Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

जुन्या दगडांनी नवी धूळफेक!
दिलीप शिंदे

ठाण्याची ओळख बनलेल्या मासुंदा तलावाला नवा लूक देण्यासाठी तब्बल ३ कोटी ९६ लाख रुपये खर्च केले जात असले तरी प्रत्यक्षात जुन्या दगडांच्या सहाय्याने नवी धूळफेककरण्याचाच हा मामला असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. तलावाचे जुने दगड वापरून नव्याने कठडे बांधले जात आहेत. या प्रकल्पाच्या मूळ किमतीपेक्षा ठेकेदाराला ४६ लाख रुपये अतिरिक्त मोजण्यात आले आहेत. जुन्या वस्तूने नवा लूक देऊन ठाणेकरांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजप युतीतील काही सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे या तलावाची मालकी असलेल्या महसूल खात्याला अंधारात ठेवण्यात आले आहे.

ग्रंथसंग्रहालयाचे स्थलांतर केल्यास बेमुदत उपोषण
नगरसेविकेचा इशारा

डोंबिवली/प्रतिनिधी - ‘पालिकेचे फडके रोडवरील ग्रंथसंग्रहालय हे फडके रोड परिसरातच राहील. ते कोठेही स्थलांतरित करू दिले जाणार नाही आणि तसा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केलाच तर मी त्यास कडाडून विरोध करीन. वाचक, सदस्य, नागरिकांनी ग्रंथसंग्रहालय स्थलांतर होणार नाही यावर विश्वास ठेवावा’, असे आवाहन शिवमार्केट प्रभागाच्या स्थानिक नगरसेविका प्राची शुक्ल यांनी केले आहे. तर टिळकनगर प्रभागाच्या नगरसेविका मंगला सुळे यांनी नागरिकांची गैरसोय करून ग्रंथालय हलविण्याचा प्रयत्न केला तर चार हजार सदस्य नागरिकांना बरोबर घेऊन बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पालिकेला दिला आहे.

‘लॅपटॉप’ खरेदी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे ग्रंथसंग्रहालयांकडे दुर्लक्ष का?
संतप्त नागरिकांचा सवाल

कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना पालिकेचे पदाधिकारी मात्र लॅपटॉप घेण्यास धजावले आहेत. मात्र, पालिकेचे डोंबिवलीतील पुस्तकांनी भरलेले सुसज्ज ग्रंथालय गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडले आहे. त्याकडे पदाधिकाऱ्यांना लक्ष देण्यास का वेळ नाही, असा प्रश्न शहरातील संतप्त नागरिक करत आहेत. १०७ नगरसेवकांना पालिकेतील स्टेशनरी खर्चाची बचत करण्यासाठी लॅपटॉप देण्याची योजना तयार करण्यात आली.

आनंद ठाकूर राजीनाम्याच्या तयारीत?
पालघर/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस टीकेचे लक्ष्य ठरली, हे खरे असले तरी अजित पवारांच्या हस्तक्षेपामुळे झालेल्या मानहानीचे दु:ख पचविणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांना जड जात आहे. अजितदादांचे हे अवसानघातकी राजकारण साहेबांपर्यंत पोहोचायला हवे, अशा मतापर्यंत ते आले असून याची किंमत म्हणून जिल्हाध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले तरी त्यासाठीही त्यांनी आपल्या मनाची तयारी केल्याचे सांगितले जाते.

मुलांमध्ये गोंधळ माजविणाऱ्या पालकांची ‘भावनिक बुद्धय़ांक’ टेस्ट करण्याची गरज - जोग
डोंबिवली / प्रतिनिधी
आपल्या मुलांना अमुकच शिक्षणक्रम पूर्ण कर, तमुकच नोकरी कर, म्हणून दबाव टाकणारे पालक हेच सध्याच्या परिस्थितीत गोंधळ माजवीत आहेत. मुलांपेक्षा पालकांना करिअर गाईडन्सची खरी गरज आहे आणि पालकांचा भावनिक बुद्धय़ांक टेस्ट करण्याची गरज आहे, असे करिअर गाईडन्सचे समुपदेशक आणि ‘एनसायक्लोपीडिआ ऑफ करिअर गाईडन्सचे’ लेखक किरण जोग यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
‘एनसायक्लोपीडिआ ऑफ करिअर गाईडन्स’ हे जोग यांचे इंग्रजी पुस्तक नुकतेच बाजारात आले आहे,

‘नागरिकांच्या जागरूकतेसाठी ‘निशाणी डावा अंगठा’ची निर्मिती’
डोंबिवली / प्रतिनिधी

नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी म्हणून ‘निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितले. प्रतिमा फिल्म सोसायटीच्या स्थापनेला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संस्थेने मधुबन चित्रपटगृहात ‘निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटाचा प्रीमिअर शो आयोजित केला होता. यावेळी निर्माता विक्रम जोशी, सुहास जोशी, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, पटकथाकार प्रशांत दळवी उपस्थित होते.

ठाण्यात रविवारी गजलोत्सव
ठाणे / प्रतिनिधी

मराठी गजलचा महाविष्कार ठरणाऱ्या ‘गजलोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये करण्यात आले आहे. यावेळी गजललेखन संशोधन क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करणारे डॉ. राम पंडित यांना बांधन जनप्रतिष्ठान जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जनप्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पा ठाकूर यांनी दिली. कार्यक्रमास मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिकमंत्री हर्षवर्धन पाटील, प्रख्यात उर्दू शायर निदा फाजली आदी उपस्थित राहणार आहेत. रविवारी ३१ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता गडकरी रंगायतनमध्ये पार पडणाऱ्या गजलोत्सवात दिलीप पांढरपट्टे, नीता भिसे, किशोळ बळी, सुनील तांबे, प्रफुल्ल कुलकर्णी, सुनंदा शेळके, डॉ. संदीप माने, संगीता जोशी, संदीप माळवी आदी निवडक शायर आणि गजलकार सहभागी होणार आहेत, तर गजल गायन मैफलीत चेतन बडगुजर, राजेश उमाळे, हेमा उपासनी, विजय गटलेवार, मदन काजळे आदी कलाकार सहभागी होणार आहेत. मराठी गजल रसिकांना पर्वणी ठरणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून, त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा. त्यासाठी आयडियल बुक डेपो, गडकरी रंगायतन येथे प्रवेशिका उपलब्ध असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

शेणवे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड
कल्याण/प्रतिनिधी - केंद्र शासनाकडून देण्यात येत असलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती योजनेसाठी पद्मश्री अण्णासाहेब जाधव संचालित भारतीय समाजोन्नती मंडळाचे शेणवे विभाग हायस्कूलमधील राहुल हजारे, विशाल कुडव आणि सिध्दार्थ ओव्हाळ या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी शेणवे हायस्कूलमधील सहा विद्यार्थी बसले होते. त्यापैकी या तीन विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. इयत्ता बारावीपर्यंत या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव, प्राचार्य व्ही. एस. पाटील, शालेय समिती अध्यक्ष पुंडलिक शिर्के यांनी कौतुक केले आहे.

वसंत देशपांडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
डोंबिवली/प्रतिनिधी - ‘प्रिय बंधु भगिनींनो’ हे पुस्तक प्रकाशित करून लेखक वसंत देशपांडे यांनी आपल्या जीवनातील विचारधन रसिकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब डोंबिवली पूर्वचे अध्यक्ष श्रीप्रकाश रायकर यांनी रविवारी येथे केले. देशपांडे लिखित ‘प्रिय बंधु भगिनींनो’ या भाषणांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रोटरी हॉलमध्ये आयोजित केला होता. यावेळी विनायक नांदुर्डेकर, रेल चाईल्ड संस्थेचे कार्यवाह सुरेश खेडकर उपस्थित होते. रायकर म्हणाले, जीवनात वाटचाल करताना देशपांडे यांना जे अनुभव आले, ते त्यांनी शब्दबद्ध करून नवीन पिढीसमोर ठेवण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. हे अनुभवांचे बाळकडू पुढे एखाद्या जीवनाला नवीन वाट मिळून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. आपल्या साहित्यसेवेतून देशपांडे यांनी संस्कारमय जीवनाचा एक खजिनाच आपल्या तीन पुस्तकांमधून उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी या अमृतमयी बोधामृताचा लाभ घ्यावा. नांदुर्डेकर यांनी गोष्टीरूपाने वसंत देशपांडे यांची ओळख रसिकांना करून दिली. देशपांडे यांच्यामधील कृतज्ञता भाव, त्यांचा प्रेमळ स्वभाव, प्रामाणिक धडपड अशा अनेक पैलूंवर त्यांनी झोत टाकला.

‘इतरांना गप्प बसविण्यासाठी हातवारे केले नाहीत’
कल्याण/प्रतिनिधी

नगरसेवक कैलास शिंदे यांनी महासभेत अजेंडा फेकून दिल्यामुळे महाभारत घडले. असे महाभारत घडू नये म्हणून भाजपचा गटनेता म्हणून मी ‘गप्प’ बसण्याची भूमिका घेतली. ती योग्य भूमिका होती. शासनातील सत्तेत असलेल्यांनीच शासनावर टीका करणे म्हणजे ‘घरचा अहेर’ देण्यासारखे असते याची जाणीव भाजपचा गटनेता म्हणून मला नक्कीच होती. त्यामुळे माझ्या पक्षाच्या कोठल्याही नगरसेवकाला गप्प बसा म्हणून मी हातवारे केले नाहीत, असा खुलासा भाजपचे नगरसेवक मुकुंद देसाई यांनी केला आहे.

बदलापूर भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
बदलापूर/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीमध्ये भिवंडी मतदारसंघातून भाजपच्या जगन्नाथ पाटील यांचा पराभव झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून बदलापुरात तीन भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शहर महिला आघाडी अध्यक्षा आणि नगरसेविका प्रणिता कुलकर्णी यांनी अध्यक्षपदाचा तसेच सरचिटणीस भरत म्हाळस आणि सचिव मनोहर हुवाळे यांनी आपापल्या पदाचे राजीनामे शहर अध्यक्ष अविनाश मोरे यांच्याकडे पाठविले आहेत. पाटील यांना निवडणुकीमध्ये बदलापूरमधून योग्य ते मताधिक्य देता आले नाही, तसेच मतदारसंघात पक्षाचे काम समाधानकारक नसल्याचे कारण सांगून राजीनामे दिल्याचे समजते. या संदर्भात मोरे यांच्याशी संपर्क साधला असता राजीनामे दिले असले तरी ते स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. बदलापूर शहरातून जगन्नाथ पाटील यांना सुमारे आठ हजारांची आघाडी मिळाली.

शिक्षण मंडळावर जाधव व रोडगे यांची नियुक्ती
बदलापूर/वार्ताहर

बदलापूर नगरपालिकेच्या शिक्षण मंडळावर शासननियुक्त सदस्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव यांच्याप्रमाणे सुधीर रोडगे यांचा समावेश आहे. यापूर्वी संजय भोईर, कालिंदी गचके, राजेंद्र शिंदे, सुनील मेने, अविनाश भोपी, अश्विन पटेल, विजय मांडवकर, शरद तेली, प्रकाश सावंत हे दहा सदस्य निवडून आलेले आहेत. तसेच अंबरनाथ पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी यांची देखील शासनाने नियुक्ती केली आहे.