Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

लाच घेणाऱ्या पर्यवेक्षिकेला अटक
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

खिचडीच्या देयकाच्या धनादेशासाठी अंगणवाडी सेविकेकडून चार हजार रुपयांची लाच

 

घेणाऱ्या एका पर्यवेक्षिकेला भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी दुपारी िहगणा येथे अटक केली.
अर्पणा राजेश तिवारी (रा. सुभाष नगर) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात पर्यवेक्षिका आहेत. िहगणाचा महालक्ष्मी अल्पबचत गट तालुक्यातील शाळांना खिचडीचा पुरवठा करतो. ऑगस्ट २००८ ते मार्च २००९ या कालावधीचा ५५ हजार ४२८ रुपयांचा धनादेश मे महिन्यात तयार होता. हा धनादेश देण्यासाठी दहा टक्के दलाली व आधीचे शिल्लक, असे एकूण सात हजार रुपयांची मागणी अर्पणा तिवारी यांनी केली. त्यानुसार बचत गटाच्या सचिव व अंगणवाडी सेविका गीता वसंत बडगे (रा. अमर नगर) यांना ४ हजार रुपये घेऊन बोलावले होते. गीता बडगे यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे कार्यालय गाठून तक्रार केली. या तक्रारीवरून सापळा रचण्याचे आदेश अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिले. पोलीस उपअधीक्षक संजय खांडेकर, पोलीस निरीक्षक मोतीराम पाखरे, ज्योत्स्ना मसराम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. गीता बडगे यांच्याकडून चार हजार रुपये स्वीकारल्यानंतर आरोपी अर्पणा तिवारी यांना पकडण्यात आले.