Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

पाणीप्रश्न आणखी चिघळण्याची चिन्हे
रत्नागिरी, २७ मे/खास प्रतिनिधी

 

रत्नागिरी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले असून, येत्या आठवडाभरात चांगला पाऊस न झाल्यास हा प्रश्न आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
रत्नागिरी शहराला शीळ व पानवल या दोन धरणांपासून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी पानवल धरण गाळाने भरल्यामुळे तेथील पाणीसाठा फेब्रुवारीपर्यंतच पुरतो. त्यानंतरचे सुमारे तीन महिने शीळ धरणाच्या पाण्यावर रत्नागिरीकरांना अवलंबून राहावे लागते. पण यंदा तेथील पाणीसाठाही झपाटय़ाने संपत गेल्यामुळे नगर परिषद प्रशासनाने गेल्या २ मेपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. अशा कपातीची गरज नसल्याचा दावा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि आमदारांनी करून या विषयाचेही राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या दाव्यातील फोलपणा आता उघड झाला आहे. सध्या रत्नागिरी शहराला दिवसाआड केला जाणारा पाणीपुरवठा अपुरा होत असून, अनेक गृहरचना संस्थांनी, उद्योग-व्यवसायिकांनी आणि हॉटेलचालकांनी खासगी टँकरमार्फत पाण्याची सोय करून घेतली आहे. मात्र शहराच्या परिसरात उपलब्ध पाणीसाठे आणि टँकर पैसे देऊनही ही गरज भागवण्यास कमी पडत आहेत. त्यामुळे शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशाप्रकारे खासगी टँकर न परवडणाऱ्या लोकवस्त्यांमध्ये तर पाण्याअभावी हालांना पारावार राहिलेला नाही.
रत्नागिरीपासून सुमारे ३५ किलोमीटर असलेल्या गणपतीपुळे या सुप्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या परिसरात पूर्वीपासूनच पाण्याचे प्रमाण कमी राहिले आहे. गेल्या काही वर्षांत येथील पाणीटंचाई आणखी वाढली असून, ऐन धंद्याच्या मोसमात येथील हॉटेल व्यावसायिकांना पाण्यासाठी दररोज हजारो रुपये मोजावे लागत आहेत.
संगमेश्वर, चिपळूण, खेड या तालुक्यांच्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त पाणीटंचाई आहे. अनेक वाडय़ा-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातही कोकणातील आया-बहिणींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा कमरेवर आणल्याचा टेंभा मिरवणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्या खेड तालुक्यात टंचाईग्रस्त गावे आणि वाडय़ांची संख्या सर्वात जास्त आहे.
रत्नागिरीप्रमाणेच दापोली शहरालाही पाणीसमस्या भेडसावत असून, तेथे दररोज सुमारे तीन लाख लिटर पाण्याची गरज आहे. त्यासाठी टँकरने पाणीपुरवठय़ाचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला आहे.
पावसाळ्यात दीडशे-पावणे दोनशे इंच पाऊस आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण, हे कोकणात पिढय़ानपिढय़ा दिसत आलेले चित्र आहे. पण यंदा ही टंचाई जास्त गंभीर झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, दरवर्षी साधारणत: दसरा-दिवाळीपर्यंत कोकणामध्ये अधूनमधून पावसाच्या सरी पडत राहतात, त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा आणि ओलावा टिकून राहण्यास मदत होते. यंदा मात्र गणेशोत्सवानंतरचे आठ दिवस जोरदार धुमाकूळ घालून पाऊस अदृश्य झाला तो पुन्हा फारसा फिरकलाच नाही. त्यामुळे यावर्षी सालाबादपेक्षा सुमारे एक-दीड महिना आधीपासून, म्हणजे जानेवारीच्या अखेरपासूनच जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीपातळी झपाटय़ाने घटली आणि त्यामुळे टंचाईच्या झळा दरवर्षीपेक्षा लवकर जाणवू लागल्या. वाढत्या उन्हाळ्याबरोबर त्यांची तीव्रताही वाढत गेली आहे.