Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

गुणवंतांचे मनोगत
वेदवतीचा विज्ञान शाखेकडे कल

‘मैत्रिणीचा फोन आला तेव्हा प्रवासात होते, माझा क्षणभर विश्वासच बसला नाही.

 

अनेकांकडून शाहनिशा केली तेंव्हा विश्वास बसला’ वेदवती अलबाळने ‘लोकसत्ता’शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली तेव्हासुद्धा ती प्रवासातच होती. केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेत भारतीय विद्या भवन्सची वेदवती हेमंत अलबाळ ९८.६ टक्के गुण संपादन करून उत्तीर्ण झाली. ५०० पैकी ४९३ गुण मिळवणाऱ्या वेदवतीला तीन विषयात पैकीच्या पैकी गुण आहेत. भविष्यात काय करायचं हे अजून ठरवले नाही पण, विज्ञानाकडे वळायचे ठरवले असून जेनेटिक्सकडे कल असल्याचे वेदवती म्हणाली. अभ्यास असा खूप केला नाही पण, शाळेत जे शिकवले गेले ते, त्याच दिवशी वाचून काढण्याची सवय लावून घेतल्याने खूप फायदा झाला. याशिवाय शाळेच्या प्राचार्य, शिक्षिका यांचे पूर्ण सहकार्य मिळाले. वेदवतीचे वडील डॉ. हेमंत अलबाळ यांचे पाच वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. आई डॉ. मनीषा अलबाळ यांनी मुलीने मिळवलेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. वैद्यक व्यवसायामुळे तिला अधिक वेळ देता आला नाही पण, वेदवती सुरुवातीपासूनच अभ्यासू आणि प्रामाणिक आहे. आपण जेव्हा घडतो तेव्हा समाजाचाही त्यात वाटा असतो. वेदवतीला जो मार्ग निवडायचा आहे तो तिने निवडावा पण, त्या मार्गातून तिला समाजऋण फेडता आले पाहिजे, असे डॉ. मनीषा अलबाळ म्हणाल्या. वेदवतीच्या शिक्षिकांनीसुद्धा ती एक ‘ऑलराउंडर’, ‘हार्डवर्कर’ विद्यार्थिनी असल्याचे सांगितले.
चेतनची इच्छा आयआयटीकडे जाण्याची
‘मला निकाल कळला तो एसएमएसच्या माध्यमातून. त्यावेळी मी शिकवणी वर्गात होतो. क्षणभर विश्वासच बसला नाही पण, जेव्हा फोन येऊ लागले तेव्हा मला खूप आनंद झाला.’ चेतन स्वाईन याने ‘लोकसत्ता’शी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत भारतीय विद्या भवन्सचा चेतन स्वाईन याने ९७.४ टक्के गुण प्राप्त केले आहेत. आयआयटीकडे जाऊ इच्छिणाऱ्या चेतनला खेळात अधिक रस आहे. अभ्यास आणि खेळ या दोन्हीचा समतोल साधणे त्याला चांगलेच जमते. संपूर्ण वर्षभरासाठी त्याने अभ्यासाचा आराखडा तयार केला होता. विषयानुसार अभ्यासाचे तास आखले आणि त्याचा खूप फायदा झाल्याचे चेतन म्हणाला. स्वत:हून अभ्यास करण्याच्या त्याच्या सवयीमुळे आम्हाला त्याच्याकडे फारसे लक्ष द्यावे लागले नाही. जेव्हा त्याला अडचण यायची, तेव्हाच तो आमचा आधार घ्यायचा, असे चेतनची आई कविता स्वाईन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. त्या सुद्धा शिक्षिका असून चेतनचे वडील ब्रम्हानंद स्वाईन अभियंता आहेत. चेतनला फुटबॉलमध्ये विशेष आवड असून त्याने शाळेकडून फुटबॉल टिमचे नेतृत्त्वसुद्धा केले आहे.
क्रिकेट मॅच जिंकण्यासारखा नमीताला आनंद
‘क्रिकेट मॅच जिंकल्यावर जसा आनंद होतो, अगदी तसाच आनंद निकाल कळल्यावर झाला.’ नमिता निसाल हिने ‘लोकसत्ता’ला दिलेली ही प्रतिक्रिया. केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेत भारतीय विद्या भवन्सच्या नमिताने ९७ टक्के गुण मिळवले.
सायन्सकडे वळू इच्छिणारी नमिता चित्रकलेतसुद्धा तेवढीच पारंगत आहे. ती कार्टून अतिशय उत्कृष्ट काढते, चित्रकलेतील तिचे नैपुण्य बघून तिने या विषयाशी संबंधित क्षेत्र निवडावे असे वाटते पण, शेवटी तिचा निर्णय तिनेच घ्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया नमिताचे वडील शैलेश निसाळ आणि आई डॉ. रम्या निसाळ यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. शिकवणी वर्गाची फारशी सवय न लावून घेणारी नमिता सकाळी ५.३०ला उठून अभ्यास करायची. त्यामुळे सकाळच्या दोन-तीन तासात चांगला अभ्यास व्हायचा. नमिताला फिरायला खूप आवडतं, याच आवडीतून तिने हिमालयची टूर सुद्धा केली आहे. याशिवाय स्विमींग आणि कराटेमध्ये नमिताने शाळेचे नेतृत्त्वसुद्धा केले आहे.