Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

विशेष लेख

मध्यमवर्ग उदासीन का?

मध्यमवर्ग हा समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे. समाज संतुलित राहण्यात मध्यमवर्गाचे योगदान महत्त्वाचे आहे. संस्कृती आणि परंपरांचे रक्षण करण्याची जबाबदारी नेहमी याच वर्गाकडे असते. मांगल्याची निर्मिती आणि परिवर्तनाची भाषा याच घटकाने करावी अशी समाजाची अपेक्षा असते. असा हा मध्यमवर्ग बघ्याची भूमिका का घेतो? हस्तिदंती मनोऱ्यात का राहणे पसंत करतो?

 


जागतिकीकरणापूर्वीचा मध्यमवर्ग आणि आजचा मध्यमवर्ग यात खूप फरक पडलेला आहे. पूर्वीचा मध्यमवर्ग हा चळवळ्या होता. स्वत:च्या हक्कासाठी, अधिकारासाठी भांडणारा होता. वागणुकीतले-विचारांचे पावित्र्य, सामाजिक बांधिलकी या मूल्यांची जपणूक करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे अशा भूमिकेतून वागणारा होता. मूल्यांचे अध:पतन या वर्गातल्या माणसांना अस्वस्थ करीत असे. मतदानप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी हा वर्ग उत्सुक असायचा. समाजव्यापी मुद्दय़ांमध्ये विशिष्ट भूमिका घेऊन हा वर्ग सचोटीच्या मार्गाने लढत असायचा. झुंडशाही आणि पैशाच्या श्रीमंतीने मस्तवाल झालेल्या लोकांचे लाड या वर्गाने कधीही खपवून घेतले नाहीत. सतत जागरूक असणारा संवेदनशील वर्ग म्हणून या वर्गाकडे पाहिले जात होते. नंतर काय घडले?
आपण जागतिकीकरण सहजतेने स्वीकारले. ते स्वीकारण्यापूर्वी समाजाची जी वैचारिक, मानसिक तयारी करण्याची गरज होती ती मात्र लक्षात घेतली नाही. पाण्यात पडले की पोहता येईल असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष केले. पण या सर्व प्रकारात समाजाच्या अंगभूत शक्ती क्षीण होत गेल्या. सगळीकडे संपन्नतेचा भास होऊ लागला. कर्जाच्या रूपाने आलेली लक्ष्मी मध्यमवर्गीयांना खुणावू लागली. थोडे कर्ज हवे असले तरी सरकारी नोकरी करणारे दोन जामीनदार आणा मगच कर्ज मिळेल असे बजावणाऱ्या बँका, ‘कर्ज घ्या, कर्ज घ्या’ म्हणून आपल्या माणसांना घरी पाठवू लागल्या. खिशात अनेक बँकांची क्रेडिट कार्डे घेऊन फिरणे हा स्टेटसचा विषय होऊ लागला. जिथे साधी स्कूटर अथवा गॅसचे सिलिंडर मिळविण्यासाठी नंबर लावून वर्षांनुवर्षे तिष्ठत राहावे लागत होते तिथे आता फोन करताच हव्या त्या कंपनीच्या नव्या करकरीत गाडय़ा घरी पोहोचविल्या जातात. आपापल्या चौकटीत राहून बंदिस्तपणे वागणारी माणसे आणि त्यांच्या संस्था ‘प्रोफेशनल’ बनू लागल्या. नोकरीत मानेवरच्या टांगत्या तलवारी वाढल्या तसे पगाराचे आकडेही फुगले. बावीस- पंचवीस वर्षांची तरुण पोरे पाच आकडी पगार घेऊ लागली. शंभर रुपयांचे पुस्तक विकत घेताना दहादा विचार करणारा माणूस मल्टिप्लेक्समध्ये माणशी दोनशे रुपये खर्च करून सिनेमा पाहू लागला. विद्वत्ता, सद्वर्तन, चारित्र्यसंपन्नता म्हणजे प्रतिष्ठा ही संकल्पना अस्तंगत होऊ लागली. प्रतिष्ठेच्या नव्या संकल्पना उदयाला आल्या. उंची कपडे, महागडे दागिने, हातातल्या मोबाइलची कंपनी, वापरत असलेली गाडी यावरून माणसाची प्रतिष्ठा ठरू लागली. चार पैसे फेकले की हवे ते मिळवता येते ही मानसिकता अधिक प्रबळ झाली. गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या, पण माणसांची जमिनीशी असणारी नाळ तुटू लागली. संवादाची माध्यमे वाढली, पण माणसा-माणसातला संवाद कमी झाला. हातातला रिमोट सुरू केला की जगात काय चालले आहे हे समजू लागले, पण शेजारच्या घरात काय चालले आहे हे समजेनासे झाले. एरवी मोकळेपणाने जगणारा मध्यमवर्ग हस्तिदंती मनोऱ्यात राहू लागला. ‘मी आणि माझे’ असा स्वार्थी विचार करू लागला. आपण जे लिहितो, वाचतो, बोलतो, करतो त्याची दखल घेतलीच जाणार नसेल तर अभिव्यक्त होऊन तरी उपयोग काय, अशी नकारात्मक मानसिकता तयार झाली. या सर्वातून राज्यकर्त्यांचे फावले. आंदोलने करणारा, चळवळी उभ्या करणारा, स्वत:च्या हक्कासाठी भांडणारा, प्रसंगी रस्त्यावर उतरणारा मध्यमवर्ग स्वत:च्या भावविश्वात मश्गूल राहू लागला. आम्हाला जाब विचारणारे कोणीही नाही अशी राज्यकर्त्यांची भावना झाली. सामान्य माणसांची मतदानाविषयीची अनास्था वाढली. मतदानाच्या जाहीर झालेल्या तारखा, त्याला जोडून आलेल्या सुट्टय़ा यांचा मेळ घालून पिकनिकसाठी बाहेर पडण्यात या वर्गाला धन्यता वाटू लागली. ‘अरे बाबा, सगळे पक्ष सारखेच! कुणीही आला तरी आपल्या जीवनात काहीही फरक पडणार नाही आणि आम्ही चार लोकांनी मतदान केले नाही तर असे काय आकाश कोसळणार आहे?’ असे संवाद झडायला लागले. ही मानसिकता निर्माण व्हायला इथली व्यवस्थाही तितकीच कारणीभूत आहे.
स्वातंत्र्यानंतर भारतीय समाजाच्या राज्यकर्त्यांकडून खूप मोठय़ा अपेक्षा होत्या, पण त्यांचा भ्रमनिरास झाला. सत्तेशिवाय पत, पैशाशिवाय मान आणि शिफारशीखेरीज नोकरी मिळूच शकणार नाही असे वातावरण तयार झाले. पैशाची लाच दिल्याशिवाय कामच होत नाही हे इथल्या लालफितीने सिद्ध करून दाखविले. कायद्याने शासन होईलच याची शाश्वती राहिली नाही, त्यामुळे गुन्हेगारांचे फावले. सामान्य माणसांचा विजय हा बातमीचा विषय होऊ लागला. शैक्षणिक संस्थांमधला सेवाभाव संपून देणगी वसूल करण्याचे कुरण म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ लागले. शिक्षण देताना डोक्याबरोबर पोटाचा विचार न झाल्यामुळे बेकारांची संख्या वाढली. आयटीतल्या लोकांना लाखो रुपयांचे पगार मिळत असताना बीए, बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांना चपराशाची नोकरी मिळणे मुश्किल होऊन बसले.
लोकांना शासनाकडून सोन्या-चांदीची अपेक्षा कधीच नव्हती. चांगले रस्ते, शुद्ध पाणी, वीज, जगायला निर्भय वातावरण हवे होते, पण स्वातंत्र्यानंतरच्या काळात इच्छाशक्तीच्या अभावामुळे या साध्या गोष्टींची देखील पूर्तता होऊ शकली नाही. या पाश्र्वभूमीवर मध्यमवर्गीयांच्या मन:स्थितीचा विचार होणे आवश्यक आहे.
माणूस हा प्रथम माणूस म्हणून उभा राहणे व टिकणे आवश्यक आहे. अस्तित्वाची लढाई करण्यातच त्याचा बराचसा वेळ जात असेल तर नवनिर्माण, सर्जनशीलता, सद्सद्विवेक यांचा विचार करण्यासाठी त्याची मानसिक तयारी कधी होणार? स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांच्या काळात आपण निकोप सामाजिक वातावरण तयार करू शकलो नाही; त्यामुळे आलेल्या नैराश्यातून एक अलिप्ततेची भावना मध्यमवर्गात प्रबळ झाली.
आजची सामाजिक परिस्थिती मन विषण्ण करणारी आहे. एकीकडे भौतिक संपन्नतेचा भास निर्माण केला जात असला तरी दुसरीकडे वैचारिक दारिद्रय़ किळसवाणे आहे. समाजातला जो उच्चभ्रू वर्ग आहे, त्याचा स्वतंत्र असा वेगळा कोश आहे. स्वत:च्या स्टेटसच्या कल्पना सांभाळण्यातच त्यांना अधिक रस आहे. हायफाय सोसायटीच्या नावाखाली त्यांच्या दुष्कृत्यांना प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. समाजाचा आर्थिकदृष्टय़ा जो खालचा स्तर आहे त्यांची लढाई जगण्याशी आहे. जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष इतका तीव्र आहे की, त्याला कशातच स्वारस्य नाही. अशा परिस्थितीत समाजजीवनाचा गाडा सुव्यवस्थितपणे पुढे नेण्याची जबाबदारी येते ती मध्यमवर्गाकडे. म्हणूनच या वर्गाचे हस्तिदंती मनोऱ्यात राहणे समाजाला परवडणारे नाही.
आज संपूर्ण समाज दुभंगलेल्या मनोवस्थेतून जात आहे. जिकडे पाहावे तिकडे विरोधाभास नजरेला पडतो. एकीकडे ‘मातृदेवोऽ भव, पितृदेवो ऽभव’ ही आमची संस्कृती आहे, असे आम्ही सांगतो आहोत तर दुसरीकडे मुलांनी आई-वडिलांना सांभाळावे म्हणून आम्हाला कायदे करावे लागत आहेत. एकीकडे भारत हा कृषिप्रधान देश आहे असे आम्ही म्हणतो तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राष्ट्र संरक्षणसज्ज आहे असा डंका एकीकडे पिटला जातो तर दुसरीकडे दहशतवादाने देशाला हैराण केलेले आहे.
धर्मनिरपेक्षतेचा आव आणणारे राजकीय पक्ष जातीच्या चौकटी अधिक मजबूत करताना दिसतात. मराठीचा कैवार घेऊन एकीकडे सातासमुद्रापार असणारी मराठी माणसे विश्व साहित्य संमेलन भरवीत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात बोर्डाच्या परीक्षेत मराठीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. महासत्तेची स्वप्ने पाहत असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नरेंद्र दाभोलकरांना जादूटोणाविरोधी विधेयक संमत व्हावे यासाठी रक्ताने पत्र लिहावे लागत आहे. डॉ. विजय भटकरांचे काम जितके वाढलेले आहे तितकेच दाभोलकरांचेही वाढलेले आहे. संतांच्या विचारांचा पराभव करायला निघालेले त्यांचे अनुयायी आणि भक्त जागोजाग दिसतात. पुरोगामित्वाचा आव आणणाऱ्या महाराष्ट्रात जातीच्या आधारावर आपल्या संघटना कशा बळकट होतील याला प्राधान्य देण्यात धन्यता मानणाऱ्या राजकीय नेत्यांची संख्याही लक्षणीय आहे.

या साऱ्या विचित्र परिस्थितीमुळे मध्यमवर्गात एक नवा ‘अलिप्ततावाद’ उदयाला येत आहे. समाज म्हणजे माणसांची साखळी अशी संकल्पना अभिप्रेत असताना केवळ माणसांची गर्दी असे चित्र का दिसते? याची कारणे मानसशास्त्रात सापडणार नाहीत. सापडलीच तर ती समाजव्यवहारात सापडतील. ‘व्यक्तिमत्त्व’ नावाचे मूल्य अधिक उन्नत करणे, समृद्ध करणे हाच त्याच्यावरचा उपाय आहे. ‘समाज हे गुणवत्तेचे उद्यान असते’ या विचाराला त्यातूनच बळकटी मिळू शकेल.
प्रा. मिलिंद जोशी
joshi.milind23@gmail.com