Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्राच्या ‘नवरत्नां’मध्ये प्रतीक आणि विलासरावांचा समावेश अनपेक्षित
नवी दिल्ली, २७ मे/खास प्रतिनिधी

 

केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या ‘नवरत्नां’मध्ये वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा समावेश झाल्यामुळे सर्वांनाच अनपेक्षित धक्का बसला. सांगलीच्या लोकसभा निवडणुकीत प्रतीक पाटील यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्या विरोधात सारी राजकीय ताकद एकवटली होती, तर निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विलासराव देशमुख यांची कुठल्याही परिस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू नये म्हणून राज्यातील बहुतांश नेत्यांनी मोर्चेबांधणी केली होती.
मनमोहन सिंग यांच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या नऊ मंत्र्यांना संधी मिळाली आहे. गेल्या मंत्रिमंडळात राज्यातून दहा मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. पण माणिकराव गावित आणि शिवराज पाटील यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभा विसर्जित होता होता मंत्रिमंडळात राज्याचे आठ मंत्री उरले होते. २२ मे रोजी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि मुरली देवरा यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज विलासराव देशमुख, मुकुल वासनिक या कॅबिनेट मंत्र्यांसह प्रफुल्ल पटेल आणि पृथ्वीराज चव्हाण या स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री तसेच गुरुदास कामत आणि प्रतीक पाटील या राज्यमंत्र्यांचा उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करण्यात येत आहे. महाराष्ट्राला पाच कॅबिनेट, दोन स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि दोन राज्यमंत्री अशा ‘नवरत्ना’ंसह दिल्लीच्या नव्या दरबारात सन्मान लाभला आहे. त्यात प्रतीक पाटील यांचा समावेश चकित करणारा ठरला आहे. ३६ वर्षीय प्रतीक पाटील यांच्यामुळे वसंतदादा पाटील यांच्या घराण्याला प्रथमच दिल्लीत मानाचे स्थान लाभले आहे. कोल्हापूरमधून अपक्ष निवडून आलेले सदाशिवराव मंडलिक यांना राज्यमंत्रीपद देण्याचा काँग्रेसश्रेष्ठींच्या मनात विचार घोळत असताना शेजारच्या सांगलीतून प्रतीक पाटील यांचे नाव पुढे आणून मंडलिक यांना शह देण्यात पडद्यामागून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शिष्टाईही महत्त्वाची ठरल्याचे म्हटले जात आहे. ज्या राष्ट्रवादीने प्रतीक पाटील यांना पाडण्यासाठी भाजपशी हातमिळवणी केले तेच नेते आता ते मंत्री व्हावेत, असे सुचवित होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवाय राहुल गांधी यांनीही प्रतीक पाटील यांच्या नावासाठी आग्रह धरल्याचे काँग्रेस सूत्रांनी सांगितले. लोकसभेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात ३५ हजार किमी प्रवास करणारे काँग्रेसचे ’स्टार प्रचारक’ विलासराव देशमुख यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू नये म्हणून त्यांच्या राज्यातील आणि दिल्लीतील विरोधकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा विलासराव अपमान करीत आहेत, अशी तक्रार मनमोहन सिंग यांच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत लालूप्रसाद यादव यांनी पवारांदेखत करून त्यांचा पत्ता कापण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात काँग्रेसचे १७ खासदार निवडून आणल्याचे तसेच बळीराम जाधव आणि सदाशिवराव मंडलिक असे दोन अपक्ष खासदार मिळवून देण्याचे ‘श्रेय’ घेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही देशमुख यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी नांदेडहून निवडून आलेले मेहुणे भास्करराव खतगावकर पाटील यांना मराठवाडय़ातून मंत्रीपद मिळावे, असा त्यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत तळ ठोकून प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी देशमुख यांचे दिल्लीत मंत्रीपद पटकाविण्याचे डावपेच हाणून पाडण्यासाठी सारी ताकद एकवटली होती. राज्यातील अनेक नेते देशमुख केंद्रात मंत्री होऊ नये म्हणून काँग्रेसश्रेष्ठींना भेटून त्यांच्याविषयी नकारात्मक बोलत होते. मंगळवारी तर शिवराज पाटील यांनी राहुल गांधी यांना किमान ५० वेळा मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आज दिल्लीत सुरसपणे चर्चिले जात होते. पण साऱ्यांचा विरोध मोडून विलासरावांनी मंत्रीपद पटकाविण्यात यश मिळविले आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्याशी असलेल्या घनिष्टतेमुळे हे शक्य झाल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्रातून यंदा विलास मुत्तेमवार यांना संधी नाकारून विदर्भातून मुकुल वासनिक यांना कॅबिनेट मंत्र्याचा सन्मान देण्यात आला आहे. १९९६ नंतर वासनिक प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात परतणार आहेत. गुरुदास कामत यांना केवळ राज्यमंत्रीपदावरच समाधान मानावे लागत आहे, तर पृथ्वीराज चव्हाण यांना बढती देताना राज्यमंत्रीपदाचा स्वतंत्र प्रभार सोपविण्यात येत आहे. प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्रीपदाच्या स्वतंत्र प्रभारावरच समाधान मानावे लागत आहे. राज्यातील या नवरत्नांमध्ये सात मंत्रीपदे काँग्रेसच्या वाटय़ाला आली असून गेल्यावेळी तीन मंत्रीपदे भूषविणाऱ्या राष्ट्रवादीचा टक्का मात्र कमी झाला आहे.