Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

देवरुखच्या ‘गुड्डू’चा जादुई दुनियेत प्रवेश
देवरुख, २७ मे/वार्ताहर

 

वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री अभिनय यातून लहानपणापासून सर्वाचीच लाडकी असलेल्या शहरातील दक्षता लिंगायत हिने अगदी लहान वयात नव्या क्षेत्रात पदार्पण करण्याची किमया केली आहे. अवघ्या १० वर्षांची दक्षता जादूगारांच्या दुनियेत पदार्पण करीत असून २९ मे रोजी पदार्पणाचा पहिला प्रयोग ती आपल्या गावातच करणार आहे.
देवरुखच्या पित्रे प्रायोगिक कलामंचामध्ये प्रचंड कष्टाने अगदी लहान वयात आत्मसात केलेल्या जादुई कौशल्याचे दक्षता ‘जादूगार करिश्मा’ या नव्या नावाने सादरीकरण करणार आहे. देवरुखातील प्राध्यापिका स्नेहलता पुजारी व कोमसाप देवरुख शाखेचे अध्यक्ष दीपक लिंगायत यांची दक्षता मुलगी होय. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून रंगमंचावर सहजपणे वावरण्याचे धाडस दाखवणारी दक्षता मोठय़ा क्षेत्रात प्रवेश करीत असल्याने शहरात प्रचंड उत्सुकता आहे.
विविध राज्यस्तरीय स्पर्धातून दक्षताने प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवलेली आहेत. काही जाहिराती, टेलीफिल्म, मराठी चित्रपटातही तिला बालकलाकार म्हणून छोटय़ा कामाची संधी मिळालेली आहे. ‘गुड्डू’ म्हणून शहरात सर्वाची लाडकी असणारी दक्षता आता जादूगार करिश्मा म्हणून ओळखली जाणार आहे. चिपळूणचे प्रसाद ओक, शैलेश भस्मे यांनी दक्षताला जादूगार करिश्मा म्हणून अथक मेहनतीने घडवले आहे. माणसाला हवेत उडवून गायब करणे, स्वत:च्या शरीराचे तुकडे करणे, माणसाचा वाघ बनवणे, माया महल यासारख्या अवघड जादू प्रकारात दक्षताने कौशल्य मिळविले आहे.