Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्रातील चार रेल्वेमार्गासाठी ममता बॅनर्जी यांना साकडे
पुणे-नाशिक या नव्या मार्गाचीही सूचना
नवी दिल्ली, २६ मे/खास प्रतिनिधी

 

महाराष्ट्रातील चार नव्या रेल्वेमार्गांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने आपल्या वाटय़ाच्या ५० टक्के खर्चाची तरतूद केली असून रेल्वे खात्यानेही आपल्या आगामी अर्थसंकल्पात तशीच तरतूद करावी, अशी मागणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना एका पत्राद्वारे केली.
ममता बॅनर्जी यांनी रेल्वे खात्याचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या मागण्या पोहोचविल्या आहेत. अहमदनगर-परळी वैजनाथ, वर्धा-नांदेड, मनमाड-इंदूर आणि वडसा-गडचिरोली या रेल्वेमार्गांच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे नमूद करताना पुणे-नाशिक या २६५ किमीच्या नव्या मार्गालाही मंजुरी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
एकूण १०१० कोटी रुपयांचा खर्च असलेल्या अहमदनगर-बीड-परळी या २६१.२५ किमी प्रकल्पाच्या ५०५ कोटींच्या वाटय़ापैकी राज्य शासनाने ३८४ कोटींची येत्या तीन वर्षांत तरतूद केली आहे, तर उर्वरित १२१ कोटींचे काम रोहयोतून करण्यात येणार आहे. मनमाड-मालेगाव-धुळे-शिरपूर-मरडाणा-सेंधवा-महू-इंदूर या ३५० किमी अंतराच्या ८२३ कोटींच्या प्रकल्पातील ४१२ कोटींचा वाटा राज्य शासनाला उचलायचा आहे. त्यापैकी ९८ कोटी रोहयोतून तर ३१४ कोटी पाच वर्षांंमध्ये उपलब्ध करण्यात येतील.
वडसा- देसाईगंज- आरमोरी-गडचिरोली या ४९.५ किमीच्या २०० कोटींच्या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये तीन वर्षांत उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. १०४४.२५ कोटी अंदाजे खर्चाच्या पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी ५० टक्के खर्च उचलण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला आल्याचे चव्हाण यांनी बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.