Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

अमरावती विभागात ५० टक्केच बियाणे उपलब्ध
उत्पादक, विक्रेते व कृषी खात्यात समन्वयाचा अभाव
शेतकऱ्यांची कोंडी
अमरावती, २६ मे / प्रतिनिधी
अमरावती विभागात आतापर्यंत मागणीच्या ५० टक्केच बियाणे उपलब्ध झाले आहे. कृषी खात्याकडून विक्री परवाने मिळण्यास होत असलेला विलंब, ‘पॅकेज’ अंतर्गत वाटपासाठी बियाण्यांची अल्प उपलब्धता, बियाणे व खत टंचाईच्या पाश्र्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामातदेखील गेल्या वर्षीसारखाच गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली असून बियाणे उत्पादक, विक्रेते आणि कृषी खात्यातील समन्वयाअभावी शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

शहरी मतदारांना सांभाळतानाच ग्रामीण भागाशी नाळ
देवेंद्र गावंडे

अफाट लोकसंपर्क आणि संसदीय आयुधांचा उत्तम वापर करीत संपूर्ण राज्यात नाव कमावणाऱ्या आमदार सुधीर मुनगंटीवारांसमोर यंदा मतदार संघाच्या बदलाचे प्रमुख आव्हान आहे. स्वत:च्या कामकाजाला माहितीच्या अधिकार कक्षेत आणणारा हा विरळ लोकप्रतिनिधी यावेळी कशी कामगिरी बजावतो, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.या मतदार संघातून सलग तीनदा निवडून येणारे व प्रत्येक वेळी झालेल्या मतदानापैकी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मते घेणारे मुनगंटीवार यावेळी आरक्षणामुळे लगतच्या बल्लारपूरमधून लढण्याची दाट शक्यता आहे. सध्याच्या चंद्रपूर व सावलीमधील प्रत्येकी अर्धा भाग मिळून हा मतदार संघ तयार झाला आहे.

तरुणाईची नवी स्पंदने-नवे वारे
‘मन सरगम छेडा रे’

डॉ. सुलभा पंडित

गेल्या काही वर्षांपासून सुगम संगीताकडचा रसिकांचा ओढा आणि आवड अधिकच वाढली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भावगीत आणि चित्रपटगीतांचे कार्यक्रम बारा महिने भरपूर उपस्थितीत सुरू असतात. किंबहुना ‘भावगीत’ ही मराठी संगीताची एक आगळी वेगळी ओळख ठरत आहे. चित्रपटगीते सुद्धा- भावगीतेच असतात, असे एक प्रकारे म्हणता येईल. शास्त्रीय संगीतातले आम्हाला फारसे काही कळत नाही; परंतु सुगम-संगीत ऐकायला आवडते, असे प्रांजळपणे सांगणारे असंख्य संगीतप्रेमी आपल्याला नेहमीच भेटतात. त्यामुळे ‘भावसरगम’, ‘शुक्रतारा’ ही कार्यक्रमाची शीर्षकेसुद्धा लोकप्रिय झालेली आपण पहातो.

वेतनवाढीतील तफावतीमुळे कोळसा कामगारांमध्ये असंतोष
चंद्रपूर, २६ मे / प्रतिनिधी
कोळसा खाण कामगार व अधिकाऱ्यांच्या वेतन वाढीसाठी नेमण्यात आलेल्या दोन स्वतंत्र वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीत मोठा दुजाभाव करण्यात आल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष असून येत्या काळात या मुद्यावरून कामगार व अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

अचलपूर पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाची व्यापाऱ्यांकडून मोडतोड
कक्षात कचरा टाकला
अमरावती, २६ मे / प्रतिनिधी
अचलपूर येथील पालिकेच्या व्यापारी संकुलात जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग आणि तेथील दूरवस्थेबद्दल पाच दिवसापूर्वी निवेदनाद्वारे इशारा देऊनही पालिकेने काहीच हालचाली न केल्याने संतापलेल्या व्यापाऱ्यांनी आज दुपारी अचलपूर पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाची मोडतोड करून सोबत आणलेला कचरा कक्षात नेऊन टाकल्याने चांगलाच गोंधळ उडाला.

शालवाले बाबा नव्या अवतारात अकोल्यात दर सोमवारी भरतो दरबार
अकोला, २६ मे/ प्रतिनिधी
अमरावतीत पर्दाफाश झाल्यानंतर गणेशभाई नावाने शालवाले बाबांनी अकोल्यातील एमआयडीसी परिसरात दर सोमवारी दरबार भरवायला सुरुवात केली आहे. रुग्णांच्या अंगावर शाल फिरवून त्यांना बरे करण्याचा दावा गणेशभाई करीत असून या अंधश्रध्देला बळी पडणाऱ्यांची रीघ वाढतच चालली आहे.

कैकाडी व वडारांच्या पुनर्वसनाची मागणी
भंडारा, २६ मे / वार्ताहर

भंडारा जिल्ह्य़ात वास्तव्य करणाऱ्या कैकाडी व वडार समाजातील कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. भंडारा जिल्ह्य़ात वेगवेगळ्या ठिकाणी भटक्या व विमुक्त समाजातील कैकाडी व वडार समाजाचे कुटुंब राहतात त्यांना अद्याप कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी पाणी मिळालेले नाही. या समाजातील महिला व पुरुष दगडापासून पाटे तयार करणे, केसांच्या मोबदल्यात फुगे विकण्याचे काम करतात अत्यंत कमी उत्पन्न मिळत असल्याने मुले शिकत नाही. या कुटुंबाचा दारिद्रय़ रेषेखालील यादीत समावेश करण्यात यावा, त्यांना मतदार ओळखपत्र, आरोग्य शिक्षण आणि वीजपुरवठा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी भीमशक्तीचे देवीलाल नेपाळे, अ‍ॅड. बंडू बिडकर, महेश बागडे, आहुजा डोंगरे, अचल मेश्राम, यशवंत नंदेश्वर यांनी केली आहे. जिल्हा प्रशासनाने कैकाडी व वडार समाजाच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

‘त्या’ मानवी सांगाडय़ाची ओळख पटली
अंजनगावसुर्जी, २६ मे / वार्ताहर

तालुक्यातील कोकर्डा येथे शनिवारी सापडलेल्या मानवी सांगाडय़ाची ओळख पटली असून तो सांगाडा भाऊराव सुखदेवराव सावरकर (५२) यांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. खल्लार पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कोकर्डाच्या पडीत जागेत वाढलेल्या बंगाली बाभळीच्या जंगलात निर्जनस्थळी श्वापदांनी खाऊन सांगाडा केलेला मृतदेह असल्याचे जळावू लाकडे गोळा करण्यास गेलेल्या लोकांनी सांगितले. पोलीस पाटलाच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळावरून इंडोसल्फान हे कीटकनाशक डबा, विडी काडी पेटी व मृतदेहाबाजूचे कापडाचे तुकडे गोळा करून पोलीस ठाण्यात आणले. कोणी बेपत्ता असल्याबाबत कोणतीही तक्रार कोकर्डा पोलीस चौकीत नसल्यामुळे सांगाडय़ाचे गूढ उलगेना. सधन शेतकरी कुटुंबातील भाऊराव पाटील ५ मे पासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. भाऊराव पाटलांच्या पत्नी शोभा सावरकर यांना घटनास्थळी मिळालेल्या वस्तू दाखविल्या असता त्यांना ओळख पटली. दोन मुली, तीन मुले असलेल्या भाऊराव पाटील यांच्या एका मुलाने काही दिवसापूर्वी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

गोसे धरणाच्या पाण्यामुळे पवनीकरांचे आरोग्य धोक्यात
भंडारा, २६ मे / वार्ताहर

पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे आता पवनी तालुक्यातील अनेक ठिकाणी गोसेखुर्द धरणात साठवलेल्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे परंतु, या शेवाळयुक्त, दरुगधीयुक्त पाण्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी नाग, कन्हान, वैनगंगेचे आलेले पाणी साठवण्यात आले. अर्थात साचलेल्या पाण्यावर शेवाळ आले आणि दरुगधीही येऊ लागली. हे पाणी शुद्ध करून नागरिकांना पुरवणे अत्यावश्यक असताना ही बाब दुर्लक्षित केली गेली आहे. नाग नदीचे पाणी शुद्ध करण्याची व्यवस्था तसेच जलशुद्धीकरणाची इतरत्र व्यवस्था करणे निकडीचे आहे. याबाबत आमदार बंडू सावरबांधे यांनी महिन्यापूर्वी आयुक्तांना तसेच जिल्हाधिकाऱ्य़ांना कळवले आहे. अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

विवाहितेची हत्या, सासू, सासऱ्यासह तिघांना अटक
भद्रावती, २६ मे / वार्ताहर

येथील पंचशील वॉर्डातील कान्होपात्रा रामकृष्ण नागलकर हिच्या हत्याप्रकरणी सासू, सासरा व दीर या तिघांना भद्रावती पोलिसांनी अटक केली. भद्रावती पोलिसात मृत विवाहितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून सासरा दत्तात्रय नागलकर (६३), शोभा दत्तात्रय नागलकर, राजेश दत्तात्रय नागलकर यांना अटक केली. २१ मे रोजी कान्होपात्राचा मृतदेह घरीच संशयास्पद स्थितीत आढळून आला. कान्होपात्रा नातेवाईकांनी पैशासाठी तिचा सासरकडील मंडळी नेहमीच शारीरिक व मानसिक छळ करत असल्याची तक्रारही दाखल केली होती. पोलिसांनी आकस्मिक गुन्हा दाखल करून शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. उत्तरीय तपासणीच्या अहवालात गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोटवार यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक दुधे, नामदेव काळे, विजय भोंगळे करीत आहेत.

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ ग्रहण
यवतमाळ, २६ मे / वार्ताहर

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस पाळण्यात आला. यानिमित्त स्थानिक बचत भवनात अपर जिल्हाधिकारी अनिल बनसोड यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञेचे वाचन केले. यावेळी उपस्थितांनी शपथ ग्रहण केली. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी राजेश खवले, राजेंद्र खंदारे यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आयआयटीच्या परीक्षेत अकोल्याचे आठ विद्यार्थी उत्तीर्ण
अकोला, २६ मे/ प्रतिनिधी

आयआयटीच्या परीक्षेत अकोल्यातील आठ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. नीलेश भाला, आदित्य खंडेलवाल, वृषाली मनका, आदित्य मोहोड, कांचन शर्मा , पीयूष देशपांडे, देवेंद्र डिडवानीया, पूनम जाजू या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्रा नितीन ओक यांच्या सेफ हँडसमधून यातील सहा विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घेतले आहे. सोमवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. अत्यंत कठीण अशा या परीक्षेची तयारीही खडतर असते. देशभरातील ३० लाख विद्यार्थ्यांमधून आठ हजार विद्यार्थी या परीक्षेतून निवडले जातात. दरवर्षी दोन ते तीन विद्यार्थी अकोल्यातून उत्तीर्ण होतात; परंतु आठ विद्यार्थी अकोल्यातून उत्तीर्ण होण्याची ही पहिलीच वेळ असून ती अकोल्यासाठी भूषणावह आहे.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ३० टक्के मोफत शिक्षण देण्याची मागणी
बुलढाणा, २६ मे / प्रतिनिधी

खासगी विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्या शाळेमध्ये निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मोफत देण्यात याव्यात, अशी मागणी सहकार आघाडी व अ.भा. श्रीपंचकृष्ण अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष राजेश ताठे यांनी केली आहे. उपरोक्त मागणीची पूर्तता येत्या शैक्षणिक वर्षांपासून न केल्यास सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्य़ातील तालुकास्तरावर व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र निदर्शने व त्यानंतर ताला ठोको करण्यात येईल, असा इशारा एका पत्रकाद्वारे त्यांनी दिला आहे.

आकोट पालिकेची सभा गणपूर्ती अभावी बारगळली
आकोट, २६ मे / वार्ताहर
आकोट शहरासाठी मंजूर झालेल्या १९.५७ कोटी योजनेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेची १० टक्के लोकवर्गणी भरण्यासाठी बोलावण्यात आलेली नगरपालिकेची विशेष सभा गणपूर्ती अभावी बारगळली. १५ जूनला आकोट नगरपालिका अध्यक्षाची निवडणूक होत आहे. त्यामुळे काही नगरसेवक सहलीवर गेले आहेत, तर काही नगरसेवक सभेला गैरहजर होते. सभेला नगराध्यक्षा नीता अग्रवाल, उपाध्यक्ष अफजल खाँ, संजय आठवले, शैलजा चौखडे, संजय गवारगुस, वर्षां अंबळकार, उषा हाडोळे, मुनेद बेग, महंमद आरीफ, सलीम परवेज, सुनीता चंडालीया, योगिता चंडालीया, विजया बोचे, वहिदा परवीन हजर होत्या.

अस्मिता नानोटी यांना आचार्य पदवी
भंडारा, २६ मे / वार्ताहर

अडय़ाळ येथील अशोक मोहरकर महाविद्यालयातील प्राध्यापिका अस्मिता नानोटी (पांडे) यांना शास्त्रीय संगीत विषयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली आहे. महाराष्ट्रातील स्त्री गायन परंपरा हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. डॉ. अरुण बांगरे मार्गदर्शक होते. भंडारा जिल्ह्य़ात विशेष सोय नसतानाही त्यांनी मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे.

किशोर पारटकर यांना अं.नि.स.चा ‘शतकवीर’ पुरस्कार प्रदान
यवतमाळ, २६ मे / वार्ताहर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे येथील जिल्हा सहसचिव किशोर पारटकर यांना ‘शतकवीर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे येथे एका विशेष समारंभात पुणे विद्यापीठाचे कुलगुरू व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव व ज्येष्ठ चित्रपट अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकाच्या प्रचार आणि प्रसारासाठी हा पुरस्कार दिल्या जातो. किशोर पारटकर हे अंनिसचे क्रियाशील कार्यकर्ते आहेत. सामाजिक कार्याशी त्यांचा संबंध असून व्यवसायाने ते शिक्षक आहेत. विशेष म्हणजे या कार्यासाठी त्यांना यवतमाळ जिल्ह्य़ातून दुसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले आहे. किशोर पारटकर यांना ‘शतकवीर पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोरंभी मार्गावर वाघोबाचे दर्शन
भंडारा, २६ मे / वार्ताहर
पवनी परिसरातील कोरंभी, सावरला, खापरी, कन्हाळगाव या वनपरिक्षेत्रातील तलाव पूर्णपणे कोरडे पडले असल्यामुळे तहान भागविण्यासाठी वन्यप्राणी गावाकडे येऊ लागले आहेत.
पवनी ते कोरंभी मार्गावर रात्री ७.०० ते ९.०० च्या दरम्यान वाघाचे दर्शन नित्याचे होते. प्राण्यांना नदीच्या पात्रात असलेल्या टरबुजांच्या वाडय़ामुळे ही पाण्यापर्यंत पोहचता येत नाही. त्यामुळे सरळ गावात त्यांचा शिरकाव होतो. त्यामुळे गावातील पाळीव प्राण्यांसोबत नागरिकांचाही जीव धोक्यात आला आहे. अनेकदा शेतामधील गोठय़ामध्येही वन्यप्राणी लपलेले आढळतात.

‘गिमाटेक्स’ क्लबच्या सरचिटणीसपदी गिरधर
हिंगणघाट, २६ मे / वार्ताहर

गिमाटेक्स स्टाफ क्लबच्या सरचिटणीसपदी विवेक गिरधर यांची नियुक्ती करण्यात आली. गिमाटेक्स इंडस्ट्रीजच्या स्टाफ क्लबच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी गिमाटेक्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत मोहता, उपाध्यक्ष ए.के. बारीक व रमेश गांधी उपस्थित होते. यावेळी स्टाफ क्लबचे सरचिटणीस म्हणून अभियांत्रिकी व्यवस्थापक विवेक गिरधर यांची निवड करण्यात आली. इतर पदाधिकाऱ्यात अनंत सरोदे, नवल किशोर डागा, अरुण पंडित, गिरीश नागुलवार, विजय कोचर, राजू चोरे यांचा समावेश आहे.

अश्लील सीडी जप्त
चंद्रपूर, २६ मे / प्रतिनिधी

येथील बंगाली कॅम्प परिसरातील आर.के. म्युझिक सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी साठ अश्लील सीडी जप्त केल्या. रवींद्र गौरंग डे संचालक असलेल्या आर.के. म्युझिक सेंटरमधून अश्लील सीडीची सर्रास विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाईल ‘शॉपीवर’ छापा; ३७ हजाराचे साहित्य जप्त
रिसोड, २६ मे / वार्ताहर

शहरातील दोन मोबाईल शॉपीवर छापा टाकून सुमारे ३७ हजाराचे कॉम्प्युटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सागर मोबाइल गॅलरी व अरिहंत मोबाईल दुकानामध्ये संगणकाद्वारे मोबाईल मेमरी कार्डमध्ये कंपनीकडे हक्क असलेले गाणे व अश्लील गाणे, दृश्य ग्राहकांना ‘डाऊन लोड’ करून देत असल्याच्या माहितीवरून आलेल्या पथकाने दोन्ही मोबाईल दुकानांची तपासणी केली असता त्यांना संगणकामध्ये अश्लील गाणे व दृश्य डाऊन लोड केलेली आढळल्याने दुकानातील संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
खामगाल, २६ मे / वार्ताहर

शहर व शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील १२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या अधीक्षक हिंमतराव देशभ्रतार यांच्या आदेशान्वये करण्यात आल्या. एकाच विभागात १० ते १२ वर्षे झालेल्या तसेच कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बोदेगाव परिसराला वादळाचा तडाखा
दारव्हा, २६ मे / वार्ताहर

दारव्हा आणि आजूबाजूच्या परिसरात मागील चार-पाच दिवसांपासून वादळी वारा त्यात हलक्या पावसाच्या सरी सुरू आहेत. बोदेगाव परिसरात जोरदार पावसासह वादळी वाऱ्यामुळे काही घरांची पडझड झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे घरांची छपरे, टिनपत्रे उडून गेली , काही घरे कोसळल्यामुळे नुकसान झाले. पाऊस जोरदार झाल्यामुळे जमिनीची पेरणीपूर्व मशागत करणे सोपे झाल्यामुळे बोदेगाव परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्यामुळे शेतकऱ्यात समाधान पसरले.

हिंगणघाट येथे आरोग्य तपासणी शिबीर
हिंगणघाट, २६ मे / वार्ताहर

आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक रवीशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक शास्त्री वॉर्ड येथे आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीर नुकतेच झाले. मातोश्री कॉन्व्हेंट येथे झालेल्या या शिबिरात डॉ. गंगाधर नाखले, डॉ. राहुल देशपांडे व डॉ. विजय चूघ यांनी रुग्णांची तपासणी करून नि:शुल्क औषधाचे वितरण केले. या शिबिरात विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संध्या उघडे, हेमंत कुळकर्णी, दिनेश अटेल, अमोल भोयर, नितीन झाडे, उज्ज्वला भोटे व पूजा मुलकुलकर यांनी परिश्रम घेतले.

व्यापाऱ्याची आत्महत्या
यवतमाळ, २६ मे/ वार्ताहर

येथील व्यापारी परेश भगवानदास सोमय्या (३४) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. इंद्रप्रस्थ व्यापार संकुलातील दुकानतच सोमय्या यांनी सोमवारी सायंकाळी आत्महत्या केली. दाढेच्या कर्करोगाने ते आजारी होते. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मोठा आप्त परिवार आहे.

मोफत शिक्षण-प्रशिक्षण योजना
बुलढाणा, २६ मे / प्रतिनिधी

श्री सुवर्ण गणेश शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेमार्फत केंद्र शासनाच्या विविध योजनांद्वारे मागासवर्गीय एस्सी, ओबीसी, व्हीजे, व्हीजेएनटी संवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी मोफत शिक्षण व प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थिनींची नावनोंदणी सुवर्ण चित्रकला महाविद्यालयात २५ ते ५ जून दरम्यान करण्यात येणार आहे. नाव नोंदणीकरिता उमेदवार कमीतकमी दहावी उत्तीर्ण तसेच पदवीधर असावा. सोबत शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, जातीचा दाखला आदी कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती तसेच एक पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, दहा रुपये नोंदणी शुल्क आणावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डी.डी. विसपुते यांनी केले आहे.