Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

विदर्भातील १ हजार ६०३ गावांना पुराचा धोका
नागरिकांच्या रक्षणासाठी प्रशासन सुसज्ज
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी
रणरणत्या उन्हाचे चटके सोसणाऱ्या वैदर्भीयांना आता मान्सूनला सामोरे जावे लागणार आहे.

 

विदर्भात तब्बल १ हजार ६०३ गावांना पुराचा धोका संभवू शकतो. नागपूर विभागात १ हजार १४ तर अमरावती विभागात ५८९ गावे असून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाच्या काहिलीमुळे नागरिकांना पावसाचे वेध लागले आहेत. पण, नदी आणि नाल्यांच्या काठावर राहणाऱ्यांना मात्र त्यांचे घर सुरक्षित राहील की नाही, याची चिंता सतावत आहे. यासाठी शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले असून बोटी, सुरक्षा पथके आणि लाईफ जॅकेटची व्यवस्था करण्यात आली आहे.
नद्या, नाल्यांच्या पुराच्या तडाख्यात येणाऱ्या गावांना आतापासूनच सूचना देण्यात आल्या आहेत. पूर आल्यास किती गावांना फटका बसेल, याचाही अंदाज जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नागपूर विभागात कन्हान, वैनगंगा, पेंच, इरई, इंद्रावती या प्रमुख नद्यांच्या पुराने यापूर्वी अनेक गावे उध्वस्त केली आहेत. विभागात पुराच्या तडाख्यात येऊ शकणारी सर्वाधिक ३३४ गावे नागपूर जिल्ह्य़ात आहेत.
मध्यप्रदेशमधील संजय सरोवराचे पाणी सोडल्याने कुही जवळील अनेक गावांना पुराचा वेढा बसला होता. यासाठी यंदा खास दक्षता घेण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्य़ात २५४ गावे, गडचिरोली जिल्ह्य़ात २१७ गावे, भंडारा जिल्ह्य़ात १५८ गावे, गोंदिया जिल्ह्य़ात ८३ गावे आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात ६२ गावे पुराच्या तडाख्यात येण्याचा धोका आहे. नागपूर विभागात सद्यस्थितीत ३० बोटी आहेत. तीन वर्षांपूर्वी फक्त ५ बोटी होत्या तर गेल्या वर्षी २५ बोटी शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय ३७१ लाईफ जॅकेट आणि २१९ सुरक्षा रक्षक सज्ज ठेवण्यात आले आहेत.
विभागात जिल्हा आपत्ती प्राधिकरणाने संबंधित विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून यंत्रणा सज्ज केली आहे. यावेळी आधीच धोक्याची सूचना मिळावी आणि योग्य समन्वय साधला जावा यावर भर देण्यात आला आहे. यामुळे ज्या धरणातून पाणी सोडण्यात येते, त्याची पूर्वसूचना देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात ठेवण्यात येणार आहे, असे विभागीय आयुक्त आनंद लिमये यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. प्रशासन पूर्णत सज्ज आहे. ‘सर्च’ आणि ‘रेस्क्यू’ टिम तयार असून त्यांना परत प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमरावती विभागात वर्धा, पूर्णा, बेंबळा, चंद्रभागा आदी नद्यांमुळे ५८९ गावे पुराच्या तडाख्यात येण्याचा धोका आहे. ४० मोठय़ा नद्यांमुळे ५२९ आणि २७ नाल्यांमुळे ६० गावांना धोका संभवू शकतो. अकोला जिल्ह्य़ात २१८ गावे, अमरावती जिल्ह्य़ात १८३ गावे, वाशीम जिल्ह्य़ात ८३ गावे, बुलढाणा जिल्ह्य़ात ७९ गावे आणि यवतमाळ जिल्ह्य़ात २६ गावांना पुराचा तडाखा बसू शकतो, असा प्रशासनाचा अंदाज आहे. अशा स्थितीवर मात करण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला दिली असल्याचे अमरावती विभागाचे उपायुक्त ए.के. डोंगरे यांनी सांगितले.