Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

शहरात विविध भागात स्वयंचलित वेधशाळा उभारणार!
सर्व भागांतील पावसाच्या नोंदी मिळणार
अभिजित घोरपडे
पुणे, २६ मे

पुण्याच्या कोणत्या भागात सर्वाधिक पाऊस पडतो? कोणत्या भागात जास्त थंडी असते? आणि कोणत्या भागात उकाडय़ाचा सर्वाधिक घाम काढतो?.. आतापर्यंत अनुत्तरित असलेले हे प्रश्न! पुणेकर आपापल्या अनुभवावरून त्यांचे उत्तर द्यायचे. पण या पावसाळ्यानंतर त्यांची नेमकी उत्तरे मिळतील, कारण पुढच्याच महिन्यात शहराच्या विविध भागांतील हवामानाच्या नोंदी घेण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे अशा वेधशाळांचे जाळे असलेले पुणे हे दिल्लीबरोबरच देशातील अग्रगण्य शहर ठरेल.

डॉ. करीर आणि बंड यांचा गाडय़ा खरेदीशी संबंधच काय?
पुणे, २६ मे/प्रतिनिधी

पीएमपीच्या ६५० गाडय़ांच्या खरेदी प्रक्रियेत मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी डॉ. नितीन करीर आणि विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी केलेला हस्तक्षेप संशयास्पद असून, त्यांच्या या खरेदी प्रक्रियेशी संबंधच काय, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे. काही हितसंबंधीयांच्या लाभासाठी सुरू असलेला हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असाही इशारा भाजपने दिला आहे.

आगाऊ मिळकतकर भरणाऱ्या करदात्यांना सिंगापूरची सहल
पिंपरी पालिकेची अभिनव बक्षीस योजना
पिंपरी, २६ मे / प्रतिनिधी
थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर आगाऊ भरणाऱ्या मिळकतधारकांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना सिंगापूर सहलीचा विमान प्रवासाचा खर्च देण्याची बक्षीस योजना िपपरी-चिंचवड महापालिकेने जाहीर केली आहे. नागरिकांना वेळच्या वेळी कर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने करसंकलन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.

सावित्रीच्या लेकी’ होणार आता कारखान्याच्या ‘स्वामिनी’
पिंपरी, २६ मे/प्रतिनिधी

उद्योगनगरीतील बचतगटांच्या माध्यमातून स्वावलंबनाची अनेक अवघड शिखरे पादाक्रांत करणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकी’ आता कारखानदार होणार आहेत. यमुनानगर येथील स्वामिनी महिला बचतगट अखिल महासंघाने हे दिव्य प्रत्यक्षात साकारले असून, त्यांनी उभारलेल्या ‘पॉलिथीन बॅग’च्या कारखान्याचे उद्घाटन येत्या गुरुवारी (२८ मे)खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. महिला बचतगट महासंघाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला हा उद्योगनगरीतील पहिलाच कारखाना आहे.

पॉलिटिक्स इज द गेम ऑफ पेशन्स
खासदार सुळे यांचा भारिप कार्यकर्त्यांना सल्ला
दौंड, २६ मे/वार्ताहर
‘पॉलिटिक्स इज द गेम ऑफ पेशंन्स’. लोकशाहीमध्ये निवडणुकांमध्ये पराभव होतात. अनेक नेते निवडणुकांमध्ये हरले आहेत. पराभवानंतर जोमाने कामाला सुरुवात करायची असते असा सबुरीचा सल्ला बारामती मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना दिला.

राज्यात ९७ टक्के पावसाचा राहुरी कृषी विद्यापीठाचा दावा
पुणे, २६ मे/प्रतिनिधी
राज्यात या पावसाळ्यात सरासरी ९७ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज राहुरी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला आहे. धुळे, सोलापूर, जळगाव, यवतमाळ येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा दावाही या विभागातर्फे करण्यात आला आहे. या विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी हा अंदाज जाहीर केला. मात्र तो कशाच्या आधारावर दिला जातो, हे त्यांनी जाहीर केले नाही. हा अंदाज कशाच्या आधारावर दिला आहे, ही बाब साबळे यांनी स्पष्ट केली नाही. या विभागाकडे मुंबई येथील पावसाची आकडेवारी आधार म्हणून नाही, तरीही त्यांनी मुंबईतील पावसाचा अंदाज दिला आहे.

अनेक भागांमध्ये उद्या दिवसभर पाणीपुरवठा नाही
पुणे, २६ मे/प्रतिनिधी

देखभाल व दुरुस्तीची, तसेच जलवाहिनी बदलण्याची कामे केली जाणार असल्यामुळे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी (२८ मे) दिवसभर बंद राहाणार आहे, तसेच या भागांना शुक्रवारी (२९ मे) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. देखभाल, दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहाणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत. सुभाषनगर, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, महात्मा फुले पेठ, लोहियानगर, एकबोटे कॉलनी, भवानी पेठ, काशेवाडी, हरकानगर, राजेवाडी, पदमजी पार्क, मुकुंदनगर, शंकरशेठ रस्ता परिसर, मीरा हाऊसिंग सोसायटी, घोरपडे पेठ, गुरुनानकनगर आणि झगडेवाडी. जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे गुरुवारी पुढील भागांचा पाणीपुरवठाही दिवसभर बंद राहाणार आहे. गोखलेनगर, फग्र्युसन रस्ता परिसर, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, मॉडेल कॉलनी, जनवाडी, वडारवाडी, रेव्हेन्यू कॉलनी, विधी महाविद्यालय रस्ता, घोले रस्ता, शिरोळे रस्ता, भोसलेनगर, अशोकनगर, पत्रकारनगर, सेनापती बापट रस्ता, शिवाजी हाऊसिंग सोसायटी, वैदूवाडी, आशानगर, आनंद यशोदा सोसायटी, ओम सुपर मार्केट परिसर, चतु:शृंगी परिसर.

अरुणा ढेरे यांना कुसुमाग्रज पुरस्कार
पुणे, २६ मे/ प्रतिनिधी

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या बोरीभडक येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देण्यात येणारा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती साहित्य पुरस्कार यंदा ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांना देण्यात येणार आहे. जागतिक मराठी दिन व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती दिनानिमित्त दरवर्षी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. येत्या २९ मे रोजी संस्थेमध्ये ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते तो देण्यात येणार आहे.

आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते अंकुश कांबळे यांचे निधन
पुणे, २६ मे/ प्रतिनिधी

आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाहक अंकुश महादेव कांबळे (वय ६५) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.कांबळे यांनी हवामान खात्यात फोरमन म्हणून काम करताना अनेक उपक्रम राबविले.

गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
पुणे, २६ मे/ प्रतिनिधी

‘‘माझ्यावर झालेला हल्ला हा रामदास आठवले यांच्या सांगण्यावरून झाला असून परशुराम वाडेकर व नवनाथ कांबळे यांनी केला,’’ असा आरोप टेक्सास गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत केला. या वेळी अखिल भारतीय भीमशाहीर परिषद व बहुजन रिपब्लिकन आघाडी यांनी या हल्लय़ाचा निषेध केला. गायकवाड पुढे म्हणाले, ‘‘माझ्यावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. या लोकशाही मध्ये प्रतिक्रिया दिल्यानंतर हल्ला होतो म्हणजे हा भारतीय संविधानाचा अपमान आहे.’’

ट्रकच्या धडकेने दोघे ठार
पिंपरी, २६ मे/ प्रतिनिधी
वाकड विनोदे नर्सरी येथे सोमवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास ट्रक व दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे हवालदार व्ही. बी. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश चुनीलाल गेहलोत (वय २१, रा. पिंपळे निलख, वाकड) आणि राजू गिरी (वय ३०, रा. बिकानेर, राजस्थान) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. पोलिसांनी ट्रकचालक जिंदेशा बाबू मुल्ला (वय ३२, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यास अटक केली आहे. रमेश व राजू दुचाकीवर वाकडहून कस्पटे वस्तीकडे जात होते. ट्रक कस्पटे वस्तीहून वाकडच्या दिशेने येत होता. यामध्ये त्यांची समोरासमोर धडक झाली. यात राजूचा जागीच मृत्यू झाला, तर रमेशचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रमेश व राजू हे मिठाई दुकानात काम करतात. फौजदार अशोक वंजारी अधिक तपास करीत आहेत.

भाजपच्या दोघा माजी नगरसेवकांसह
चौघांना अटक व सुटका
पिंपरी, २६ मे/ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या दोघा माजी नगरसेवकांसह चौघांना गेल्या वर्षी केलेल्या आंदोलनाबद्दल रविवारी अटक करून तात्पुरत्या जामिनावर मुक्त करण्यात आले.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू अनंत दुर्गे (वय ४२), उमा गिरीश खापरे (वय ४६), मोरेश्वर ज्ञानेश्वर शेंडगे (वय २८) आणि संगीता सोमनाथ शेंडगे (वय ३७) असे अटक व सुटका करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने डिसेंबर २००८ मध्ये महागाईचा भस्मासुर झाल्यावरून देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले होते. या चौघांनी अनेक कार्यकर्त्यांसमवेत निगडीच्या टिळक चौकात काँग्रेस सरकारच्या विरोधात निदर्शने केली होती. यामध्ये सरकारच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले होते. यावरून त्यांनी कायद्याचा भंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिसेंबर २००८ मध्ये झालेल्या गुन्ह्य़ात त्यांना रविवारी अटक करून तात्पुरत्या जामिनावर सोडून देण्यात आले.

अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला
चाकण, २६ मे / वार्ताहर

पुणे-नाशिक महामार्गावरील वाकी गावच्या हद्दीतील भामा नदीच्या पात्रात एका तीस वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार नवनाथ सरमाने व सतीश साळवणे यांनी दिली. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाकी गावच्या हद्दीतील भामा नदीच्या पात्रात तीस वर्षे वयाच्या अनोळखी इसमाचा मृतहेह आढळला. त्याची उंची पाच फूट, अंगात लालसर रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची ट्रॅक्स सूट वरील इलेस्टिकची पॅन्ट, गळ्यात तुळशीची माळ त्यावर बालाजीचे चित्र, उजव्या हातावर मारुतीचे चित्र गोंदलेले, चेहरा पसरट, नाक बसके, केस बारीक असून डोक्याच्या पुढील भागावर टक्कल आहे. वरील वर्णनाच्या व्यक्तिबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी चाकण पोलीस ठाण्याशी संपर्क (दूरध्वनी क्रमांक. ०२१३५-२५२३३३) साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे, पोलीस हवालदार शंकर भवारी, नागेश आष्टुळे, पूनाजी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.