Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेसची यंग इलेव्हन
अगाथा संगमा बाराव्या खेळाडू
नवी दिल्ली, २७ मे/खास प्रतिनिधी

 

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात अपेक्षेप्रमाणे अनेक तरुण चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, सचिन पायलट, भरतसिंह सोळंकी, तुषारभाई चौधरी, अरुण यादव, प्रतीक पाटील, ए. साई प्रताप, आर.पी.एन. सिंह, प्रदीप जैन, व्हिन्सेंट पाला या अकरा राज्यमंत्र्यांसह सर्वात तरुण अगाथा संगमांना बुजुर्ग कॅबिनेट मंत्र्यांचे तरुण राज्यमंत्री सहकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या कोटय़ातून अकरा तरुणांना स्थान मिळाले असले तरी त्यांना राहुल गांधी एलेव्हन म्हणता येणार नाही. मंत्रिमंडळात काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या विश्वासातील तरुण खासदारांचा समावेश झालेला नाही. जितीन प्रसाद यांचा अपवाद वगळता अशोक तंवर, मीनाक्षी नटराजन, जितेंद्र सिंह, रवणीत सिंग बिट्टू ही राहुल गांधी यांच्या जवळची मानली जाणारी नावे मंत्रिमंडळातील सहभागापासून दूर राहिलेली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कन्या व पुत्रांना तसेच मनमोहन सिंग यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून सुरुवात करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांना बढती मिळालेली नाही. उलट त्यांच्या मध्य प्रदेशातील कांतीलाल भुरिया यांनी राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट मंत्रीपदावर झेप घेतली आहे. जितीन प्रसाद यांनाही राज्यमंत्रीपदीच कायम ठेवण्यात आले आहे, तर कॅबिनेट मंत्री सासरे फारुक अब्दुल्ला यांच्यापाठोपाठ
जावई सचिन पायलटही मंत्रिमंडळात दाखल झाले
आहेत.
माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांच्या २८ वर्षीय कन्या अगाथा संगमा नव्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री ठरल्या आहेत. संगमा यांनी सतत काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्यावर जाहीर टीका करूनही त्यांच्या मुलीला मंत्रिमंडळात घेऊन काँग्रेसने त्यांना ‘लज्जित’ केले आहे. संगमा यांना काँग्रेसवर टीका करण्यापासून रोखण्याचा कधीही प्रयत्न न करणारे शरद पवार यांनी अगाथा संगमा यांचे नाव पुढे केले. पण काँग्रेसने अगाथा संगमा यांना स्थान देताना मेघालयातील दुसऱ्या मतदारसंघातून निवडून आलेले व्हिन्सेंट पाला यांचा मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश करीत संगमा यांच्या राजकारणाला शह दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील बहुतांश तरुण आपल्या मातापित्याच्या पूर्वपुण्याईवर मंत्री बनले आहेत, हे विशेष.