Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘चले धम्म की और’ लवकरच प्रदर्शित
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

‘चले धम्म की और’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून पुढील महिन्याच्या

 

शेवटच्या आठवडय़ात हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते अशोक डोईफोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सामाजिक वास्तवावर आधारित या चित्रपटाचे चित्रिकरण नागपूर, वर्धा, टाकळघाट, बोरधरण, पवनार या परिसरात पार पडले. जगाला शांती आणि गौतम बुद्ध यांच्या विचाराची गरज असल्याचा संदेश हा चित्रपट देतो. विलास गाडगे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये भावना सिंग, राज पाटील, मोनिया रॉय, गौरीशंकर, शितल पाठक, देवेंद्र ढिवरे, शुभम डोईफोडे, रोमी आकोटकर या मुंबईतील कलाकारांचा समावेश आहे.
नागपुरातील वीस कलाकारांनाही या चित्रपटात भूमिका करण्याची संधी प्राप्त झाली आहे. मुख्य भूमिका अशोक डोईफोडे यांची आहे. देशात पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या दहा उत्कृष्ट चित्रपटांमध्ये ‘चले धम्म की और’ हा चित्रपट गणला जाईल, असा विश्वास डोईफोडे यांनी व्यक्त केला.
दिग्दर्शक विलास गाडगे यांनी देशभक्तीवर आधारित ‘छोटा जवान’, दहशतवादावर आधारित ‘नामुमकिन कुछ भी नही’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटासाठी ५० लाख रुपये खर्च झाले आहेत. या चित्रपटात सहा श्रवणीय गाणी आहेत. भावनाप्रदान असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला निश्चितच उतरेल, असा दावा डोईफोडे यांनी केला. याप्रसंगी दिग्दर्शक विलास गाडगे उपस्थित होते.