Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

उत्तर कोरियाच्या दुसऱ्या अणुचाचणीनंतर हिरोशिमातील ‘शांती घडय़ाळा’वरील नोंद बदलली
टोकियो, २६ मे/पीटीआय

 

उत्तर कोरियाने दुसरी अणुचाचणी केल्याच्या दुसऱ्या दिवशी आज जपानमधील हिरोशिमा शांती स्मृतिसंग्रहालयाच्या इमारतीतील ‘शांती घडय़ाळावरील नोंद आज बदलण्यात आली. जगात शेवटची अणुचाचणी कधी करण्यात आली त्याची तारीख या घडय़ाळ्यावर नमुद करण्यात येते.
हे ‘शांती घडय़ाळ’ ऑगस्ट २००१ साली बसविण्यात आले. त्यानंतर आजपावेतो १२ वेळा या घडय़ाळ्यावरील शेवटच्या अणुचाचणीबद्दलच्या तारखांच्या नोंदी बदलण्यात आल्या. या घडय़ाळ्यावर १ पासून ९६० पर्यंत आकडे बदलण्याची सोय आहे. अणुचाचण्या करण्यात येऊ नयेत यासाठी प्रयत्नशील असलेल्या एका संघटनेने हे घडय़ाळ हिरोशिमा शांती स्मृतिसंग्रहालयाच्या इमारतीत बसविले आहे. जगामध्ये एकही अणुचाचणी घेण्यात आली नाही असा ९६० दिवसांचा मोठा कालखंड येऊन गेला. त्याला प्रमाण मानून हे घडय़ाळ तयार करण्यात आले. अमेरिकेने हिरोशिमावर ६ ऑगस्ट १९४५ साली अणुबॉम्ब टाकला. त्या घटनेला ५६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हिरोशिमा शांती स्मृतिसंग्रहालयामध्ये उभारलेल्या स्मारकावर हे शांती घडय़ाळ बसविण्यात आले होते. हे स्मारक ३.१ मीटर उंचीचे असून त्यावर हिरोशिमावर अणुबॉम्ब हल्ला झाल्यानंतर आजपावेतो किती दिवस उलटले हे ही दर्शविण्यात येते. मंगळवारी हिरोशिमावरील हल्ल्याच्या घटनेस २३,३०४ दिवस पूर्ण झाल्याचे हे घडय़ाळ दर्शवित होते.