Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा पुन्हा हातोडा
नगरसेवक दशरथ भगत यांना अटक

नवी मुंबई/प्रतिनिधी - ऐरोलीनजीक असलेल्या गोठीवली-रबाळेतील सुमारे पाचशेहून अधिक घरे जमीनदोस्त करून आठवडय़ाचा कालावधी उलटत नाही, तोच सिडकोने आज वाशीगावाच्या वेशीवर उभारण्यात आलेली तब्बल दोनशेहून अधिक अनधिकृत घरे जमीनदोस्त केल्याने या भागात एकच खळबळ उडाली. मोठय़ा पोलीस बंदोबस्तासह सिडकोने आज ही कारवाई केली. दरम्यान, यापैकी बहुतांश घरे २०००पूर्वी उभारण्यात आली असून ती तोडू नयेत, यासाठी या कारवाईस विरोध करण्यासाठी आलेले कॉँग्रेसचे स्थानिक नगरसेवक दशरथ भगत यांना पोलिसांनी अटक केल्याने या भागात काही काळ तणावाचे वातावरण होते.

ड्रीम सिटीतील रहिवाशांना वाढीव वीज बिलांचा शॉक
नवी मुंबई/प्रतिनिधी - सिडकोची ड्रीम टाऊनशिप म्हणून विकसित करण्यात आलेल्या खारघर या उपनगरातील रहिवासी सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडून पाठविण्यात येणाऱ्या वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झाले आहेत. या उपनगरातील बहुतांश ग्राहकांना नियमित वीज बिलांच्या तुलनेत अगदी पाचपटीने वीज बिलांची आकारणी केली जात असल्याने, वीज कंपनीच्या विरोधात आता खारघरवासीय संघटित होऊ लागले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही वीज कंपनीचे अधिकारी दाद देत नसल्याने संतापलेल्या रहिवाशांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले असून, येत्या २७ मे रोजी या भागातील रहिवासी धरणे आंदोलन करणार आहेत.

अतिक्रमण घोटाळा;राजेश पाटील निलंबित
नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागात घोटाळ्यांचे सत्र उघडकीस येताच खडबमून जागे झालेले आयुक्त विजय नाहटा यांनी याप्रकरणी चौकशीची मालिकाच सुरू केली असून, या घोटाळ्यात सकृतदर्शनी जबाबदार धरून अतिक्रमण विभागात कार्यरत असणारे कनिष्ठ लिपिक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.

अनधिकृत चाळींच्या इमल्यांना आता राजकीय छप्पर
जयेश सामंत

नवी मुंबईतील गावागावांमध्ये उभ्या राहिलेल्या अनधिकृत चाळींच्या इमल्यांविरोधात सिडकोने सुरू केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील राजकीय वर्तुळातही आता खळबळ उडाली असून या चाळींचा संबंध थेट आगरी-कोळी समाजातील अनेक मूळ ग्रामस्थांशी जोडला जात असल्याने या कारवाईच्या मुद्दय़ावरून शहरात एका नव्या व्होट बॅंक पोलिटिक्सला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पनवेलमध्ये गोंधळ, सिनेराजमध्ये सन्नाटा!
पनवेल/प्रतिनिधी : हिंदू देवतांचे विकृत आणि अपमानास्पद दर्शन घडविणाऱ्या ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या चित्रपटाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा हिंदू जनजागृती समितीने दिल्यानंतर नवीन पनवेलमधील सिनेराज सिनेमागृहात सुरू असलेले या चित्रपटाचे खेळ सोमवारी थांबविण्यात आले. समितीच्या कार्यकर्त्यांनी तसेच वारकरी संप्रदायातील मंडळींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच तहसीलदारांना या चित्रपटाविरोधात निवेदन देऊन संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वाहनचालकांकडून ८० हजारांची वसुली
पनवेल/प्रतिनिधी
नवी मुंबई वाहतूक शाखेतर्फे वाहनविषयक कायद्याचे पालन न करणाऱ्या चालकांविरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून चालकांकडून आतापर्यंत ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली २० ते ३१ मे या कालावधीत ही मोहीम राबविली जाणार आहे. खांदा कॉलनी, ठाणा नाका, पळस्पे फाटा आदी महत्त्वाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून दुचाकी, चारचाकी तसेच अवघड वाहनांची तपासणी होत आहे. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे, वायपर नादुरुस्त असणे, चारचाकीच्या चालकांनी सुरक्षा बेल्ट न लावणे, परवाना नसणे, अवजड वाहनांचे ब्रेक्स, हेडलाईट, टेललाईट कार्यक्षम नसणे आदी त्रुटींबाबत प्रत्येकी १०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. पावसाळ्यातील अपघात टाळणे हाही या मोहिमेचा हेतू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

उरण नपचे सेवापूर्ती समारंभाचे आयोजन
उरण/वार्ताहर : उरण नगर परिषदेचे ग्रंथपाल मनोहर घरत, प्रमुख वसुली लिपिक नामदेव सपकाळे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने उरण नपने सेवापूर्ती समारंभाचे आयोजन ३० मे रोजी केले आहे. उरण नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे, उपनगराध्यक्षा नाहिदा ठाकूर, ठाणे म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव, सरचिटणीस प्रभाकर आडेलकर, अ‍ॅड. सुरेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्वा. सावरकर यांच्या जंयतीनिमित्त व्याख्यान
पनवेल / प्रतिनिधी

स्वा. वि. दा. सावरकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त हिंदू जनजागृती समितीतर्फे खास व्याख्यान ठेवण्यात येणार आहे. अभ्यासक दुर्गेश परुळेकर आणि सनातन भारतीय संस्कृती संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक हे दोन वक्ते ‘स्वा. सावरकर भारताचे पहिले पंतप्रधान असते तर’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ३० मे रोजी येथील गोखले सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल.

ज्येष्ठ नागरिक मंडळाची वार्षिक सभा
उरण/वार्ताहर : उरण ज्येष्ठ नागरिक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पालिका पटांगणात नुकतीच पार पडली. या सभेत मंडळाच्या वार्षिक जमा-खर्चाचा आढावा मांडण्यात आला. अध्यक्ष सुभाष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सर्वसाधारण सभेसाठी विजय सुळे, सीमंतिनी कुलकर्णी, रत्नाकर कुलकर्णी, मधुकर चव्हाण, भा. वि. श्रोत्री व मंडळाचे सुमारे १५० सदस्य उपस्थित होते.