Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

राज्य

ज्येष्ठ ध्वनिलेखक रामनाथ जठार यांना चित्रभूषण पुरस्कार
कोल्हापूर, २६ मे / विशेष प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘चित्रभूषण’ पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ ध्वनिलेखक रामनाथ जठार यांची निवड करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी येथे एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ५१ हजार रुपये रोख, मानपत्र, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात मुंबई येथे जठार यांना समारंभपूर्वक या पुरस्काराचे वितरण केले जाईल, असे सरपोतदार या वेळी म्हणाले.

राज्यात ९७ टक्के पावसाचा राहुरी कृषी विद्यापीठाचा दावा
पुणे, २६ मे/प्रतिनिधी

राज्यात या पावसाळ्यात सरासरी ९७ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज राहुरी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला आहे. धुळे, सोलापूर, जळगाव, यवतमाळ येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा दावाही या विभागातर्फे करण्यात आला आहे. या विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी हा अंदाज जाहीर केला.

पहिल्या जागतिक विश्व संत साहित्य महासंमेलनाच्या अध्यक्षपदी पठाण
औरंगाबाद, २६ मे/खास प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्य़ातील तिवसा तालुक्यातील मोजरी येथील गुरुकुंज आश्रमात १ जानेवारी २०१० रोजी सुरू होणाऱ्या पहिल्या जागतिक विश्व संत साहित्य महासंमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यू. म. पठाण यांची आज निवड झाली. तसे पत्र संयोजक डॉ. नानजीभाई ठक्कर-ठाणावाला व चंद्रकांत खराडे यांनी डॉ. पठाण यांना आज सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी दिले.

लक्ष्मण माने यांना यंदाचा भाई बागल पुरस्कार
कोल्हापूर, २६ मे / विशेष प्रतिनिधी

येथील भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘भाई माधवराव बागल पुरस्कारा’साठी यंदा भटक्या व विमुक्त समाजाचे नेते पद्मश्री लक्ष्मण माने यांची निवड करण्यात आली आहे. ५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिनांक २८ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनात जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण करण्यात येईल.

बर्कीच्या धबधब्यात सध्या राज्य मधमाश्यांचे!
शाहूवाडी, २६ मे / वार्ताहर

हिरवीगार वनराई, नानाविध प्रकारच्या जंगली वनस्पतींच्या फुलांचा दरवळणारा रानगंध, फुला-फुलांवरून घोंघावणाऱ्या मधमाश्यांचे थवे, पावसाळय़ात किमान चार महिने हौशी पर्यटकांच्या गर्दीचा ओसंडणारा धबधबा, पण सध्या पूर्णपणे निर्मनुष्य असणारा परिसर. आता येथे केवळ डोंगरकडय़ांना मधमाश्यांची पोळी लटकलेली दिसतात. एरव्ही येथे माणसांची झुंबड. पण सध्या येथे मधमाश्यांमुळे कोणी जाण्यास धजत नाही.

एक लाखाची भरपाई देण्याचा शिवाजी विद्यापीठाला मंचचा आदेश
कॉपीचा खोटा ठपका ठेवून निकाल राखीव ठेवला
कोल्हापूर, २६ मे / विशेष प्रतिनिधी
परीक्षेत कॉपी केल्याचा खोटा ठपका ठेवून विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवल्याने झालेला मानसिक त्रास आणि शैक्षणिक नुकसानीबद्दल शिवाजी विद्यापीठाने एक लाख रुपयांची नुकसानभरपाई विद्यार्थ्यांला द्यावी असा महत्त्वपूर्ण निकाल येथील जिल्हा ग्राहक मंचाने दिला आहे. मंचचे अध्यक्ष एम. डी. देशमुख व श्रीमती प्रतिमा करमरकर यांनी हा निकाल दिला.

अचलपूर पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाची व्यापाऱ्यांकडून मोडतोड
अमरावती, २६ मे / प्रतिनिधी

अचलपूर येथील पालिकेच्या व्यापारी संकुलात जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग आणि तेथील दूरवस्थेबद्दल पाच दिवसापूर्वी निवेदनाद्वारे इशारा देऊनही पालिकेने काहीच हालचाली न केल्याने संतापलेल्या व्यापाऱ्यांनी आज दुपारी अचलपूर पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाची मोडतोड करून सोबत आणलेला कचरा कक्षात नेऊन टाकल्याने चांगलाच गोंधळ उडाला.

पालखी सोहळ्याचा कार्यक्रम घोषित
पुणे, २६ मे / प्रतिनिधी

अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदाय ज्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो, त्या आषाढीवारीच्या पालखी सोहळ्याचा श्रीगणेशा १५ जूनपासून होत आहे. ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला (दि. १५) संत तुकाराम महाराजांची तर, ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला (दि. १६) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान अनुक्रमे श्रीक्षेत्र देहू व आळंदी येथून होणार आहे. या सोहळ्याची पताका खांद्यावर घेण्यासाठी वारक ऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

नदीमध्ये बुडून चौघांचा मृत्यू
रत्नागिरी, २६ मे/खास प्रतिनिधी

लांजा तालुक्यातील मुचकुंदी नदीमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या चौघांचा काल (२५ मे) रात्री बुडून मृत्यू ओढवला. या घटनेतील आणखी एक जण मात्र नशिबाने वाचला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, युवराज दादू भुवड (६०), संतोष शिवराम भुवड (१६), नारायण दादू भुवड (५५), प्रमोद नारायण भुवड (१३) आणि राजेंद्र तुकाराम भुवड हे पाच जण काल रात्री मुचकुंदी नदीमध्ये मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करत ते पुढे पुढे जात असता वेणी (ता. लांजा) येथे नदीच्या खोल पात्रामध्ये हे सर्वजण बुडू लागले. रात्रीचा अंधार असल्यामुळे कोणालाही परिसराचा नीट अंदाज आला नाही. त्यापैकी राजेंद्र भुवड पोहत किनाऱ्यावर पोचले आणि त्यांनी आरडाओरड केल्यावर गावकरी गोळा झाले. सर्वानी पोलिसांच्या मदतीने नदीच्या पात्रामध्ये शोध घेतला असता चौघांचे मृतदेह हाती लागले. हे सर्वजण राजापूर तालुक्यातील देवी हसवले गावातील होते.

जळगावच्या महापौरांना अपात्र ठरविण्याची मागणी
जळगाव, २६ मे / वार्ताहर

स्वत: गेल्या २० वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या घराचा नियमानुसार कर भरणा न करता महापालिकेची आर्थिक फसवणूक करण्याबरोबरच मेहरूण तलावातून बेकायदेशीरपणे पाणी उचलल्याच्या आरोप थेट महापौर रमेश जैन यांच्यावर करतानाच या प्रकरणी गुन्हा दाखल करावा व त्यांना अपात्रही ठरवावे, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते उल्हास साबळे यांनी केली आहे. साबळे यांनी पालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांना दोन वेगवेगळी निवेदने सादर केली असून त्यात उपरोक्त विषयान्वये महापौरांना दोषी ठरवत अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री चव्हाण शनिवारी रत्नागिरीमध्ये
रत्नागिरी, २६ मे/खास प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण येत्या शनिवारी (३० मे) रत्नागिरीच्या दौऱ्यावर येणार असल्याचे आमदार राजन तेली यांनी येथे जाहीर केले. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चव्हाण प्रथमच रत्नागिरीमध्ये येत असून, काँग्रेस आघाडीचे नवनिर्वाचित खासदार नीलेश राणे यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हा एकमेव कार्यक्रम असल्याचेही तेली यांनी स्पष्ट केले.