Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

एका मताच्या बदल्यात १२ मागण्या!
सोपान बोंगाणे

 

केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात पालघर मतदारसंघातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची तातडीने तड लागावी, यासाठी विकास प्रकल्पांचे १२ कलमी मागणीपत्र पालघरच्या नवनिर्वाचित खासदाराने थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सादर केले. त्यावर गंभीरपणे विचार करून तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना संबंधितांना केल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती स्वत: खासदार बळीराम जाधव यांनी दिली.
१६ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशभरातून यूपीएची घोडदौड सुरू असल्याचे लक्षात येताच राज्यातील काँग्रेस नेत्यांनी खासदार जाधव व त्यांचे गॉडफादर आ. हितेंद्र ठाकूर यांचे घर गाठले. दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी जाधव व ठाकुरांसह खास विमानाने दिल्ली गाठली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट झाली व लगोलग जाधव यांनी यूपीएला पाठिंबा जाहीर केला. वसई-विरार महापालिकेच्या अडून पडलेल्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळवून जाधव यांनी पाठिंबा दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
वरील पाश्र्वभूमीवर जाधव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, महापालिकेसंदर्भातील चर्चा हा अपप्रचार आहे. माझ्या मतदारसंघातील लक्षावधी मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून आघाडीला भरभरून मतदान केले. त्यांना विकासाची ठोस आश्वासने आघाडीच्या जाहीरनाम्यात व प्रचारात दिली होती. त्याचे प्रतिबिंब माझ्या कामातून उमटावे, अशी मतदारांची अपेक्षा आहे. ती पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही विषयापेक्षा मतदारसंघातील वर्षांनुवर्षे रखडलेल्या विकास कामांना चालना देणे आवश्यक आहे. केंद्र सरकारला पाठिंबा देताना माझ्या एका मताच्या मोबदल्यात मतदारसंघातील समस्यांची तड लावून घेण्यासाठी १९ मे रोजी आपण काँग्रेस अध्यक्षा सोनिया यांना विकास कामांच्या संदर्भातील लेखी निवेदने सादर करून ती मार्गी लावण्याचे त्यांच्याकडून आश्वासन घेतले.
चर्चगेट ते घोलवडपर्यंत उपनगरी रेल्वे सेवा सुरू करणे, डहाणू- नाशिक व्हाया जव्हार या मार्गावरील रेल्वेलाइनचे काम मार्गी लावणे, जेएनपीटी ते दिल्ली या मालवाहतुकीच्या रेल्वेमार्गात विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे अशा रेल्वे मंत्रालयाशी संबंधित मागण्यांचा त्यात समावेश आहे.
मुंबईजवळील समुद्रातून निर्माण होणाऱ्या गॅसचा लाभ दूरवरच्या राज्यांना दिला जातो, परंतु पालघर, डहाणू, वसई परिसरातील नागरिक त्यापासून वंचित आहेत. स्थानिकांनाही गॅस उपलब्ध करावा, अशी त्यांची मागणी आहे. तीन पिढय़ांपासून जे आदिवासी वनखात्याच्या जमिनीवर उदरनिर्वाह करीत आहेत, त्यांच्या जमिनी नावावर कराव्यात, पालघर मतदारसंघाला समुद्रकिनारा लाभला आहे. किल्ले, चर्चेस, बौद्धांचे स्तूप, गरम पाण्याचे कुंड अशी अनेक निसर्गसंपन्न व ऐतिहासिक स्थळे आहेत. त्यांचा पर्यटनासाठी विकास करावा, मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत आणि वनजमिनींमुळे पाणीपुरवठय़ाचे अनेक प्रकल्प रखडलेले आहेत, त्यास केंद्र सरकारकडून तातडीने ना हरकत दाखले दिले जावेत, या प्रमुख मागण्यांचा त्यात अंतर्भाव असल्याचे जाधव यांनी सांगितले.