Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

केंद्रात मंत्रीपद द्या! -रामदास आठवले
मुंबई, २७ मे / प्रतिनिधी

 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपला पराभव केला आहे. त्यामुळे आता काँग्रेसने राज्यसभेवर घेऊन आपल्याला मंत्रिपद द्यावे, अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी केली. राज्यात राज ठाकरे यांची ताकद असल्याचे स्पष्ट झाले आहे असे सांगून राज ठाकरे यांनी विधानसभेच्या सर्व जागा लढवाव्यात, असे आवाहनही आठवले यांनी केले.
गेली अनेक वर्षे रिपब्लिकन पक्ष काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत आहे. रिपब्लिकन पक्षाचा काँग्रेस आघाडीला फायदाच झालेला आहे. तेव्हा केंद्रात मंत्रिपद मिळालेच पाहिजे, असे आठवले यांचे म्हणणे आहे. काँग्रेसने ही मागणी मान्य केली नाही तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भात चर्चा करण्यासाठी येत्या ४ जून रोजी दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे, असे आठवले यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेची ताकद असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेने केवळ शिवसेनेची मते घेतली नसून सर्व पक्षांची मते मनसेला मिळाली आहेत. मात्र रिपब्लिकन पक्ष मनसेसोबत कधीच जाणार नाही, कारण मनसे प्रांतवादी भूमिका घेत आहे, असा आरोप आठवले यांनी केला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत रिपब्लिकन पक्षाची आघाडी धर्मनिरपेक्ष विचाराच्या आधारावर आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष सेना-भाजपसोबत जाणार नाही. मात्र केंद्रात मंत्रीपद मिळाले नाही तर वेगळा विचार करावा लागेल, अशी विसंगत विधाने आठवले आज करीत होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघात माझा पराभव झाल्यामुळे रिपब्लिकन समाज नाराज आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपल्याला मंत्रीपद दिले पाहिजे, असा आठवले यांचा आग्रह आहे.
मायावती यांनी उत्तर प्रदेशात केलेला प्रयोग राज्यात यशस्वी होणार नाही. कारण उत्तर प्रदेशात २२ टक्के दलित समाज आहे तर राज्यात फक्त १३ टक्के दलितांची मते आहेत. त्यामुळे स्वबळावर निवडून येण्याची शक्यता नाही. पूर्वी एकदा स्वबळावर निवडणूक लढण्याचा अनुभव रिपब्लिकन गटांनी घेतलेला आहे. तेव्हा रिपब्लिकन पक्षाला दुसऱ्यांसोबत जावे लागेल, असे आठवले म्हणाले. रिपब्लिकन पक्षात इतर समाज घटकांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. खासगी क्षेत्रात राखीव जागा मिळाव्यात, मागासवर्गीय मंडळांचे कर्ज माफ करावे अशा काही मागण्या आठवले यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे केल्या आहेत. शिर्डीतील पराभव आणि आगामी धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी १४ जूनच्या दरम्यान प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.