Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेसच्या विजयाचा गाजावाजा भ्रामक ; बोल्शेविक पार्टीचा आरोप
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

जनतेने लोकसभा निवडणुकीत धर्माध शक्तींना नाकारून सेक्युलर राजकारणाला कौल

 

दिला. प्रसार माध्यमांनी सुद्धा काँग्रेसच्या विजयाचा गाजावाजा करून जनतेने मनमोहन सिंग सरकारच्या धोरणांना समर्थन केल्याचा गाजावाजा प्रसारमाध्यमांनी केला. हा प्रचार चुकीचा आणि भ्रामक असल्याचे भारतीय बोल्शेविक पार्टीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. वास्तविक काँग्रेसला फक्त २०५ जागांवर विजय मिळाला. मित्रपक्ष मिळून त्यांची संख्या २७२ झाली आहे. त्याचा सर्वात जास्त फटका डाव्या पक्षांना बसला आहे.
बोल्शेविक पार्टीने डाव्यांना यापूर्वीच चेतावणी दिली होती की, भांडवलशाहीचे समर्थन करणाऱ्या प्रादेशिक दलांबरोबर जाऊन तिसरा मोर्चा स्थापन करण्याचा प्रयत्न त्यांना अंगलट येईल. कारण निवडणुकीनंतर संधीसाधू प्रादेशिक पक्ष सत्तेसाठी काँग्रेसला समर्थन देतील. मात्र, डाव्यांनी कसलीच तमा न बाळगल्याने भारतीय जनतेने डाव्यांच्या तिसऱ्या मोर्चाला नाकारले. डाव्यांचे म्हणजे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी, फॉरवर्ड ब्लॉक आणि आर.एस.पी.ला पश्चिम बंगालच्या आजूबाजूलाच मान्यता आहे.
पश्चिम बंगालमधील डाव्यांच्या शासन काळात नॅनो कारच्या निर्मितीसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी डाव्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार केले, हे संपूर्ण जगाने पाहिले. केरळमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या राज्य सचिवावर कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे, अशा कितीतरी गोष्टींमुळे डाव्यांना पराभवाला तोंड द्यावे लागले.
भारतीय लोकशाही प्रक्रियेत इतरही डाव्या विचारसरणीचे लोक सहभागी आहेत आणि त्यांना एकजूट करण्याची जबाबदारी डाव्यांची आहे. वास्तवत: भांडवलशाही शक्तींशी अंतर राखून कामगार वर्गाच्या ज्वलंत समस्यांसाठी डाव्यांनी आंदोलन करायला पाहिजे. मात्र डाव्यांच्या धरसोड वृत्तीमुळे केंद्रावरील त्यांचा अंकुश नाहिसा झाला आहे.
यापुढे काँग्रेस सरकार खुल्या पद्धतीने जागतिक व्यापार संघटना व आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या निर्देशानुसार साम्राज्यवादी आणि भांडवलशाहीला हवे तसे धोरण राबवण्यात यशस्वी होईल. त्यामध्ये थेट परदेशी गुंतवणूक, खाजगीकरण आणि श्रम कायद्यांचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती बोल्शेविक पार्टीने व्यक्त केली आहे.
गव्हाच्या व्यापारात वायदाबाजारावरील बंदी उठवण्यात येऊन शेतकऱ्यांना दलालांच्या भरवशावर सोडून देण्यात आल्याचा आरोप बोल्शेविक पार्टीचे सचिव जाफर अली यांनी केला आहे. कामगारांच्या समस्यांकडे डाव्यांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. म्हणून डाव्यांनी कामगार, मजूर, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.