Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

विविध

युक्रेनच्या घातक आयातीची ‘धातू’परीक्षा..
नवी दिल्ली, २६ मे/प्रतिनिधी

भारताच्या आण्विक क्षमतेमुळे जगातील धातूउद्योगाला तसेच धातुमिश्रित खनिज शुद्धीकरण उद्योगाला अनेक नव्या संधी लाभत आहेत. जगावर आर्थिक मंदीचे सावट असले तरी भारतातील बांधकाम उद्योग मात्र तेजीत आहे. या बांधकाम उद्योगाकडेही जगभरातील धातूकंपन्यांचे लक्ष आहे. भारताच्या अणुप्रकल्पांपासून ते या बांधकाम उद्योगापर्यंत लागणाऱ्या विविध धातूउत्पादनांच्या व्यापारात आपला सर्वाधिक वाटा असावा यासाठी युक्रेन सध्या हिरिरीने प्रयत्न करीत आहे. युक्रेनच्या या धडपडीमागील काळ्या बाजूकडे लक्ष वेधण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी आता कंबर कसली आहे.

डॉ. अशोक जोशी यांना प्रतिष्ठेचा ‘आयआरआय’ पुरस्कार
बोस्टन, २६ मे/वृत्तसंस्था

औद्योगिक संशोधन व विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘इंडस्ट्रीयल रीसर्च इन्स्टिटय़ूट’ (आयआरआय)ने ‘सिरॅमॅटेक’ कंपनीचे अध्यक्ष डॉ. अशोक जोशी यांचा नुकताच बोस्टन येथे २००९ सालच्या ‘आयआरआय अचिव्हमेन्ट’ पुरस्काराने समारंभपूर्वक गौरव केला. व्यक्तिगत पातळीवरील ज्या सर्जनशील प्रयत्नांमुळे वा शोधामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळते व समाजाचा लाभ होतो अशा प्रयत्नांना दाद देण्यासाठी १९७३ पासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

महाराष्ट्रातील चार रेल्वेमार्गासाठी ममता बॅनर्जी यांना साकडे
पुणे-नाशिक या नव्या मार्गाचीही सूचना
नवी दिल्ली, २६ मे/खास प्रतिनिधी
महाराष्ट्रातील चार नव्या रेल्वेमार्गांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने आपल्या वाटय़ाच्या ५० टक्के खर्चाची तरतूद केली असून रेल्वे खात्यानेही आपल्या आगामी अर्थसंकल्पात तशीच तरतूद करावी, अशी मागणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना एका पत्राद्वारे केली.

उत्तर कोरियाच्या दुसऱ्या अणुचाचणीनंतर हिरोशिमातील ‘शांती घडय़ाळा’वरील नोंद बदलली
टोकियो, २६ मे/पीटीआय
उत्तर कोरियाने दुसरी अणुचाचणी केल्याच्या दुसऱ्या दिवशी आज जपानमधील हिरोशिमा शांती स्मृतिसंग्रहालयाच्या इमारतीतील ‘शांती घडय़ाळावरील नोंद आज बदलण्यात आली. जगात शेवटची अणुचाचणी कधी करण्यात आली त्याची तारीख या घडय़ाळ्यावर नमुद करण्यात येते.

दोन वर्षांत बहुउद्देशीय नागरी ओळखपत्र
नवी दिल्ली, २६ मे / पी. टी. आय.
जनतेत मिसळून घातपात करणाऱ्या दहशतवाद्यांवर वचक बसविण्याचा एक भाग म्हणून देशातील सर्व नागरिकांना २०११ पर्यंत बहुउद्देशीय ओळखपत्र देण्याची योजना असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज येथे दिली.ते म्हणाले, सुयोग्य पद्धतीने लोकसंख्या शिरगणती आणि नोंदणी होणार आहे. आपल्या खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर पत्रकारांना या मोहिमेची माहिती देताना चिदम्बरम म्हणाले, की नागरिकांना सर्वसमावेशक ओळखपत्र देताना त्यांना राष्ट्रीय शिरगणतीनुसार नंबरही देण्यात येईल. तो विविध कारणांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती आणि तांत्रिक, तसेच कार्यपद्धतीतील अडीअडचणी लक्षात घेऊन सुरुवातीला १२ राज्यांत ३०.०५ लाख लोकवस्तीच्या प्रदेशांत प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात येत आहे. अंदमान-निकोबार बेटे व किनारी जिल्ह्यांमध्ये याचे काम सुरू झाले आहे. हे ओळखपत्र म्हणजे ‘स्मार्टकार्ड’च असून त्यात ‘मायक्रोप्रोसेसर चीप’ असणार आहे. नॅशनल इन्फरेमेटिक सेंटर, आय. आय. टी. (कानपूर) भेल, इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लि. भारतीय गुप्तचर विभाग, अशा अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या प्रतिनिधींच्या सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींनुसार कार्डाची निर्मिती केली जाणार आहे.

अर्थसंकल्प जुलैच्या पहिल्या आठवडय़ात
नवी दिल्ली, २६ मे/खास प्रतिनिधी
केंद्रातील मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या इनिंगची खरी सुरुवात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे. नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प जुलैच्या पहिल्या आठवडय़ात मांडण्यात येईल, असे आज अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अर्थसंकल्प जुलैच्या पहिल्या आठवडय़ात सादर करून जुलैअखेरपर्यंत तो संमत करण्यात येईल. ३१ जुलैपर्यंत लेखानुदान प्रस्तावाद्वारे केलेली आर्थिक तरतूद संपणार आहे. लेखानुदान प्रस्ताव दुसऱ्यांदा मांडण्याची वेळ येऊ नये, असे आपण आपल्या अधिकाऱ्यांना बजावले असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले. देशाच्या अर्थसंकल्पात वित्तीय शिस्तीशी कोणतीही तडजोड न करता आर्थिक विकासाला चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. २००८-०९ सालात आर्थिक विकासाचा दर ७ टक्क्यांच्या आसपास असेल, असा अंदाज त्यांनी वर्तविला.

शरीफ बंधूंना निवडणूक लढविण्याची परवानगी
इस्लामाबाद, २६ मे / पी. टी. आय.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे धाकटे बंधू पंजाबचे माजी मुख्यमंत्री शाहाबाझ यांना निवडणूक लढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने पात्र ठरविले आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवून राजकारणापासून परावृत्त करण्यात आले होते. न्या. तासदक हुसेन गिलानी यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे शरीफ बंधूंची याचिका पुनर्विचारार्थ सुनावणीसाठी आली असता त्यांनी लाहोर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा मागचा निर्णय रद्दबातल ठरवून नवाज व शाहाबाझ यांना निवडणुकीस पात्र ठरविले.मागच्या हुकूमशहांनी न्यायसंस्था ओलीस ठेवली होती, पण मी पाकिस्तानी जनतेला सॅल्यूट ठोकतो कारण या जनतेने आंदोलने करून न्यायसंस्था मुक्त, निर्भय केली आहे. जनतेचा लोकशाहीसाठीचा हा कौल आहे, असे नवाज शरीफ यांनी न्यायालयाच्या या निर्णयानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

‘प्रसारभारती’चे अध्यक्ष भटनागर यांचा राजीनामा
नवी दिल्ली, २६ मे/वृत्तसंस्था

प्रसारभारती मंडळाचे कार्यकारी अधिकारी बी. एस. लाली यांच्याशी मतभेद विकोपाला गेल्याने मंडळाचे अध्यक्ष अरुण भटनागर यांनी पदाचा राजीनामा दिला. मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत आपण असमाधानी आहोत, असे भटनागर यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. दहा सदस्यीय मंडळात या मतभेदांमुळे दोन गट पडले आहेत.