Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

व्यक्तिवेध

भारती एअरटेलने पुन्हा एक वर्षांच्या विश्रांतीनंतर एम.टी.एन. कंपनी ताब्यात घेण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या टेलिकॉम उद्योगातील आघाडीची कंपनी एम.टी.एन. आणि तिचे मुख्य कार्यकारी अधिकारी फुथुमा लेको हे प्रकाशझोतात आले. फुथुमा लेको हे दक्षिण आफ्रिकेतील एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. सुनील मित्तल यांनी ज्याप्रमाणे आपली कंपनी शून्यातून आजच्या आकाराला आणली आहे, तशीच फुथुमा

 

लेको यांनीदेखील एम.टी.एन. ही कंपनी दक्षिण आफ्रिकेत सर्वोच्च शिखरावर नेली. त्यांनी हे सर्व पंधरा वर्षांत शक्य करून दाखविले. त्यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ते एक उत्कृष्ट ‘डीलमेकर’ म्हणून दक्षिण आफ्रिकेत ओळखले जातात. अमेरिकेत सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण केल्यावर फुथुमा लेको मायदेशी - दक्षिण आफ्रिकेत - परतले. २००२ पासून ते एम.टी.एन.चे सी.ई.ओ. आहेत. एम.टी.एन. समूहाची उलाढाल २० अब्ज डॉलरवर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. फुथुमा लेको यांनी मायदेशी परतल्यावर उद्योगांना वित्तसहाय्य करण्याचा व्यवसाय केला. ज्या विषयात शिक्षण घेतले त्या विषयाशी निगडित व्यवसाय त्यांनी कधीच केला नाही. मोबाईलची बाजारपेठ झपाटय़ाने वाढत असल्याचे ओळखून त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकले आणि त्यांचा हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला. केवळ यशस्वीच नव्हे तर त्यांनी जगापुढे या उद्योगातील एक आदर्श घालून दिला आहे. आज जगातल्या सर्वात यशस्वी उद्योजकांत फुथुमा लेको यांचा समावेश होतो. सध्या एम.टी.एन. ही २० अब्ज डॉलर उलाढाल करणारी कंपनी झाली असून तिचे ग्राहक १० कोटीहून जास्त आहेत. आफ्रिका व मध्य-पूर्वेतील २१ देशांत एम.टी.एन. ही कंपनी कार्यरत आहे. आजच्या घडीला एम.टी.एन.चे एकूण मूल्यांकन २३ अब्ज डॉलर आहे. त्यामुळे फुथुमा लेको यांनी गेल्या सात वर्षांत ही कंपनी किती झपाटय़ाने वाढविली त्याचा अंदाज येतो. कोणत्या कंपनीशी सहकार्य करार करावा, याबाबत फुथुमा लेको अत्यंत चोखंदळ असतात. गेल्या वर्षी त्यांनी भारती एअरटेलशी व त्यानंतर रिलायन्सशी चर्चा केल्या होत्या. मात्र या दोघांशी चर्चा फिसकटल्या. असे असूनही त्यांनी पुन्हा एअरटेलशी चर्चा सुरू करून आपले व्यवहारचातुर्य दाखवून दिले आहे. एअरटेलशी एकदा चर्चा विफल झाली तरी त्यांनी पुन्हा चर्चेसाठी दरवाजे उघडे ठेवले होते. फुथुमा लेको यांच्यासह एम.टी.एन.च्या चार संचालकांकडे कंपनीचे २६ टक्के भांडवल आहे. आपल्या या भांडवलाची पुरेपूर किंमत मिळावी, यासाठी फुथुमा लेको यांचा प्रयत्न असेल. फुथुमा लेको यांना दक्षिण आफ्रिकेत ‘टेकओव्हरचे बादशहा’ असेही संबोधले जाते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे १९९१ पासून त्यांनी अनेक कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्या. २००६ साली त्यांनी ‘इन्व्हेस्टकॉम’ ही मोठी कंपनी ताब्यात घेतली. दक्षिण आफ्रिकेतील हे एक मोठे डील म्हणून ओळखले जाते. फुथुमा लेको यांनी कंपनीची कितीही वृध्दी साध्य केली असली तरी मायदेशात मात्र त्यांना टेलिकॉम उद्योगातील दोन क्रमांकाची कंपनी म्हणूनच समाधान मानावे लागले आहे. पहिल्या क्रमांकाच्या कंपनीला त्यांना कधीच मागे टाकता आले नाही. मात्र त्यांनी आपला पसारा आफ्रिकन देशात तसेच मध्य-पर्वेकडच्या देशांमध्ये वाढवून कंपनीला एका नव्या डगरीवर नेले. एम.टी.एन. समूहात दाखल होण्यापूर्वी ते वर्ल्डवाइड आफ्रिका इन्व्हेस्टमेंटचे मुख्य कार्यकारी संचालक होते. आजही त्यांच्याकडे या कंपनीचे बहुसंख्य समभाग आहेत. मृदू बोलणारे व प्रसिध्दीपासून नेहमीच दूर राहाणारे फुथुमा लेको यांनी ‘लो-फ्रोफाइल’ राहून आपले साम्राज्य उभे केले. भारती एअरटेलशी त्यांचा सहकार्य करार झाल्यास हा व्यवहारचतुर उद्योजक भारताच्या जवळ येईल, हे निश्चित.