Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मान्सून लांबण्याची शक्यता
नागपूर, २६ मे/ प्रतिनिधी

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी आलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात वेळेपूर्वी येणारा मान्सून

 

किंचित लांबण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मे महिना संपल्यानंतरच राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे.
अंदमानमध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर आठ दिवसात तो विदर्भात थडकतो. यावेळी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ातच अंदमानमध्ये पावसाळ्याला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने यंदा विदर्भात मान्सून वेळेवर येणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. तसे संकेतही मिळाले होते. मागील आठवडय़ात नागपूरसह विदर्भातील अनेक भागात वादळी पावसाची नोंद झाली. सायंकाळी वादळ येणे, पावसाच्या हलक्या सरी येणे हे नित्याचेच झाले होते. सोमवारी अचानक बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे नैऋत्य मान्सूनने वेळेआधीच संपूर्ण ईशान्य भारत व पश्चिम बंगालचा बहुतांश भाग व्यापल्यामुळे महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचे आगमन काहिसे लांबण्याची शक्यता आहे. या वादळाने जास्तीत जास्त बाष्प बंगालच्या उपसागरात खेचले आहे. त्यामुळे मान्सून अरबी समुद्रातून पुढे म्हणजे महाराष्ट्राकडे सरकण्यास थोडा उशीर लागेल. त्यामुळेच मे महिना संपल्याशिवाय महाराष्ट्रात पाऊस दाखल होणार नसल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मान्सून या वर्षी आठवडाभर आधी म्हणजे २३ मे रोजीच केरळ किनारपट्टीवर दाखल झाला. त्यानंतर बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्याची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले.
या वादळामुळे मान्सून बंगालच्या उपसागरातूनही लवकर पुढे सरकला. त्याचाच परिणाम म्हणून त्याने सोमवारी संपूर्ण ईशान्य भारत, सिक्कीम आणि बंगालचा बहुतांश भाग व्यापला, असे वेधशाळेने सांगितले. दरम्यान, आज सकाळपासूनच नागपुरात ढगाळ वातावरण आहे. सूर्याचे दर्शन फार कमी वेळ झाले. मात्र वातावरणात उकाडा होता. सायंकाळी वातावरणात आणखी बदल झाला. वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला. दुपापर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ांचे तापमान ४० ते ४१ अंश सेल्सीअस दरम्यान होते.
राज्यात ९७ टक्के पावसाचा दावा
राज्यात या पावसाळ्यात सरासरी ९७ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज राहुरी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला आहे. धुळे, सोलापूर, जळगाव, यवतमाळ येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा दावाही या विभागातर्फे करण्यात आल्याचे पुण्याहून मिळालेल्या वृत्तात म्हटले आहे.
या विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी हा अंदाज जाहीर केला. मात्र तो कशाच्या आधारावर दिला जातो, हे त्यांनी जाहीर केले नाही. दापोली, पुणे, राहुरी, कोल्हापूर, कराड, पाडेगाव, निफाड (नाशिक), अकोला, नागपूर, पूर्व विदर्भ, परभणी येथे सरासरीएवढा किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडेल, असा दावाही साबळे यांनी केला आहे. पिकांच्या दृष्टीने कोकणात भात व नाचणीसाठी पाऊस अनुकूल असेल. भात, ज्वारी, ऊस, बाजरी, घेवडा, बटाटा, तूर, मूग, उडीद, चवळी, सूर्यफूल, सोयाबीन, मका या पिकांचे उत्पादन चांगले येईल. मात्र पावसाचा खंड पडण्याची शक्यता असल्याने या पिकांना संरक्षित पाणी द्यावे लागेल. पश्चिम विदर्भात तूर, मूग, उडीद अशी आंतरपिके घेण्याचा सल्लाही या विभागातर्फे देण्यात आला आहे.
हा अंदाज कशाच्या आधारावर दिला आहे, ही बाब साबळे यांनी स्पष्ट केली नाही. या विभागाकडे मुंबई येथील पावसाची आकडेवारी आधार म्हणून नाही, तरीही त्यांनी मुंबईतील पावसाचा अंदाज दिला आहे. तिथे ‘सरासरीएवढा किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडेल,’ असा या विभागाचा दावा आहे. हा अंदाज दापोली येथील पावसाच्या आकडेवारीवरून देण्यात आला आहे, असे साबळे म्हणाले.