Leading International Marathi News Daily

गुरुवार, २८ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

अमानुष खून प्रकरणाचा तपास लावण्यात खालापूर पोलीस यंत्रणेला यश
खोपोली, २७ मे/वार्ताहर

 

अमानुष खून प्रकरणात कोणताही ठोस पुरावा नसताना व मृत युवकाच्या विद्रूप केलेल्या चेहऱ्यामुळे ओळख पटणेही अशक्य झाले असताना, केवळ मृत व्यक्तीच्या शर्टावरील टेलरमार्कच्या जुजबी पुराव्यावर खालापूर पोलीस यंत्रणेला चक्रावून सोडणाऱ्या या खून प्रकरणाचा तपास लावण्यात यश आले आहे.
खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्जनस्थळी मंगळवारी अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या खून प्रकरणात मृत युवकाचा चेहरा अमानुषपणे दगडाने ठेचण्यात आल्यामुळे ओळखता येत नव्हता. खून करणाऱ्यांनी तेथे कोणताही पुरावा ठेवला नसल्यामुळे पोलीस यंत्रणा पार चक्रावून गेली होती. या मृत युवकांच्या शर्टवर हरिष टेलर मुंबई असे लिहिलेले आढळून आले. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रतापराव दिघावकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुप संख्ये, खालापूरचे पोलीस उपअधीक्षक प्रवीणकुमार तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपलब्ध जुजबी पुरावा घेऊन खालापूरचे पोलीस निरीक्षक हिंदुराव पाडळकर यांनी या प्रकरणी वेगाने तपास सुरू केला. हरिष टेलर कुर्ला येथील असल्याचे आढळून आले. कुर्ला पोलीस ठाण्यावर १८ मे रोजी कुल्र्याचाच राहणारा १४ वर्षांंचा अमनदीप साहेबसिंग बनवेत हा सरदारजी (मुंडा) युवक हरविल्याची नोंद आढळून आली. साहेबसिंग बनवेत यांनी चेहरा ओळखता येत नसला तरी मृत युवकाचे कपडे, पाठीवरील सॅक यावरून हा मृतदेह आपल्या मुलाचा (अमनदीप) असल्याचे मान्य केले. अधिक खोलात चौकशी करण्यात आली. तेव्हा नववी पास झालेल्या व दहावीमध्ये गेलेल्या अमनदीपचे त्याच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या अलिशा शेख या १६-१७ वर्षांंच्या युवतीशी प्रेमसंबंध जुळले होते. दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती अलिशाच्या भावाला फहाद फैजअहमद शेख (२१) याला मिळाली होती. फहादने काकू ऊर्फ अमनदीपला अलिशाला भेटू नकोस, भेटलास तर त्याचे वाईट परिणाम होतील, असा सज्जड दम दिला होता. तसाच दम बहिणीला-अलिशालाही दिला होता. एवढे करूनही या दोघांचे प्रेमप्रकरण सुरूच असल्याचे निदर्शनास आल्यामुळे फहादने आपला चुलतभाऊ फरहान सिराज अहमद शेख (२०) व त्याचा मित्र सलीम अब्दुलसत्तार मलबारवाला (२१) यांच्या साथीने अमनदीपचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. तिघांनी अमनदीपला कोठे व कसे ठार मारायचे याचा प्लॅन केला. तद्अनुषंगाने तिघे मोटारसायकलवरून खालापूर हद्दीत आदल्या दिवशी येऊन जागेची पाहणी करून गेले. १८ तारखेला दहावीच्या क्लासला निघालेल्या अमनदीपला फिरायला जाऊ, असे सांगून त्यांनी मोटारसायकलवरून खालापूरच्या निर्जनस्थळी आणले. तिघांनी त्याचा गळा दाबून प्रथम खून केला. चेहरा विद्रूप केला. कोणताही पुरावा राहणार नाही, याची दक्षता घेऊन ते फरार झाले, असे चौकशीअंती अखेर निष्पन्न झाले. पाडळकरांनी तिघा आरोपींना अटक केली.