Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

डॉ. अशोक जोशी यांना प्रतिष्ठेचा ‘आयआरआय’ पुरस्कार
बोस्टन, २६ मे/वृत्तसंस्था

 

औद्योगिक संशोधन व विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘इंडस्ट्रीयल रीसर्च इन्स्टिटय़ूट’ (आयआरआय)ने ‘सिरॅमॅटेक’ कंपनीचे अध्यक्ष डॉ. अशोक जोशी यांचा नुकताच बोस्टन येथे २००९ सालच्या ‘आयआरआय अचिव्हमेन्ट’ पुरस्काराने समारंभपूर्वक गौरव केला. व्यक्तिगत पातळीवरील ज्या सर्जनशील प्रयत्नांमुळे वा शोधामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळते व समाजाचा लाभ होतो अशा प्रयत्नांना दाद देण्यासाठी १९७३ पासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. ‘शास्त्रज्ञ, संशोधक, उद्योजक, समाजसेवक आणि समाजधुरीण म्हणून डॉ. जोशी यांनी धडाडीने जे कार्य केले त्याचा हा गौरव आहे. आपली संपूर्ण कारकीर्द त्यांनी अविरत कष्ट करीत उद्योगांसमोरील समस्या सोडविणारे नवनवे शोध लावण्यातच व्यतीत केली आहे,’ असे गौरवोद्गार ‘आयआरआय’चे अध्यक्ष एडवर्ड बर्नस्टेन यांनी यावेळी काढले. औद्योगिक संशोधनासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या संस्थेकडून झालेला गौरव माझ्यासाठी कृतार्थ अनुभव आहे, असे भावपूर्ण उद्गार डॉ. जोशी यांनी काढले.
१९७२ मध्ये पीएच.डी. ची पदवी मिळविल्यानंतर डॉ. जोशी यांनी अमेरिकेत स्वतला संशोधन कार्यात जुंपून घेतले. अनेक कंपन्यांसाठी संशोधक म्हणूनही त्यांनी भरीव कार्य केले. त्यानंतर ते मायदेशी परतले. भारतात त्यांनी बटनसेल बॅटरींचे उत्पादन केले. त्यांच्या या उत्पादनाचा राष्ट्रीय पातळीवरही गौरव झाला. काही वर्षांनी डॉ. जोशी अमेरिकेत परतले आणि ‘सिरॅमॅटेक’ कंपनीत त्यांनी प्रवेश केला. त्यांच्या संशोधनाच्या जोरावर तब्बल ७५ पेटंट या कंपनीच्या नावावर नोंदली गेली. कंपनीचे पहिले व्यावसायिक उत्पादनही त्यांनीच सुरू केले ते म्हणजे प्राणवायूचे प्रमाण दाखविणारे ‘ऑक्सीजन अ‍ॅनालिझर्स’ आणि ‘सेन्सर्स’. आजही ही उत्पादने जगभर वापरली जातात. डॉ. जोशी या कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी या पदावर आरूढ झाले आणि १९९९ मध्ये या कंपनीवर त्यांचे पूर्ण वर्चस्व स्थापित झाले.