Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

योगिता ठाकरे मृत्यू प्रकरण
गृहसचिव, ठाणे निरीक्षकाला उच्च न्यायालयाची नोटीस
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी
योगिता ठाकरे मृत्यूप्रकरणी मंगळवारी राज्याचे गृहसचिव व कोतवाली पोलीस ठाण्याच्या

 

निरीक्षकावर नोटीस बजावत उच्च न्यायालयाने २९ तारखेस उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महालमधील गडकरी वाडय़ात कारमध्ये बालिकेच्या झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी विनंती करणारी याचिका बालिकेच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात काल सोमवारी सादर केली. आज न्या. ए. पी. डोणगावकर यांच्यापुढे ही याचिका प्राथमिक सुनावणीसाठी आली. या प्रकरणाची साद्यंत माहिती सादर करीत अ‍ॅड. अंजन डे यांनी सीबीआय चौकशी करण्याचे राज्य शासनाला आदेश द्यावे, अशी विनंती न्यायालयाला केली. या प्रकरणी बाजू मांडण्यासाठी दोन आठवडय़ांचा अवधी पोलिसांतर्फे सहायक सरकारी वकील परिहार यांनी मागितला. बचाव व सरकार पक्षाच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ही संवेदनशील घटना असल्याने न्यायालयाने राज्याचे गृह सचिव व कोतवाली पोलीस निरीक्षकांवर नोटीस बजावत २९ मे रोजी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयात योगिताच्या दोघी बहिणी तसेच किशोर इंगळे आणि चार शेजारी उपस्थित होते.