Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

शासनाने मोहफुलांवरील बंदी त्वरित उठवावी -डॉ. कोठारी
जिल्हा परिषदेने पाठवला प्रस्ताव
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

नागपूर जिल्हा परिषदेने मोहफुलांवरील बंदी उठवण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावाची दखल

 

घेऊन शासनाने त्वरित त्यावरील बंदी उठवावी, अशी मागणी अ‍ॅकडमी ऑफ न्युट्रीशन इम्प्रुव्हमेंटचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल कोठारी यांनी केली आहे. शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश मानकर यांचे त्यांनी अभिनंदन केले.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये द्राक्षाची शेती मोठय़ा प्रमाणात केली जाते. द्राक्षापासून वाईन तयार केली जाते मात्र, शासनाने त्यावर अद्यापही बंदी घातली नाही. विदर्भातील जंगलव्याप्त जमीन मोहफुलाच्या उत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. लोकप्रतिनिधीने महुबाबत जागरुकता निर्माण करून बंदी उठवण्याची मागणी केली तर, सरकारवर दबाव वाढेल. मध्यप्रदेश, छत्तीसगढ, उडिसा, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यात मोह फुलांवर बंदी नाही मात्र, महाराष्ट्रात त्याला विरोध करण्यात आला. मोहाच्या फुलाचे सर्वात जास्त उत्पादन विदर्भात होत असल्यामुळे सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे बंदी उठवण्याचा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी डॉ. कोठारी यानी केली आहे. मोहफुलांवरील बंदी उठवण्यासाठी गेले अनेक दिवस लढा सुरू आहे. राज्य शासन यासंदर्भात निर्णय घेण्यास तयार नाही. पूर्व विदर्भाचे अर्थशास्त्र बदलण्याची ताकद मोहाच्या फुलांमध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये शासनाच्यावतीने केला जाणारा दूजाभाव लक्षात घेता नागपूर जिल्हा परिषदेने सदर प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावातून मोहफुलांचे उत्पादन व त्यापासून निर्माण होणारे विविध उत्पादने याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी जिल्हा परिषदेने केली आहे. मोहफुलापासून तयार करण्यात येणारे आरोग्यवर्धक पेय व पदार्थ विधर्भाबाहेर मिळत नाही. इडली, सांबारवडा, दोसा यासारखे दक्षिणात्य खाद्यपदार्थ जम्मुकाश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत उपलब्ध आहेत. कारण विदर्भाच्या मोहफुलापासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थ्यांचा प्रचार व प्रसार झाला नसल्याचे डॉ. कोठारी यांनी सांगितले. याच पद्धतीने विदर्भातील लोकप्रतिनिधीनी शासनावरील दडपण वाढविल्यास मोहफुलाची विक्री, संकलन व लागवडीचा मार्गे मोकळा होईल.
विधानसभेच्या पूर्वी राज्य सरकारने मोहावरील बंदीचे आदेश त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी डॉ. शांतीलाल कोठारी यांनी केली. यावेळी देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक, नानासाहेब होले पाटील, डॉ. वाय. एम. पाटील उपस्थित होते.