Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

निवडणुकीपर्यंत विजेचा तुटवडा राहणार केवळ दीड हजार मेगावॅटचा
मुंबई, २७ मे/प्रतिनिधी

 

राज्यातील विजेचा तुटवडा ५५०० मेगावॅटवरून आता ३००० मेगावटवर आला असून येत्या तीन महिन्यांमध्ये म्हणजे निवडणुकीपूर्वी तो केवळ दीड ते दोन हजार मेगावॅट इतकाच राहील, असा विश्वास राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.
पुढील आठवडय़ात जनरल इलेक्ट्रीकल्स या कंपनीबरोबर रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमीटेड दुरुस्ती-देखभाल व सुटय़ा भागांच्या पुरवठय़ाबाबत एक करार करण्यात येणार आहे. सध्या या कंपनीतील यंत्रसामुग्रीत काही बिघाड झाल्यास दुरुस्ती व सुटय़ा भागांच्या पुरवठय़ासाठी बराच मोठा कालावधी जातो. या नव्या करारामुळे ही सेवा सुरळीत होण्यास फायदा होणार आहे. तसेच येत्या तीन महिन्यांमध्ये परळी ५०० मेगाव्ॉट, खाजगी वीज उत्पादकांकडून ३०० ते ५०० मेगावॅट आणि दाभोळमध्ये आणखी ५०० मागावॅटची भर पडणार असल्यामुळे सध्या साडेपाच हजारांवरून ३००० मेगाव्ॉटवर आलेली तूट आणखी कमी होणार आहे. त्यामुळे राज्यातील भारनियमनाची ओरड खूप मोठय़ा प्रमाणात कमी होणार आहे. तसेच उर्वरित राज्यांकडूनही कमी दरात वीज खरेदीचे करार करण्याचाही सरकारचा मानस आहे. तीन ते चार महिन्यांपूर्वी विजेच्या एका युनिटसाठी ११ ते १२ रुपये मोजावे लागत होते. तीच वीज सध्या रात्रीच्या वेळी १.९० रुपये तर दिवसा कमाल मागणीच्या काळात ४ ते ५ रुपये प्रति युनिट दराने उफलब्ध आहे. त्यामुळे हे करारही लवकर करून पुढील सोय करून ठेवण्याचा सरकारचा मानस आहे. भविष्यात भारनियमन पूर्ण संपून विजेबाबत राज्य केवळ स्वयंपूर्णच न होता राज्याकडे अतिरिक्त वीज कशी राहील, अशा पद्धतीने वीज निर्मितीच्या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करण्याकडेही राज्य सरकारचा कल असून त्यादृष्टीनेही सरकार ठोस पावले उचलत आहे. मात्र त्याबाबत लगेचच काही बोलणे संयुक्तिक होणार नसल्याचे तटकरे यांनी सांगितले