Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

क्रीडा

मानांकितांची दौड सुरू
फेडरर, विल्यम्स, शारापोव्हा दुसऱ्या फेरीत

पॅरिस, २६ मे / एपी
गेली तीन वर्षे अंतिम फेरीत पोहोचूनही विजेतेपदापासून दूर राहिलेल्या रॉजर फेडररने यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये सलामीच्या लढतीत सहज विजय मिळवून यावर्षीही आपण विजेतेपदासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. द्वितीय मानांकित फेडररने स्पेनच्या अल्बटरे मार्टिनला ६-४, ६-३, ६-२ असे नमविले. या विजयासह त्याने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालही दुसऱ्या फेरीत पोहोचलेला आहे.

सानियाचे एकेरीतील आव्हान संपुष्टात
पॅरिस, २६ मे / पीटीआय

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाचे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या एकेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. कझाकस्तानच्या गॅलिना वास्कोबोइव्हाकडून ती ४-६, ६-७ (३) अशा सरळ सेटमध्ये पराभूत झाली. सानियाने यापूर्वीची रोलँड गॅरोसवरील आपली परंपरा यावेळीही कायम राखली. याआधीही ती दुसऱ्या फेरीच्या पुढे कधीही गेलेली नाही. त्याशिवाय, तिला या स्पर्धेत खेळण्यापूर्वी आवश्यक तेवढा सरावही करता आला नाही. पहिल्याच सेटमध्ये सानियाच्या खेळातील चुका प्रकर्षांने जाणवल्या. तब्बल सहा दुहेरी चुका तिने या सेटमध्ये केल्या. त्याशिवाय, मिळालेल्या चार ब्रेक पॉइंट्सचे विजयी गुणांत रूपांतर करण्यातही तिला अपयश आले. तुलनेत वास्कोबोएव्हाने पहिल्या सेटच्या सातव्या गेममध्ये मिळालेल्या ब्रेक पॉइंटवर विजय मिळवित हा सेट ४६ मिनिटांत जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सानियाने चांगली प्रतिकार केला. आपल्या दुहेरी चुकांतही तिने घट केली. पण टाळता येण्याजोग्या १४ चुका तिच्या हातून झाल्या. त्याचा फायदा वास्कोबोएव्हाने अचूक उचलला. एकेरीत सानिया पराभूत झाली असली तरी दुहेरीत तिचे आव्हान शिल्लक आलेले आहे. दुहेरीत ती तैपेईच्या चिआ-जुंग चुआंग हिच्यासह खेळणार आहे. सानिया आणि चुआंग यांना १४वे मानांकन आहे.

आशियातील आघाडीच्या टेनिसपटूंना संमिश्र यश
पॅरिस, २६ मे / एएफपी

आशियातील आघाडीच्या टेनिसपटूंना आज फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत संमिश्र यश लाभले. ऐ सुगियामाला आज पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला तर थायलंडच्या तामारिन तानासुगर्नने विजय मिळविला. ३२ वर्षीय तामारिनने फ्रान्सच्या कॅमिली पिनला ६-३, ५-७, ७-५ असे पराभूत करीत फ्रान्सच्या चाहत्यांना निराश केले. दोन तास ५५ मिनिटे ही लढत चालली.

भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक राखण्याची क्षमता-मांजरेकर
नवी दिल्ली, २६ मे/ पीटीआय

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज आणि माजी कर्णधार वसीम अक्रमने भारतीय संघ यावेळी ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकू शकत नाही, असे म्हणत रिव्हर्स स्विंग टाकला होता. त्या चेंडूवर आज भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने ‘स्ट्रेट ड्राईव्ह’ लगावत भारतीय संघाची पाठराखण केली आहे. २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक पटकाविललेल्या भारतीय संघामध्ये यंदाही तीच कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे मत मांजरेकरने व्यक्त केले आहे.

क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा प्रस्ताव पिपरी पालिकेने फेटाळला
काँग्रेस, राष्ट्रवादीचे कुरघोडीचे राजकारण?
पिंपरी, २६ मे / प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्या पुढाकाराने थेरगाव येथे सुरू करण्यात आलेल्या दिलीप वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीकडून पिंपरी पालिकेकडे ‘इनडोअर क्रिकेट’साठी भाडेदराने जागेची मागणी करण्याचा प्रस्ताव पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीने कोणतीही चर्चा न करता फेटाळून लावला. काँग्रेस पक्षातील अंतर्गत कुरघोडी तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.

गैरव्यवहारामुळे राष्ट्रकुल स्पर्धेची कामे रखडलेली- मल्होत्रा
नवी दिल्ली, २६ मे/ पीटीआय

२०१० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेची कामे गैरव्यवहारामुळे रखडलेली आहेत असा आरोप जीएएनएसएफचे (जनरल असोसिएशन ऑफ नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन) अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा यांनी केला आहे. मल्होत्रा हे भारतीय ऑलिंम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत.राष्ट्रकुल स्पर्धेला ५०० दिवस बाकी असताना फक्त ३० ते ४० टक्केच कामे पूर्ण झालेली आहेत. गैरव्यवहारामुळे ही सर्व कामे रखडलेली असून हे असेच सुरु राहीले तर स्पर्धेचे काही खरे नाही, असे मल्होत्रा यांना वाटते. आता पर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेचे काम पूर्ण झालेले नाही. जसजशी स्पर्धा जवळ येईल तसतशी काम घाईने करायला लागतील आणि त्यामध्ये जास्तीतजास्त पैसा खर्च होईल. काही बांघकाम व्यायसायिक आणि अन्य काही जणांचा यामध्ये हात असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले.

बॅडमिंटन: सायली गोखले आणि पी. कश्यप विश्वचषाकामध्ये करणार भारताचे नेत्तृत्व
नवी दिल्ली, २६ मे/ पीटीआय

हैदराबाद येथे १० ते ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या बॅडमिंटन विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताच्या ‘व्हाईल्ट कार्ड’ प्रवेश दिल्याने एका अतिरीक्त संघाची घोषणा आज करण्यात आली असून या संघाचे नेत्तृत्व सायली गोखले आणि पी. कश्यप यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या भारतीय संघात अरूण विष्णू, अपर्णा बालन, के. तरूण आणि श्रृती कुरीयन यांचाही समावेश करण्यात आला आहे. अव्वल ६४ बॅटमिंटनपटूंना विश्वचषाकामध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याने एकेरीमध्ये चेतन आनंद, अरविंद भट्ट, सायना नेहवाल आणि अदिती मुतातकर यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तर दुहेरीसाठी रुपेश कुमार, एस. थॉमस, अक्षय देवलकर आणि जिष्णू सन्याल यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. मिश्र दुहेरीसाठी व्ही. डीजू, ज्वाला गुप्ता, अरूण विष्णू आणि अपर्णा बालन यांनाही भारतीय संघात प्रवेश देण्यात आला आहे.

दुखापतीमुळे युकी भांबरीची माघार
नवी दिल्ली, २६ मे / पीटीआय

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत ज्युनियर गटाचे विजेतेपद पटकाविणारा युकी भांबरी याला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत घोटय़ाच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. कुवेत येथे आयटीएफ फ्युचर्स स्पर्धेत त्याला ही दुखापत झाली होती. युकीला दुखापतीतून सावरण्यासाठी डॉक्टरांनी १५ दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या दुखापतीबद्दल सांगताना युकी म्हणाला की, माझ्या घोटय़ाला सूज आली असून त्यामुळे धावताना मला वेदना होतात. बर्फ लावून मी खेळू शकतो, पण त्यानंतर पुन्हा सूज येण्याची शक्यता असते. त्यामुळे दुखापत वाढू देण्याऐवजी न खेळणेच बरे असे मी ठरविले.