणि इंग्रजीत ९७ गुण आहेत.
वानाडोंगरीच्या स्कूल ऑफ स्कॉलर्सचा पलाश धांडे हा विद्यार्थी ९७.४ टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम आणि नागपुरातून चवथ्या क्रमांकावर आहे. पलाशचे वडील संजीव धांडे सिंचन विभागात सिव्हिल इंजिनिअर असून आई अर्चना धांडे बालकल्याण विभागात काम करते. पलाशला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे असून त्यासाठी गेल्या महिन्यातच तो राजस्थानला आयआयटी कोचिंगसाठी गेला आहे. नगर युवक शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या प्राचार्य कविता नागराजन यांनी पलाशच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून १०० टक्के निकाल लावण्यात शाळेने यावर्षी हॅट्ट्रिक केली आहे.
कोराडी मार्गावरील मॉडर्न स्कूलच्या नेहा कोंडेकरच्या यशामुळे शाळेत आनंद साजरा करण्यात आला. नेहा ९८.२ टक्के गुण घेऊन विदर्भातून दुसरी आली आहे. तन्मय धोटे ९८ टक्के गुण घेऊन तिसऱ्या क्रमांकावर झळकला आहे. याच शाळेच्या श्रिया तिवारी आणि श्रेया चिंचोरिया या विद्यार्थिनी ९७.८ टक्के गुण घेऊन चवथ्या क्रमांकावर आहेत, हे विशेष. राजन विक्रम हरकरे या विद्यार्थ्यांला ९५ टक्के गुण मिळाले असून त्याने गणितात शंभर टक्के तर संस्कृत विषयात ९९ गुण प्राप्त केले आहेत.
काटोलच्या सेंटर पॉईंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. शाळेतील १९३ विद्यार्थ्यांपैकी ९० आणि ९० टक्क्यांच्यापुढे गुण मिळवलेले ७७ विद्यार्थी आहेत. त्यात रजिता श्रेष्ठा, अर्चना सेकार आणि अर्जून शाहू या विद्यार्थ्यांना ९६.८ टक्के गुण मिळाले आहेत. तसेच ९५ आणि त्याहून अधिक गुण मिळवलेले ९ विद्यार्थी- विद्यार्थिनी आहेत. त्यात संजुला जेठवानी (९६.६%), ऐश्वर्या बुटी ९(९६.६%), श्रेया चौधरी (९६.४%), शोभन रॉय (९६.४%), सिमरन जैन (९६.२%), मारिया धामणगाववाला (९५.८%), निश्चय नाथ (९५.६%) आणि अनिकेत मंत्री (९५%) यांचा समावेश आहे.
केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या चेन्नई, अजमेर आणि पंचकुला झोनचा निकाल आज घोषित करण्यात आला. जनसंपर्क अधिकारी रामा शर्मा म्हणाले, एकूण ८,२४,४३८ विद्यार्थ्यांनी भारतात आणि भारताबाहेरही ही परीक्षा दिली. त्यामध्ये ३,३६,९६३ विद्यार्थिनींनी तर ४,८७,४७५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. सीबीएसईने इमेलवर निकाल पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याव्यतिरिक्त सीबीएसईने एमटीएनएलच्या ०११-२८१२७०३० या टेलिफोन क्रमांकावर इंटरॅक्टिव्ह व्हाइस रिस्पॉन्स सिस्टिम उपलब्ध करून दिली होती. अनेक मोबाईल फोन ऑपरेटर एसएमएसच्या माध्यमातून निकाल देत होते. यासाठी १८ हेल्पलाईन संपूर्ण देशातून सुरू करण्यात आल्या होत्या.दुबई, दोहा आणि कतार-कुवैत या ठिकाणी ३ हेल्पलाईन सुरू आहेत.