Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

युक्रेनच्या घातक आयातीची ‘धातू’परीक्षा..
नवी दिल्ली, २६ मे/प्रतिनिधी

 

भारताच्या आण्विक क्षमतेमुळे जगातील धातूउद्योगाला तसेच धातुमिश्रित खनिज शुद्धीकरण उद्योगाला अनेक नव्या संधी लाभत आहेत. जगावर आर्थिक मंदीचे सावट असले तरी भारतातील बांधकाम उद्योग मात्र तेजीत आहे. या बांधकाम उद्योगाकडेही जगभरातील धातूकंपन्यांचे लक्ष आहे. भारताच्या अणुप्रकल्पांपासून ते या बांधकाम उद्योगापर्यंत लागणाऱ्या विविध धातूउत्पादनांच्या व्यापारात आपला सर्वाधिक वाटा असावा यासाठी युक्रेन सध्या हिरिरीने प्रयत्न करीत आहे. युक्रेनच्या या धडपडीमागील काळ्या बाजूकडे लक्ष वेधण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी आता कंबर कसली आहे. पर्यावरणवाद्यांच्या जोडीनेच अनेक शास्त्रज्ञांनीही युक्रेनशी संबंध स्थापित करण्याबाबत प्रतिकूल मते नोंदविली आहेत.
युक्रेन सध्या भारताला टय़ूब्स, चॅनेल्स, बीम्स, ग्रिड्स अशी विविध धातूजन्य उत्पादने विकण्याच्या प्रयत्नात आघाडीवर आहे. भारतात तेजीत असलेल्या बांधकाम उद्योगात ती सर्रास वापरली जात आहेत. पण ही उत्पादने घातक अशा चेर्नोबिल अणुभट्टय़ांच्या परिसरातील ‘रेडिओअ‍ॅक्टिव्ह मेटल स्क्रॅप’वर म्हणजेच किरणोत्सर्गयुक्त भंगारावर पुनप्र्रक्रिया करून तयार झालेल्या धातूंपासून बनविली जातात त्यामुळे ती अनारोग्य निर्माण करीत आहेत, याकडे पर्यावरणवादी लक्ष वेधत आहेत. किरणोत्सारी भंगारापासून तयार झालेल्या या उत्पादनांत घातक धातूअंश मोठय़ा प्रमाणात असल्यावरून अनेक देशांनी युक्रेनच्या उत्पादनांवर बंदी घालायला सुरुवात केली असल्याने भारतात बाजारपेठ मिळविण्याची युक्रेनची धडपड रोखली पाहिजे, असे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.
युक्रेनच्या अर्थकारणात धातूउद्योगाचा मोठा वाटा आहे. युक्रेनच्या निर्यातीतही या उद्योगाचा मोठा सहभाग आहे. दरवर्षी युक्रेन दोन कोटी टन धातूउत्पादनांची निर्यात करतो. ही निर्यात ६० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. यातील बरीच उत्पादने ही कुख्यात चेर्नोबिल अणुऊर्जा केंद्रातील ‘रेडिओअ‍ॅक्टिव्ह मेटल स्क्रॅप’च्या म्हणजेच किरणोत्सर्गयुक्त भंगारावरील प्रक्रियेने तयार होतात! आण्विक प्रकल्पांतून लष्करासाठी वा उद्योगांसाठी जेव्हा उत्पादन सुरू असते तेव्हा जे भंगार तयार होते त्याचा वापर करून धातुनिर्मिती करणे स्वस्ताचे असते. मात्र अणुभट्टय़ांतील किरणोत्सारामुळे असे भंगारदेखील आरोग्यासाठी मोठे घातक असते. हे भंगार वापरणाऱ्या कंपन्यांना युक्रेनमध्ये जणू मोकळे रान मिळाले आहेत. ‘युक्रेन मेटल’ ही सरकारी कंपनी दरवर्षी चेर्नोबिल परिसरातून गोळा केलेल्या दीड लाख टन धातूभंगारावर प्रक्रिया करते. हे प्रक्रिया केलेले भंगार मग कच्च्या धातूत मिसळले जाते. त्यामुळे कित्येक उत्पादने ही घातक ठरतात. या साऱ्या प्रक्रियेवर अर्थातच कोणतेही नियंत्रण नाही.
एप्रिल १९८६ मध्ये चेर्नोबिल अणुभट्टीत जो स्फोट झाला त्यात ५० टन आण्विक धूळ वातावरणात सोडली गेली. त्या किरणोत्सर्गाची झळ हजारो लोकांना पोहोचली होती. त्यावरून या परिसरातील किरणोत्सारी भंगारही आरोग्यासाठी किती घातक असावे, याची कल्पना करता येईल. चेर्नोबिल अणुभट्टी परिसरात असा दुय्यम दर्जाचा ‘कच्चा माल’ तब्बल १५ लाख टन एवढा आहे. त्याची किंमत १० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यात भर म्हणजे युक्रेन सरकारने या अणुभट्टी परिसरासंबंधातील कायद्यांमध्ये अशा दुरुस्त्या केल्या आहेत की हे भंगार स्थानिक उद्योगांना सहज उपलब्ध होत आहे. २००५ मध्ये युक्रेन सरकारने आण्विक प्रकल्पांभोवतालच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या मर्यादेत मोठय़ा प्रमाणात कपात केली होती. त्यामुळे ३० किलोमीटर परिघातील प्रतिबंधित क्षेत्र केवळ दहा किलोमीटर परिघापुरते उरले होते. त्यामुळे स्थानिक उद्योगांना अणुभट्टी परिसरातील घातक ‘कच्चा माल’ कायदेशीर मार्गाने सहजप्राप्य झाला होता.
त्या आधीच्याच वर्षी म्हणजे २००४ मध्ये युक्रेन सरकारने चेर्नोबिल भट्टीपरिसरातील घातक भंगार गोळा करून त्यापासून स्वस्त धातूचे पुनर्उत्पादन करण्यासाठी धातुक्षेत्रातील कंपन्यांसाठी निविदा काढण्यास सुरुवात केली होती. खरे तर धातूमध्ये अल्पसादेखील रेडिओअ‍ॅक्टिव्ह (किरणोत्सारी) अंश राहू नये यासाठी अद्ययावत तंत्राने या ‘भंगारा’तील धातूचे शुद्धीकरण करण्याची अट या कंपन्यांवर कागदोपत्री असली तरी युक्रेनहून आयात झालेल्या या धातूंमध्ये युरोपीय कंपन्यांना प्लुटोनियम २३९ आणि २३८, युरेनियम २३५ आणि २३८, अमेररिशियम २४१ यांचे अंश आढळले. या धातूउत्पादनांतील रेडिओअ‍ॅक्टिव्ह अंशासाठी जी कमाल मर्यादा ठरली आहे तिच्यापेक्षा २५ पट प्रमाण युक्रेनमधील या धातूंमध्ये आढळले. धातूउत्पादनातील किरणोत्सर्गाची मर्यादा ओलांडली गेल्यावरून २००६ मध्ये कुवेत आणि जॉर्डनने युक्रेनची धातूआयात रद्द केली होती. तेव्हापासून युक्रेनच्या धातूआयातीसह ही उत्पादने रेडिओअ‍ॅक्टिव्हदृष्टय़ा सुरक्षित असल्याची छाननी जागतिक मान्यताप्राप्त संस्थेतर्फे करून तसे प्रमाणपत्र जोडण्याची अट युक्रेनवर अनेक देशांनी घातली आहे.
असे असले तरी किरणोत्सर्गयुक्त भंगारावर औद्योगिक प्रक्रिया करताना त्यातील घातक अंश काढून टाकण्याची कोणतीही विश्वासार्ह यंत्रणा या घडीला अस्तित्वात नाही, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. आज घडीला घातकअंश काढून टाकण्यासाठी जी अद्ययावत यंत्रणा मानली जाते ती केवळ ३० टक्के घातकअंशच काढू शकते, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रक्रियेनंतरही धातूंमध्ये घातक अंश उरत आहेत. त्यातही गामा किरणांचे उत्सर्जन निश्चित करता येते पण बिटा आणि गामा किरणांचा माग काढण्यासाठी अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडावी लागते, जी पाळली जात नाही.
युक्रेनहून आयात होणाऱ्या धातुउत्पादनांतील २५ टक्के उत्पादने भारतातील बांधकाम व्यवसायात वापरली जातात. त्यामुळे किरणोत्साराचा मोठा फटका या इमारतींमध्ये राहणाऱ्यांना बसतो. किरणोत्सारी जलवाहिन्यांमधून येणारे पाणी प्यायल्यानेदेखील श्वसनाचे, मूत्रपिंडाचे विकार तसेच थायराइड व अन्य रोग जडतात. जागतिक आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर तसेच युरोपीय देशांमधील प्रतिकूल प्रतिसादामुळे युक्रेनने धातूउद्योगासाठी नवे ग्राहक शोधायला सुरुवात केली आहे. त्या यादीत भारत अग्रभागी आहे. मात्र या धातूउत्पादनांच्या जडणघडणीचा घातक ‘भूतकाळ’ लक्षात घेता लोकांच्या जिवाशी खेळ मांडणाऱ्या या उत्पादनांवर बंदी घालावी, अशी जोरदार मागणी पर्यावरणवादी करीत आहेत. जोवर युक्रेन किरणोत्सारी भंगाराच्या पुनप्र्रक्रियेवर बंदी घालत नाही, कच्च्या धातूवरील प्रक्रियेवर काटेकोर लक्ष ठेवणारी यंत्रणा उभारत नाही आणि आपल्या धातूउत्पादनांना जागतिक मान्यताप्राप्त संस्थेचे सुरक्षिततेचे प्रमाणपत्र जोडत नाही तोवर युक्रेनच्या धातूआयातीवर बंदी जारीच राहावी, अशी मागणी पर्यावरणवादी करीत आहेत.