Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

विशेष

शेअर बाजाराला आश्वासक दिलासा
१८ मे २००९ हा दिवस मुंबई शेअर बाजाराच्या आणि एकंदरीतच भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. त्या दिवशी बाजारातील उलाढाल सुरू होताच अवघ्या काही सेकंदात निर्देशांकाने अशी काही उसळी मारली, की त्या नंतर लगेचच बाजारातील उलाढाल संबंधित नियमांनुसार एका तासासाठी थांबविण्यात आली. एक तासानंतर शेअर बाजाराचा कारभार पुन्हा सुरू होताच तोच प्रकार घडला आणि सर्किट ब्रेकरच्या नियमांनुसार त्या दिवसापुरती बाजाराची उलाढाल थांबविण्यात आली. अशा वाढीचे किंवा खरं म्हणजे शेअर बाजारातील कोणत्याही वादळी चढ-उताराचे नेमके कारण सांगता येत नाही. त्यातही कोणत्या कारणाचा नेमका त्यात किती वाटा आहे हे सांगता यायला ती काही गणिती आकडेमोड नाही; पण तरीही १८ मे २००९ च्या घटनेला लोकसभा निवडणुकीचे अनपेक्षितपणे सुखद निकाल कारणीभूत आहेत हे निर्विवाद!

चंद्रावर ग्रीनहाऊस
मानवाला पुन्हा चांद्रसफरीवर नेणारी अमेरिकेची चांद्रमोहीम २०२० च्या सुमारास आकाराला येईल पण ती फार प्रगत स्वरूपात असेल, त्यात ‘नासा’ या संस्थेचा मोठा वाटा असणार आहे. खरेतर चंद्रावर पहिले मानवी पाऊल उमटवणाऱ्या अमेरिकेने त्यांच्या चांद्रमोहिमा बऱ्याच कालावधीपासून थांबवल्या आहेत. पण आता भारत व चीन या देशांनीही चंद्राचा शोध घेण्याचे ठरवल्याने अमेरिकेलाही आपण या संशोधनात मागे पडू की काय, अशी भीती वाटू लागली त्यामुळेच त्यांनीही पुन्हा एकदा मानवाला चांद्रसफरीवर पाठवण्याचा चंग बांधला आहे. चंद्राचे संशोधन करण्याची ही निकड दोन कारणांसाठी आहे एकतर पृथ्वीव्यतिरिक्त दुसरे एक सुरक्षित ठिकाण म्हणून व दुसरे म्हणजे तेथील खनिज संपत्ती. त्यामुळेच चंद्राचा संपूर्ण नकाशा तयार करण्यात येणार आहे. अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग व एडविन आल्ड्रीन यांनी जेव्हा चंद्रावर पहिले पाऊल ठेवले तेव्हा त्यांच्याजवळ पृथ्वीवरून नेलेले अन्नपदार्थ होते.

आमचो बाबल्या तसो ‘इदवान’. तुमी ‘इदवान’ या शव्दाचो अर्थ चुकीचो घेव नकात. बाबल्याचा वाचन भरपूर. म्हणान म्या त्येता ‘इदवान’ म्हणतय. शाळेत असताना बाबल्या गणितात कधी पास जावक नाय. असा असला तरी बाबल्याचा वाचन भरपूर. त्येका जी जी पुस्तका वाचनालयात वाचूक मॅळली ती बाबल्यान घडाघडा वाचल्यानी. पुस्तक वाचताना त्येका विषयाचा बंधन नव्हता. जा पुस्तक हातात मॅळात ता बाबल्यान वाचलाच म्हणान समजा. पुढे बाबल्या शिपाय म्हणान कंपणीत नोकरीक लागलो. पण त्येचा वाचनाचा ‘व्यसन’ काय सुटाक नाय. सांगूचो पॉंईट काय, आमच्या बाबल्याचा वाचन अफाट. शणवारी सुट्टीत म्हणान बाबलो वाचनालयात गेललो. नवी काय पुस्तका इली म्हणान चौकशी करी होतो. तेवढय़ाच काऊंटरवरची बाय त्येका म्हणाली, ‘अरे बाबल्या 'या अगदी ताज्या मासळीसारख्या फडफडीत पुस्तक वाचलय काय?’ बाबल्यान त्या पुस्तकार एकच नजर मारल्यानी. पुस्तकाचा नाव बघला--‘चुलत भावांची पत्रां’. ‘अरे 'या पुस्तक आपण अजून वाचूकच नाय कासा?’ असा बाबल्या पुटपुटलो आणि 'पुस्तक वाचण्यासाठी आपल्या थैलीत कोंबल्यांनी. त्या क्षणाक बाबल्याचा डोसक्यात इचार सुरु झालो. आपण पंडित नेहरुंन इंदिराक लिवलेली पत्रा वाचली. चर्चीलची पत्रा वाचल्यांनी. हिटलरची पत्रा वाचल्यांनी. पण ही ‘चुलत भावांची पत्रा’ खयची? बाबल्याची उत्सुकता ताणल्यांनी. शेवटी त्येंनी पुस्तकात डोक्या खुपसलाच. आणि काय सांगतलय.. अरे ही तर राजने उध्दवाक लिलली आणि उध्दवान राजाक लिवलेली पत्रा. पयल्याच पानार अर्पन पत्रिका होती-- ‘या पुस्तक मुंबयतल्या शेकडय़ात शिल्लक रवलेल्या मराठी मानसाक अर्पण’. बाबल्यान आणखी एक पान उलटल्यांनी.. अनुक्रमणिकेर नजर घातली.. उध्दवान राजाक लिवलेल्या पत्रांच्या यादीची हेडींग होती..१) चांगले फोटे कशे काढूचे? २) हेलीकॉफ्टरमधून फोटे काढताना घेवची खबरदारी. ३) शोभेचे मासे कशे पाळूचे? ४) गुळगुळीत भाषण कसा करुचा? ५) वारंवार फॉरेनाक कित्याक जावचा? ६) आपलेच उमेदवार पडण्याची तजवीज कशी करुची ७) ‘घडय़ाळ मावशी’र एक डोळो कसो ठेवचो? ८) फावल्या वेळेत राजकारण कसा करुचा?
बाबल्यान अनुक्रमणेचा पान पालटल्यांनी.. आता यादी होती, राजने उध्दवाक लिवलेल्या पत्रांची..१) शब्दांच्यो कोटय़ो कशो करुच्यो? २) चांगला व्यंगचित्र कसा काढूचा? ३) सभेचो इव्हेंट कसो गाजवचो? ४) एखाद्याची नक्कल कशी करुची? ५) चित्रपट-नाटक क्षेत्रातल्या नामवंतांशी कशे चांगले संबंध ठेवचे? ६) कार्यकर्त्यांक जास्त काळ टातकळत ठेवान आपला महत्त्व कसा वाढवचा? ७) भैयांक मारहाण करुन महाराष्ट्राच्या विकासाच्या ध्यासाची कशी स्वप्ना बघूची? ८) पत्रकारांशी मैत्री कशी वाढवची? ९) हजार मतापासून कोटी मतांची उडी कशी घेवची? १०) कॉंग्रेसाक विजय मिळवून कसो दिवचो? (उध्दवान आठ पत्रा लिवल्यान म्हणान राजने आणखी दोन पत्रा लिवन आपल्या पत्रांची संख्या दहार नेली.)
बाबल्याक ही पत्रा वाचून समाधान वाटला. एक नव्या साहित्याची प्रसूती महाराष्ट्रात झाल्यान म्हणान बाबल्याचो आनंद गगनात मावेनासो झालो. यातून काही नवीन शिव्यो तेक्या शिकूक मॅळल्यो. एक प्रकारे ज्ञानात भरच पडली, त्यामुळे बाबल्या खूष झालोसा.
मध्यंतरी दादरच्या एका बुकस्टॉलात बाबल्या गेललो. त्यावेळी त्येनी त्या मालकाक ‘चुलत भावांची पत्रां’चो किती खप झालो याची चौकशी केल्यांनी. त्यावेळी त्या पुस्तक विक्रेत्यान त्येका सांगला, ‘अहो काय सांगतलय, या पुस्तकाची मराठी आवृत्तीची पुस्तका जेमतेम ५०० पण नाय खपूक. पण इंग्रजी आवृत्ती मात जोरदार खपली. दोन महिन्यांत त्येची तिसरी आवृत्ती निघाली. अजून मागणी आसा’. बाबल्यान असा कसा झाला म्हणान त्येका विचारला असता तो म्हणालो, ‘अहो मराठी माणसाक हल्ली मराठी वाचूक येणा नाय. ते इंग्रजीच वाचतत.’
प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com