Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मराठा साहित्य संमेलन की इतर समाजाला घायाळ करणारे युद्ध?
ओबीसी मुक्ती मोर्चाने विचारला खडा सवाल
नागपूर, २६ मे/ प्रतिनिधी

मराठा समाजाच्या सेवेसाठी स्थापन झालेल्या मराठा सेवा संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या

 

मराठा साहित्य संमेलनात उपयोगात आणलेल्या भाषेमुळे हे साहित्य संमेलन होते की, असामाजिक, अवास्तविक शब्दांनी इतर समाजाला घायाळ करण्याचे युद्ध होते, असा प्रश्न ओबीसी मुक्ती मोर्चाने उपस्थित केला आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मराठा सेवा संघाच्या संमेलनात विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली उघड तलवारबाजी होती, असा आरोप करण्यात आला आहे.
मराठा शब्दाचे उदात्तीकरण जेवढे वाढेल तेवढा इतर समाज संघटित होण्यास मदत होईल. ओबीसी सूचीत सामील होण्याच्या अट्टाहासापायी राष्ट्रवादी काँग्रेस या मराठय़ांच्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत तोंडघशी पडावे लागले. त्यांच्याच पक्षातील मराठा मंडळींनी विरोध करूनही आगरी समाजातील डॉ. संजीव नाईक आणि माळी समाजातील समीर भुजबळ यांना ओबीसींच्या मतांनी तारले. राष्ट्रवादीच्या मराठा राजकारणाने विदर्भातील कुणबी समाजाचे वध्र्याचे उमेदवार दत्ता मेघे यांना दिलेला त्रास सर्वश्रुत आहे. मात्र, पक्षातून बाहेर पडल्याने मेघेंनीसुद्धा वर्धा जिल्ह्य़ातून विजय मिळवला.
मराठा समाजाची महत्त्वाकांक्षा अशीच वाढत राहिली तर विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षाला पर्यायाने मराठा राजकारणाला ओबीसी संघटित होऊन धूळ चारल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा ओबीसी मुक्ती मोर्चाने दिला आहे.
संमेलनाचे अध्यक्ष सुधाकर गायधनी यांनी उधळलेली मुक्ताफळे चर्चेचा विषय आहेत. एखाद्याने व्यासपीठ उपलब्ध करून दिले की, त्याच्या स्तुतीसाठी पाहिजे तेवढा शब्दच्छल कसा करता येतो, हे गायधनींच्या भाषणावरून समजण्यास मदत झाली. संमेलनात जाऊन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांच्यासारखे उच्चपदस्थ अधिकारी समाजाला काय संदेश देऊ इच्छितात कुणास ठावून? एकीकडे मराठा सेवा संघाचे नेते मुख्यमंत्र्यांना झोडपण्याची भाषा करत होते आणि त्याच व्यासपीठावर काँग्रेसचे आमदार दीनानाथ पडोळे, काँग्रेसचे सचिव अविनाश काकडे, काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे सदस्य सुधाकर गायधनी आणि माजी मंत्री वसंत पुरके मुग गिळून होते. हा प्रकार म्हणजे एकप्रकारे मुख्यमंत्र्यांना झोडपण्याची त्यांची मुकसंमती होती, असे म्हणायला वाव आहे. मुख्यमंत्र्यांना झोडपण्याची भाषा करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील काय? त्यांच्या जागेवर दलित, ओबीसी, आदिवासी वगैरे असते तर पोलिसांनी नक्कीच कारवाई केली असती, अशा प्रतिक्रिया ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे नितीन चौधरी, दिवाकर पाटणे, मधुकर ढगे, अ‍ॅड. अशोक यावले, कृष्णकांत मोहोड यांच्यासह कुणबी पंचायतचे प्रभाकर भडके, नारायण चिंचोणे, डॉ. दिवाकर भोयर यांनी व्यक्त केल्या आहेत.