Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

गैरव्यवहार रोखण्यासाठी रॉकेल वितरणाचे चित्रीकरण करणार
वार्ताहर / धुळे

जिल्ह्य़ातील एकूण शिधापत्रिकांच्या तुलनेत रॉकेलचा पुरेसा कोटा मागवूनही तळागाळातील जनतेपर्यंत शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात रॉकेल पोहोचत नसल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. प्रशासनातर्फे संबधित स्वस्त धान्य दुकानदार किंवा रॉकेल वितरकाने पूर्तता केलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा सोपस्कार पार पाडला जातो. कागदपत्रांवरील नोंदीनुसारच रॉकेलचे वितरण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात शेकडो जणांना रॉकेल मिळत नसल्याने तक्रारींचा ओघ सुरूच राहतो. ही सर्व परिस्थिती लक्षात घेत आता वितरण यंत्रणेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुदतीत माहिती न देणाऱ्या तहसीलदाराविरुध्द तक्रार
वार्ताहर / नवापूर

केंद्रीय माहिती अधिकारात सप्टेंबर २००७ पासून केलेल्या तक्रारीची जनमाहिती अधिकारी तथा तहसीलदारांनी दखल न घेतल्याची बाब समोर आली आहे. याबाबत राज्य माहिती आयोग औरंगाबाद खंडपीठाच्या मुख्य माहिती आयुक्तांनी सात दिवसात माहिती देण्याचे निर्देश दिल्यानंतरही अपीलकर्त्यांना उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी पुन्हा राज्य माहिती आयुक्तांकडे या प्रकरणाची दाद मागून प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शासकीय कामांमध्ये पारदर्शकता यावी, शिस्तबद्ध व काटेकोरपणे शासन नियमांचे पालन होते की नाही ते तपासता यावे यासाठी केंद्रीय माहितीचा अधिकार नागरिकांसाठी अमलात आणला गेला आहे.

‘ज्ञानकोशा’तील ऊर्जा भरभरून घ्यावी..
झपाटय़ाने वाढणारे नाशिक आता ‘मेट्रो’ची गती घेऊ पहात असले तरी अजून काही बाबतीत या शहराने मोठी मजल मारणे अत्यंतिक गरजेचे आहे. शिक्षण आणि काळानुरूप वैविध्यपूर्ण शिक्षणक्रम हा तर विकासाचा पायाच समजला जातो. अलिकडील काळात नाशकात स्थिरावलेल्या विविध शैक्षणिक संस्था, उच्च व तंत्रविषयक संस्था, इंटरनॅशनल स्कूल्स, बी-स्कूल्स यामुळे या शहराकडे ‘एज्युकेशनल हब’ म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. तथापि, आधुनिक काळातील शिक्षण आणि करिअर याच्या विस्तारित कक्षांना गवसणी घालायची असेल तर एवढय़ावरच समाधान मानून चालणार नाही.

‘राशी-२’ अतिरिक्त बियाणे धुळ्यात वर्ग करण्याची सूचना
धुळे / वार्ताहर

जिल्ह्य़ात राशी-२ या कापूस बियाण्याचा तुटवडा का होतो, याबाबत ताबडतोब माहिती घेऊन राज्यात ज्या ठिकाणी अतिरिक्त बियाणे असेल ते जिल्ह्य़ात वर्ग करावे आणि कापूस बियाणाची मागणी पूर्ण करावी, अशी सूचना आ. रोहिदास पाटील यांनी कृषी आयुक्तांशी झालेल्या चर्चेप्रसंगी केली. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात खरिप हंगाम आढावा बैठक आ. रोहिदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

राष्ट्रवादीकडून समानतेच्या वागणुकीस तिलांजली - नरेंद्र दराडे
येवला / वार्ताहर

गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसतर्फे आघाडीचा धर्म पाळून पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे काम केल्यामुळे येवला मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांना ३५ हजारावर आघाडी मिळाली, परंतु राज्यसभा वा महामंडळावर वर्णी लागणे तर दूरच, पण समानतेची वागणूक देखील मिळाली नसल्याबद्दल काँग्रेसचे नेते नरेंद्र दराडे यांनी खंत व्यक्त केली.

काश्मीर कृषी विद्यापीठाशी जैन इरिगेशनचा सामंजस्य करार
जळगाव / वार्ताहर

काश्मीरमधील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाबरोबर येथील जैन इरिगेशन सिस्टिम कंपनीने सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत दोन्ही पक्षांकडून संशोधन आणि ज्ञानाची देवाण-घेवाण करण्यात येणार असून दोन्ही संस्थांच्या विस्ताराच्या दृष्टीने संयुक्तरित्या उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात जैन इरिगेशनच्या पदव्युत्तर संशोधन आणि प्रशिक्षण विभागाचे समन्वयक डॉ. अशोक मिश्रा व विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. ए. आर. तराग यांनी करारावर स्वाक्षरी केली.

अक्कलपाडा डाव्या कालव्याच्या कामास वेग
धुळे / वार्ताहर

अक्कलपाडा प्रकल्पातंर्गत येणाऱ्या डाव्या कालव्याच्या बोगद्याचे काम पूर्णत्वास येत असून अक्कलपाडा गावाजवळील धुळे ते सुरत बायपास महामार्गाचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. ते झाल्याबरोबर अक्कलपाडा धरणात पाणी अडविले जाणार असल्याची माहिती आ. रोहिदास पाटील यांनी दिली.

अवैध धंदे बंद न केल्यास आंदोलन
शिवसेनेचा इशारा
लासलगाव / वार्ताहर

शहर व परिसरातील अवैध धंदे त्वरित बंद न केल्यास सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा इशारा लासलगाव शिवसेनेतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. दोन दिवसात ही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक एस.पी.गुप्ता व नाशिक पोलीस अधीक्षक निखील गुप्ता यांची शिवसेनेचे शिष्टमंडळ समक्ष भेट घेवून या संदर्भात तक्रार करणार असल्याचे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत
धुळे / वार्ताहर

तालुक्यातील नाणे येथील आगपिडीतांना आ. रोहिदास पाटील यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. या वस्तीत गेल्या आठवडय़ापासून खंडित झालेला विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्यात आला. नाणेच्या आदिवासी वसाहतीत अकस्मात लागलेल्या आगीत सुमारे २० घरे जळून बेचिराख झाली. त्यात संसारोयोगी वस्तुही खाक झाल्या तर काहींची रोकड जळाली. या घटनेनंतर पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून आगपिडीतांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार २० कुटुंबांना एकूण ८६ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. त्यामुळे आदिवासींनी समाधान व्यक्त केले. वसाहतीत गेल्या आठवडाभरापासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने येथे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे आदिवासींनी वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार पाटील यांनी कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून वीज पुरवठा सुरू करण्याच्या सूचना केल्या आणि अवघ्या दहा मिनिटात वीज पुरवठा सुरू झाला.

मनमाडजवळील अपघातात एक ठार
मनमाड / वार्ताहर

मनमाड-येवला रोडवरील रेल्वे उड्डाणपुलावर मनमाडकडे येणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे सचिन कृष्णा बोरसे (२५, रा. शांतीनगर, मनमाड) हा मोटारसायकलस्वार ठार झाला. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे उड्डाणपुलाच्या उतारावर रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. सचिन पल्सर या मोटार सायकलवरून शांतीनगरकडे जात असतांना मनमाडकडे भरधाव येणाऱ्या वाहनाने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. त्यात सचिनला गंभीर दुखापत झाली. जितेंद्र शिंदे यांनी या घटनेची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली. पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत.