Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

बेस रेट कमी करण्याची मुख्यमंत्र्यांना मागणी
नागपूर, २६ मे / प्रतिनिधी

महापालिकेच्या आयुक्तांनी वाढवलेला बेस रेट (घर कर) कमी करावा, अशी मागणी मध्य

 

नागपूर विकास आघाडीच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटून केली.
महापालिका आयुक्तांनी घर टॅक्स १० टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पुर्णत: चुकीचा असून तो शहरवासीयांवर अन्यायकारक आहे. हा घर कर वाढवण्यासाठी महापालिकेतील कोणत्याही सदस्यांची परवानगी नाही तसेच स्थायी समितीनेही या वाढीव कराला मंजूरी दिली नाही. तरीही मनपा आयुक्तांनी मिलालेल्या अधिकारान्वये हा निर्णय घेतला. हा निर्णय लागू झाल्यास ज्या घरमालकाला एक हजार रुपये वार्षिक कर द्यावा लागत होता, तो ४ हजार होणार आहे. या वाढत्या करामुळे शहरवासीयांचे कंबरडे मोडणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सामान्य जनता शासनावर विश्वास ठेवते. परंतु अधिकारी जनतेची पिळवणूक करीत असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे. आपण हा डाव उधळून लावावा व वाढलेला बेस रेट रद्द करावा. अन्यथा चार महिन्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉग्रेस व राष्ट्रवादीला त्याचे परिमाम भोगावे लागतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात विकास आघाडीचे अध्यक्ष भूषण दडवे, विदर्भ प्रिमीअर सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र दुरुगकर, प्रा. राजाभाऊ दुरुगकर, प्रा. रमेश कोलते, मारोतराव शनवारे आदी उपस्थित होते.