Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

कुहीजवळ मोटारसायकलींची टक्कर ; तिघे गंभीर जखमी
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी
वेगात असलेल्या दोन मोटारसायकलींची टक्कर होऊन त्यात तिघे गंभीर जखमी झाले.

 

कुहीपासून २२ किलोमीटर अंतरावरील माळवी गावाजवळ मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
अरुण पुरुषोत्तम चिचोडे (रा. राणा मांगली), भागवत धनराज पिदुरकर व विनोद दशरथ चौरे (दोघेही रा. नेरी मांगली) ही जखमींची नावे असून त्यांना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माळवी गावाजवळ रस्त्यालगतच्या शेतात धुरा पेटवला होता. वाऱ्यामुळे धूर आणि ज्वाळा रस्त्याच्या दिशेने होत्या. त्याचवेळी एमएच ३१ डीबी ३११० ही मोटारसायकल नागपूरकडून कुहीकडे जात होती. धूर आणि ज्वाळा असल्याने चालकाने मोटारसायकल रस्त्याच्या डावीकडून घेतली. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एमएच ४० एच ९८० मोटारसायकल आली. धुरामुळे दोन्ही दुचाकी चालकांना समोरची वाहने न दिसल्याने त्यांची टक्कर झाली. एका मोटारसायकलवर अरुण चिचोडे व मांजरे नावाचा इसम तर दुसऱ्या मोटारसायकलवर भागवत पिदुरकर व विनोद चौरे होते.
ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार श्याम दुबे, चंद्रशेखर घईकर, विकास काकडे, प्रशांत मांजरे व किशोर बोबडे हे मांढळ परिसरात गस्त घालत होते. तेथे एका वाहन चालकाने अपघात झाल्याचे तसेच जखमी तरुण तडफडत असल्याचे पोलिसांना सांगितले. वाहतूक पोलिसांनी लगेचच ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले आणि घटनास्थळी पोहोचले. नियंत्रण कक्षाने कुही पोलिसांना कळवले. वाहतूक शाखेच्या पथकाने जखमींना तातडीने त्यांच्या वाहनातून मेडिकल रुग्णालयात आणून दाखल केले. पुढील तपास कुही पोलीस करीत आहेत.