Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

नियमावली कठोर, पण..
प्रतिनिधी / नाशिक

शाळांमधील प्रवेश प्रक्रिया, प्रवेश देतेवेळी घेण्यात येणाऱ्या मुलाखती या विषयी शासनाची नियमावली कागदोपत्री कठोर असली तरी या नियमातील तरतुदींचा आधार घेण्यास पालकवर्ग सजग नसल्याने तिची प्रभावीपणे अमलबजावणी होत नाही. शिक्षण संस्थांची मनमानी कार्यपद्धती सहन करण्याची मानसिकता पालकांमध्ये वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. परिणामी, हेच कारण पुढे करून शिक्षण विभागही दोषी शिक्षण संस्थांवर कारवाई करण्याबाबत कानावर हात ठेवण्याची भूमिका घेत असल्याचे पहावयास मिळते.

‘एनसीए’ची ‘एसएजी’वर नऊ गडी राखून मात
समर चव्हाण स्मृती तिरंगी क्रिकेट स्पर्धा
प्रतिनिधी / नाशिक
नाशिक क्रिकेट अकॅडमीने अपेक्षेप्रमाणे समर चव्हाण स्मृतिप्रित्यर्थ आयोजित २० वर्षांआतील तिरंगीं क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या पहिल्या सामन्यात स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ गोवा संघाचा नऊ गडी राखून पराभव केला. या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी आयपीएल गाजविणाऱ्या अभिषेक राऊतच्या हस्ते भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या मैदानावर झाले. अकॅडमीतर्फे दरवर्षी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा २० वर्षांआतील वयोगटासाठी आयोजिलेल्या स्पर्धेत अकॅडमीच्या संघासह स्पोर्टस अथॉरिटी ऑफ गोवा, मुंबईचा सनराईज स्पोर्टस क्लब या संघांचा समावेश आहे.

सहाव्या वेतन आयोगप्रश्नी सरकारी कर्मचाऱ्यांची जूनमध्ये निदर्शने
नाशिक / प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगातील विविध भत्यांचे सुधारित दर राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना नाकारल्यामुळे तसेच आयोगाविषयी असलेल्या सरकारच्या नकारात्मक दृष्टीकोनाचा निषेध म्हणून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे १ जून रोजी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. आयोगाने शिफारस केलेले व केंद्र शासनाने स्वीकारलेले घरभाडे, वाहतूक भत्ता, शैक्षणिक सवलती, प्रसुती रजा व अन्य काही भत्यांचे सुधारित दर राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना नाकारल्यामुळे त्यांचे दरमहा १५०० ते पाच हजार रूपये असे नुकसान होत आहे. शिवाय केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या दिनांकाऐवजी सात महिने उशिराने सुधारित वेतन देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय रोईंग स्पर्धेसाठी मविप्रच्या तिघांची निवड
प्रतिनिधी / नाशिक

पुणे येथे आयोजित कनिष्ठ गटातील राष्ट्रीय रोईंग स्पर्धेसाठी नाशिकच्या के. टी. एच. एम. महाविद्यालयातील सागर नवले, महेश कचरे व कृष्णा शिंदे या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. लोणी-काळभोर येथील एम. आय. टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात ३१ मे पर्यंत ही स्पर्धा घेतली जाणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत केरळ, तामिळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र, दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांचे संघ सहभागी झाले आहेत. के. टी. एच. एम. महाविद्यालयातील सागर नवलेची सिंगलस्कल तर महेश कचरे व कृष्णा शिंदे यांची डबलस्कल गटात निवड झाली आहे. या खेळाडूंना जे. पी. कर्डिले यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या निवडीबद्दल मविप्रचे सरचिटणीस आ. डॉ. वसंत पवार, संचालक विजय गडाख, प्राचार्य व्ही. बी. गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे.

लामखेडनगरच्या गणेश मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा
नाशिक / प्रतिनिधी

शहरातील दिंडोरीरोडवरील लामखेडनगरात श्री स्वामी सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या श्री ओम्कार गणेश मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगळवारपासून सुरू झाला असून त्याची सांगता गुरूवारी होणार आहे. सोहळ्यानिमित्त मूर्तीची शोभायात्रा तारवालानगरापासून मंदिरापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी जगळे बंधू प्रस्तुत ‘नक्षत्राचे देणे’ हा मराठी भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम व रात्री रामायणाचार्य भास्कर महाराज रसाळ (आहेरगाव) यांचे प्रवचन व भजन झाले. गुरूवारी सकाळी माधवगिरी महाराज व संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते मुख्य देवता प्रतिष्ठापना व कलशारोहण होईल. माधवगिरी महाराजांचे प्रवचनही होईल. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य अनिल महाराज जोशी करीत आहेत. मंदिराची उंची २४ फूट असून आतील बाजूस मार्बल व पीओपीने कलाकुसर तसेच रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. मूर्तीकार सुनील घुले यांनी आकर्षक अशी अडीच फूट उंच गणेश मूर्ती तयार केली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या संस्थांविरुद्ध कारवाईची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

शहर व ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था भटक्या जमातीतील मुलामुलींकडून पहिलीसाठी पाच हजार तर पाचवीपुढील प्रवेशासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये घेत असून रक्कम न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दोषी संस्थां विरोधात नियमभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय बैरागी वैष्णव पारिषदेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. मुलींना मोफत शिक्षणाची शासकीय योजना असतानाही पावती न देता बेकायदा फी वसूल करणाऱ्या संस्थांची शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी करून मागास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिवस्मारक समितीत देशमुख, कोकाटे यांचा समावेश व्हावा
बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

येथील बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ शाखेतर्फे बाबासाहेब पुरंदरे व त्यांच्या सहकाऱ्यांची मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारक समितीमधून हकालपट्टी करावी व इतिहासाचे अभ्यासक मा. म. देशमुख, श्रीमंत कोकाटे यांची या समितीत नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पुरंदरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेम्स लेनला माहिती पुरवली होती, याशिवाय त्यांनी इतिहासाचे विकृतीकरण केले असा आरोप बहुजन अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत राज्यात आंदोलनेही झाली. परंतु शासनाला याबाबत माहिती असूनही त्यांनी पुरंदरे यांची निवड आंतरराष्ट्रीय स्मारक समितीत केली. ज्या अधिकाऱ्यांनी पुरंदरे यांचे नाव शासनाला सुचवून त्यांची दिशाभूल केली, त्या अधिकाऱ्यालाही निलंबित करावे, अशी मागणी बहुजन अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने नाशिक विभागाचे प्रमुख संघटक सुनील गांगुर्डे यांनी केली आहे.

एकलव्य स्कूलचा बारावीचा निकाल ९६ टक्के
नाशिक / प्रतिनिधी

आदिवासी विकास विभागातंर्गत असलेल्या महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी संचलित एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील बारावीच्या पहिल्या तुकडीचा सीबीएसई बोर्डाचा निकाल ९६.३० टक्के लागला आहे. एकूण २७ पैकी २६ विद्यार्थी उत्कृष्ठ गुणांनी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीमध्ये १७, द्वितीय श्रेणीत नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेमध्ये प्रथम येण्याचा मान शिलाबाई पटेल ६७.२०, द्वितीय शशिकांत कोकणी व गणेश गावित ६६.६ टक्के यांनी मिळविला.